||श्री गणेशाय नम||
श्री गणेशाची संकलित माहिती
गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ' श्री गणेशाय नम: ' म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही श्री गणेशाचा नामोच्चार करतात.
गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ' श्री गणेशाय नम: ' म्हणून श्री गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही श्री गणेशाचा नामोच्चार करतात. हा देव सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे या देवाचे पूजन सर्वांच्या घरी होते.
गाणपत्याचे दैवत गणपती
हिंदूंमध्ये जे अनेक उपासना पंथ निर्माण झाले त्यामध्ये ' गाणपत्य ' हा एक पंथ आहे. गाणपत्याचे दैवत आहे गणपती. माता पार्वती स्नानविधी अगोदर
लावण्यात येणाऱ्या चंदन उटीपासून एक सुंदर बालकाची मूर्ती बनवते व त्यावरमोहीत होऊन
मातृवात्सल्यने तू सजीव करते. त्याचे नाव गणेश ठेवते. अशी एक दंतकथा आहे. त्याप्रमाणे व्यासांनी सांगितलेलं महाभारत गणपतीने लिहिलं अशी समजूत आहे. अंगाने स्थूल, किंचित पिवळट वर्णाचा, मोठ्या पोटाचा, चार हात असलेला व एकदंत, हत्तीचं डोकंअसलेला, असं गणपतीचं रूप पुराणात वर्णिले आहे. त्याने आपल्या चारही हातात शंख, चक्र, गदा व पद्म ही आयुधं धारण केली आहेत.
कधीकधी उंदराला आपलं वाहन करून त्यावर बसून चालला आहे, असंही गणपतीचं वर्णन आढळतं.
गणपतीला हत्तीचं मस्तक का लागलं?
याबद्दलच्या दंतकथा.
शनीच्या कटाक्षापासून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून पार्वतीने एकदा शनीला गणपतीकडे बघण्यास सांगितलं. कारण तिला आपल्या पुत्राचा फार अभिमान होता. शनीने गणपतीकडे दृष्टी फिरवताच गणपतींचं मस्तक जळून खाक झालं तेव्हा पार्वतीला अतिशय दु:ख होऊन तिने ब्रह्मादेवास ही हकीकत कथन केली. ब्रह्मादेवाने तिला सांगितलं की तुला पहिल्या प्रथम ज्या प्राण्याचं मस्तक मिळेल ते मस्तक धडाला लाव म्हणजे गणपती पूर्ववत होईल. ब्रह्मादेवाच्या सांगण्याप्रमाणे ती मस्तकाच्या शोधात निघते. प्रथम तिला हत्तीचं मस्तक मिळतं. याप्रमाणे गणपती ' गजवदन ' झाल्याची एक दंतकथा आहे.
दुसरी एक दंतकथा अशी आहे की पार्वती स्नानास बसली असता तिने गणपतीला दरवाजावर राखण करण्याची आज्ञा देते. त्याप्रमाणे गणपती दरवाजाजवळ बसून राहतो. तेवढ्यात शंकर तिथे येतात. परंतु त्यांना आत जाण्यास गणपतीने प्रतिबंध केल्यामुळे ते गणपतीचं शिर उडवतात. त्यामुळे पार्वतीला फार दु:ख होतं. तिचं सांत्वन करण्यासाठी शंकर त्याच्या धडावर हस्तीचं मस्तक बसवून गणपतीला सजीव करतात.
एकदंत कथा
एकदा परशुराम शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर जातात. त्यावेळी शंकर भगवान निदिस्त असतात. तेव्हा परशुरामाला अंतर्गृहात येण्यास गणपती मज्जाव करतो. त्या दोघांमध्ये वाद होऊन युद्ध जुंपतं. गणपती परशुरामाला आपल्या सोंडेत धरून गरगर फिरवताच त्याला मूर्च्छा येते. सावध झाल्यानंतर परशुराम आपला परशू गणपतीवर फेकतात. शंकरानेच तो परशू परशुरामाला दिलेला असतो. त्यामुळे गणपतीने आदराने तो आपल्या एका दातावर धारण करतो. पण त्यामुळे त्याला तो दात गमावावा लागतो. म्हणूनच गणपतीला ' एकदंत ' किंवा ' एकदंष्ट ' असं म्हणतात.
