Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 6 September 2023

जीवनदायी पालेभाज्या | Benefits of Leafy Vegetables | Vegetarian | Ayurveda | Good Health | Vegetarian Food

जीवनदायी पालेभाज्या

 

पालेभाज्या तुमच्या आहारात एक विलक्षण जोड आहेत कारण त्या केवळ स्वादिष्टच नाहीत तर आरोग्यास प