गाणपत्य संप्रदाय
इतर देवतांप्रमाणे गणपतींची उपासना करणारा एक संप्रादाय भारतात आहे. या संप्रदायाला ' गाणपत्य ' असं म्हणतात. हाच परमात्मा असून त्यानेच सर्व ब्रह्मांड निर्माण केलं असं या पंथाचे अनुयायी मानतात. या पंथाच्या आचार्यांनी निरनिराळे ग्रंथ लिहिले. हे सर्व ग्रंथ त्या पंथाच्या अनुयायांनी प्रमाण मानले आहेत. या संपादायाचे प्रमुख ग्रंथ वस्दतापलीय अगर गणपति तापनीय उपनिषद, गणेश पुराण, मुगदल पुराण व ब्रह्मावैवर्त पुराणाचा गणेश खंड असे आहेत. ' गणेश संहिते ' त अगर ' गणपत्यनिषदा ' त गणपती व ग्रहण हे एक असून गणपती हा जगताचा आदीकारण होय असं सांगितलं आहे. गणेश खंडामध्येदेखील अशाच कथा आहेत.
ब्रह्मावैवर्त पुराणामध्ये एका अध्यायात राधा गणेशाची पूजा करत असे, असं सांगितलं आहे. हे ध्यानात ठेवण्यासारखं आहे. गणेश खंडामध्येदेखील अशाच कथा आहेत. गणेश खंडात शिवाने गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी दहा वर्षं घोर तपश्चर्या केली व त्यापासून त्रिपुरासुराचा वधाचा वर प्राप्त करून घेतला असं वर्णन आलेलं आहे.
गणेश गीता नावाचाही एक ग्रंथ आहे. पण तो जवळजवळ भगवद्गीतेसारखाच आहे. फक्त ' कृष्णाऐवजी गणेश ' नाव घालण्यात आलं आहे याखेरीज ' गणपती कवच ', ' गणपती पंचरत्न ', ' गणपति पंचांग ', ' गणपति पंचावरण स्तोत्र ' (शंकराचार्यकृत), ' गणपतीपुराश्चरणाविधी ', ' गणपति पूजा ', ' गणपती पंत्र विधान ', ' गणपति मानसपूजा ', ' गणपति रत्नप्रदीप ', ' गणपति रहस्य ', ' गणपति सूक्त ', ' गणपति स्तवराज ', ' गणेश महात्म ' इत्यादी अनेक गणेश पूजनाचे ग्रंथ आहेत.
आनंदतीर्थांनी लिहिलेल्या ' शंकर दिग्विजया ' मध्ये भया गणपत्यासंबंधीचा व त्यांच्या तत्त्वांचा उल्लेख आला आहे... हा ग्रंथ दहाव्या शतकांमध्ये लिहिला गेला असावा. या ग्रंथामध्ये गाणपत्यांचे सहा पोटभेद होते. हे पोटभेद म्हणजे ' महागणपति पंथ ', ' हरिदागणपति पंथ ', ' उच्छिद गणपति पंथ ', ' नवनीत गणपति पंथ ', ' स्वर्गगणपति पंथ ' व ' सनातन गणपति पंथ ' हे आहेत.
या पंथांपैकी ' उच्छिष्टा गणपति पंथ ' थोडासा चमत्कारिक आहे... या पंथाचे अनुयायी गणपतीची डाव्या हाताने पूजा करतात. हे लोक गणपतीला ' ऐरंब ' हे नाव देतात. या पंथात जातीभेद पाळण्यात येत नाही. सर्व विवाहविषयक निबंधिंना या पंथात थारा नाही. चंदकृति तांबडे गंध लावणे ही गाणपत्यांची मुख्य खूण होय.
भादपद शुद्ध चतुर्थीस प्राणप्रतिष्ठेपासून पूजा
भादपद शुद्ध चतुर्थीस (गणेश जन्मदिवसापासून) या सणाला आरंभ होतो. गणेशदेवता व शेतीचा हंगाम यांचा अन्योन्य संबंध असावा. कारण पावसाला उशीर झाल्यामुळे आगामी पीकपाण्याबद्दल अनिश्चितता वाटू लागल्यावर ' विघ्नहर्ता ' गणेशाचं पूजन करणं हे प्रसंगोचित व जरूरी आहे.
'व्रतराज ' ग्रंथात या व्रताचा उल्लेख येते. भादपद शुद्ध चतुथीर्स गणेशाची सुवर्णाची मूर्तीकरून तिची प्राणप्रतिष्ठेपासून पूजा करून हवनादि विधी करावे व नंतर ती मूर्ती ब्राह्माणास दान करावी इत्यादी विधी सांगितला आहे.
विनायकी व संकष्टी चतुर्थी
विनायकी व संकष्टी चतुर्थी या व्रतांचा संबंध चंद्राकडे नसून, गणेशाकडेच आहे. परंतु गणेश व चंद्र यांचाही अन्योन्य संबंध आहे, ही गोष्ट गणेशचतुर्थीस दिसून येते. कारण त्या दिवशी चंद्र पाहणं अशुभ मानतात. कोणी चुकून चंद्र पाहिलाच तर त्याला शेजारच्या घरावर दगड फेकून व चार शिव्या खाऊन ते अशुभ टाळता येतं. चतुर्थीचा चंद्र पाहणं व विपद्ग्रस्त होणं या गोष्टी मराठीत समानार्थी मानल्या जातात.
गणेशोत्सव पेशव्यांचा
पेशव्यांच्या राजवाड्यात प्रतिवर्षी भादपद शुद्ध चतुर्थी ते दशमीपर्यंत गणेशोत्सव होत असे. त्याप्रसंगी गणपती रंग महालात मोठी आरास केली जाई. सर्व कार्यक्रम तिथेच होत. स्वच्छ हंडे, झुंबरे, मोठाले आरसे व विविध चित्रं यामुळे त्या महालाचं सौंदर्य द्विगुणित होत असे. मध्यावर सोन्याच्या भरजरीचं काम जिच्यावर केलं आहे अशी पेशव्यांची ' मनसद ' उर्फ गादी मांडलेली असे. दोन्ही बाजूला मुख्य मराठे सरदार, शिलेदार व दरबारी हे भरजरी पोशाख घालून आपापल्या दर्जाप्रमाणे रांगेने बसलेले असत. भालदार, चोपदार यांच्या ललकारीत स्वारी दरबारात प्रवेश करून मोठ्या ऐटीने सिंहासनारूढ होत असे. गणपती रंग महालात त्यावेळी गाणं, नाच, कथा-कीर्तनं वगैरे कार्यक्रम होत.
या उत्सवात सर्व नोकर- चाकर मोठ्या हौसेने मिसळत. त्यांना पेशव्यांकडून मिठाई वाटण्यात येई. ब्राह्माणभोजनं बरीच होत. विसर्जनाच्या दिवशी पुष्पांनी शृंगारलेल्या पालखीतून थाटाची मिरवणूक काढून गणपती विसर्जन होई. त्यावेळी पेशवे जातीने हजर असत.
गणपती उपासना
गणपती उपासनेचं महात्म्य महाराष्ट्रात व दक्षिण भारतात आढळून येते. द्रविड लोकांचा हा मूळचा देव असावा. या देवाचं वाहन उंदीर आहे. द्रविड लोकांची ' औरौन ' म्हणून जी एक जात आहे त्या जातीचे उंदीर हे प्रमुख दैवत आहे. श्रावणकोरमध्ये ' होमपुरे ' उर्फ गणपतीची देवळं पुष्कळ ठिकाणी असून त्या ठिकाणी दररोज होम केला जातो. काही ठिकाणी क्वचित प्रसंगी ' महागणपति होम ' नावाचा खर्चिक होमही करण्यात येतो.
पुण्याजवळ चिंचवडला गणपतीची स्वयंभू मूर्ती असून त्या ठिकाणी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मोठा उत्सव करण्यात येतो. इथल्या मोरया गोसावी नावाच्या साधूने गणपतीला प्रसन्न करून घेतले. ‘मी तुझ्या शरीरात व तुझ्यामागून होणाऱ्या सहा पुरुषांत अंश रूपाने वास करेन,' असा गणपतीने त्याला वर दिला. त्याप्रमाणे मोरया व त्याचे सहा वंशज यांच्यामध्ये गणपती वास करतो, अशी समजूत असून या सात जणांच्या समाधीची गणपती या नात्याने दररोज पूजा करण्यात येते. या गणपती संस्थानला अनेक भाविकांनी देणग्या दिल्या असून, खुद्द औरंगजेब बादशहानेदेखील त्या संस्थानला आठ खेडी इनाम दिल्याचा उल्लेख आढळतो.
चौदा विद्या
श्री गणेश हे चौदा विद्या, चौसष्ट कलांचे दैवत आहे. श्रीगणेशाचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण श्रीगणेशपूजा करीत असतो. पण गणरायाच्या या चौदा विद्या, चौसष्ट कला तुम्हाला माहिती आहे का चौदा विद्या?
श्रीगणेश विषयक माहिती असलेले प्राचीन ग्रंथ श्रीगणेशपुराण आणि श्रीमुद्गलपुराण हे आहेत. आजही हे प्राचीन ग्रंथ अभ्यासकांना उपलब्ध आहेत.
श्रीगणेशांना चौदा विद्या अवगत होत्या, श्रीगणेश मोठे ज्ञानी होते. ज्याच्याजवळ जे असते तेच तो दुसर्याला देऊ शकतो. श्री गणेश स्वत: ज्ञानी व प्रगल्भ बुद्धिमान असंल्यामुळेच त्यांचा आदर्श आपण ठेवला, तर आपणही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागतो. अधिक बुद्धिमान होण्यासाठी अधिक मेहनत घेऊ लागतो. श्रीगणेशाला बुद्धिदाता म्हणजे बुद्धी देणारा असे म्हटले आहे.
श्रीगणेशांना पुढील चौदा विद्या अवगत होत्या. (१) ऋग्वेद (२) यजुर्वेद (३) सामवेद (४) अथर्ववेद (५) छंद (६) शिक्षा (७) व्याकरण (८) निरुक्त (९) ज्योतिष (१०) कल्प (११) न्याय (१२) मीमांसा (१३) पुराणे आणि (१४) धर्मशास्त्र.
काही विद्वानांच्या मते पुढील चौदा विद्या श्रीगणेशाला अवगत होत्या.
(१) आत्मज्ञान (२) वेदपठण (३) धनुर्विद्या (४) लिहीणे (५) गणित (६) पोहणे (७) विकणे (८) शस्त्र धरणे (९) वैद्यक (१०) ज्योतिष (११) रमलविद्या (१२) सूपशास्त्र (१३) गायन आणि (१४) गारुड.
आणखी इतर ग्रंथांमधून वेगवेगळ्या विद्या सांगितलेल्या आहेत. आधुनिक काळांत विद्यांची संख्याही अनेक पटीने वाढली आहे. यावरून एकच म्हणता येईल की, गणपती हे सकल विद्यांचा अधिपती होते. सकल ज्ञानी होतज. बुद्धिमान होते. म्हणूनच अथर्वशीर्षामध्ये श्रीगणेशांना ‘तू ज्ञान आहेस ‘असे म्हटले आहे.
चौसष्ट कला
श्रीगणेशांना चौदा विद्यांबरोबरच चौसष्ट कलाही अवगत होत्या. शिवतत्त्वरत्नाकर ग्रंथामध्ये पुढील चौसष्ट कला सांगितलेल्या आहेत.
(१) इतिहास (२) आगम (३)काव्य (४) अलंकार (५) नाटक (६) गायकत्व (७) कवित्व (८) कामशास्त्र (९) दूरोदर (१०) लिपिज्ञान (११) लिपिकर्म (१२) वाचन (१३) गणन (१४) व्यवहार (१५) स्वरशास्त्र (१६) शाकुन (१७) सामुद्रिक (१८) रत्नशास्त्र (१९) गंज-अश्व-रथ-कौशल (२०) मल्लशास्त्र (२१) सूपशास्त्र (२२) बागाईत (२३) गंधवाद (२४) धातुवाद (२५) रससंबंधी (२६) बिलवाद (२७) अग्निसंस्तम्भ (२८) जलसंस्तम्भ (२९) वाक् स्तंम्भन (३०)वायुस्तंभन (३१) वशीकरण (३२) आकर्षण (३३) मोहन (३४) विद्वेषण (३५) उच्चाटन (३६) मारण (३७) कलवंचन (३८) परकायाप्रवेश (३९) पादुकासिद्धी (४०) वाक्सिद्धी (४१) गुटिकासिद्धी (४२) ऐन्द्रजालिक (४३) अंजन (४४) परदृष्टिवंचन (४५) स्वरवंचन (४६) मणिभूमिकर्म (४७) मंत्रऔषधी (४८) कर्म (४९) चित्रक्रिया (५०) लेहक्रिया (५१) अश्मक्रिया (५२) मृत्क्रिया (५३) औषधक्रिया (५४) वेणुक्रिया (५५) चर्मक्रिया (५६) अम्बरक्रिया (५७) अदृश्यकरण (५८) दन्तिकरण (५९) मृगयाविधी (६०) वाणिज्य (६१) पशुपालन (६२) कृषी (६३) आसनकर्म (६४) युद्धकौशल्य.
आधुनिक कालात कलांची संख्याही अनेकपटीने वाढली आहे. या काळात माणसाने एक तरी कला आत्मसात करणे आवश्यक आहे. आयुष्यात प्रत्येकाला आवडीच्या विषयातील नोकरी मिळतेच असे नाही. पण आवडीच्या विषयाची कला मात्र जोपासता येते. दु:खाच्या वेळी अवगत असलेली कला मनाला आधार देते तर सुखाच्यावेळी कला माणसाचे सुख द्विगुणित करीत असते.
गणपतीला मोदकांचा नैवेद्य
मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकोलेट, विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत.
मोदक या यामध्ये मोद असा शब्द आहे. जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला "मोदक" असे म्हटले जाते. गणपतीला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात.
उकडीचे मोदक
भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला गणपतीच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात कोकण विभागात उकडीचे मोदक या प्रकारास महत्त्व असते.हे मोदक तांदळाच्या पिठापासून केले जातात.
साहित्य: तांदुळाची पिठी, मैदा, मीठ, तेल, सारणासाठी - खोबरे, गूळ, जायफळ पूड इ.
पाककृती: आवश्यक प्रमाणात पाणी घेऊन (साधारण पिठीच्या निम्म्या प्रमाणात) ते उकळवतात. उकळी आल्यावर त्यात पिठी, आवश्यक वाटल्यास मैदा आणि किंचित मीठ व तेल घालून एकजीव करतात. गुठळ्या राहू देत नाहीत. हे मिश्रण थंड झाल्यावर मळून घेतात. खोबरे आणि गूळ यांचे सारण शिजवून थंड होऊ देतात. (सुकामेवा किंवा अन्य पौष्टिक पदार्थही या सारणात मिसळता येतात.) पिठाच्या गोळ्याची पारी करून तिला पाकळ्या करतात. पारीच्या आत खोबऱ्याचे सारण भरतात. हा कच्चा मोदक. पाकळ्या बंद करून असे सर्व मोदक भांड्यात किंवा कुकरमध्ये चाळणी ठेवून त्यावर वाफवून घेतात. मोदकपात्र असल्यास त्याचा वापर करता येतो. हा पदार्थ तुपासह खाण्याची रीत आहे.
तळणीचे मोदक:
अनंत चतुर्दशीला किंवा संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करण्याची प्रथा आहे. याचप्रमाणे खव्याचे, सुकामेव्याचे, पुरणाचे सारण भरूनसुद्धा मोदक तयार केले जातात. तळणीच्या मोदकांना उकडीच्या मोदकाला असते तसे सारण करतात. हे सारण काही वेळा सुके खोबरे आणि गूळ यांचेही मिश्रण असते. तांदळाच्या पिठाऐवजी हे मोदक कणकेचे करतात आणि सारण भरून मोदक तयार केल्यावर ते तळून घेतात.
श्रीगणेशास आवडणा-या गोष्टी.
१) शस्त्र: शूळ, त्रिशूळ, अंकुश, परशू, पाश, मुद्गल, एकदंत, खट्वांग, खेटक व नागबंद.
२) वाहन: उंदीर, मोर, सिंह, वाघ.
३) फुले व पत्री: गणपतीला तांबडी फुले व दुर्वा विशेष आवडतात.
४) शमी: हा वृक्ष गणपतीस विशेष प्रिय आहे. याला वह्मी वृक्ष असेही म्हणतात.
५) मंदारवृक्ष: मंदारवृक्ष / मुळाच्या काष्ठात श्री गणेशमूर्ती तयार होते, त्याला मंदारगणेश असेही म्हणतात. मंदारवृक्षाच्या काष्टात तयार झालेला नैसर्गिक श्रीगणेश सिद्धीगणेश मानला जातो.
६) भक्त: गणपती भक्तांना गाणपत्य या नावाने ओळखतात. त्याच्यात महागणपती, हरिद्रा गणपती, उचिष्ट गणपती, नवनीत, स्वर्ण व संतान संप्रदाय असे सहा संप्रदाय निर्माण झाले आहेत.
७) गणेश आराधना:
चतुर्थी, विनायकव्रत, स्तोत्रपठण, गणेशध्यान, गणेशगायत्री मंत्र, गणेशनामजप व गणेशयाग आदी मार्गांनी गणेश आराधना केली जाते. श्रीगणेशाच्या अभिषेकासाठी अथर्वशीर्ष व ऋग्वेदातील ब्रम्हणस्पत सूक्त म्हणण्याची पद्धत आहे.
अथर्वशीर्ष: यात अ +अथर्व +शीर्ष हे तीन शब्द येतात. अ = निषेध करणारा, नाही. अथर्व = चंचल होणे. शीर्ष = अंत. या सर्व शब्दांचा अर्थ = जे चंचल होऊ देत नाही व जे अंतिम साध्य आहे ते अथर्वशीर्ष.
ब्रम्हणस्पत सूक्त: ब्रम्हणस्पती हे गणपतीचे दूसरे नाव आहे. ब्रम्हणस्पत सूक्त म्हणजे श्रीगणेशाचे स्तवण होय.११ अध्याय व ६४ मंत्र असलेले हे ऋग्वेदातील सूक्त ११ ऋषिंनी निर्माण केले.
गायत्री मंत्र:
ॐभूर्भुव: स्व: | ॐगं गणपतये नम: | ॐएकदंताय विघ्नहे | वक्रतुंडाय धीमही | तन्नो दन्ति प्रचोदयात् ||
|| श्री गणेश संकटनाशनस्तोत्रं ||
| ओम श्री गणेशाय नमः ॥ || श्री नारद उवाच ॥
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुःकामार्थ
सिध्दये ॥ १॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं
चतुर्थकम ॥२॥
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं
तथाष्टमम् ॥३॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं व्दादशं तु गजाननमं
॥४॥
व्दादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकरं
प्रभो ॥ ५ ॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी
लभते गतिम ॥ ६ ॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिध्दीं च लभते
नात्र संशयः ॥ ७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत तस्य विद्या भवेत्सर्वा
गणेशस्य प्रसादतः ॥ ८ ॥
इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ॥
|| श्री गजाननार्पणमस्तु ॥
हे स्तोत्रं श्री नारदमुनींनी रचले आहे.
गणपती स्तोत्र (मराठी अनुवाद)
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||
पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवे विघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||
नववे श्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावे गणपति बारावे श्रीगजानन ||४||
देवनावे अशी बारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नभिती नसेत्याला प्रभो! तू सर्वसिद्धिद ||५||
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ||६||
जपता गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले ||८||
गणेश पूजेसाठी वापरतात २१ प्रकारच्या वनस्पती.
गणपती बाप्पाची आई पार्वती. पार्वतीचं आणखी एक नाव आहे गिरिजा, म्हणजेच् डोंगरावर जन्म घेणारी. म्हणजेच ती एक नदीचंही रूप समजली जाते. नदीचा मळ म्हणजे तिचा गाळ. गाळाची माती अत्यंत सुपिक असते. या मातीचाच बनतो गणपती नि त्यातच उगवतात वनस्पती. म्हणूनच गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये त्यांचाच वापर होतो.
शमी, माका, बेल, दूर्वा, बोर, धोत्रा, तुळस, घेवडा, अघाडा, डोरली, हिंगूळ, तमालपत्र, अगस्ता, कणेरी, केळ, अर्क, अर्जुनवृक्ष, देवदार, मरवा, कांचन, केवडा.
श्री गजाननाची वरील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट मधून गोळा करून संकलित केलेली आहे. या माहितीच्या सत्यतेची शहानिशा केलेली नाहीं. कोणतीही माहिती असत्य अथवा कल्पोकल्पित असल्यास संकलनकर्ता जवाबदार नाही.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know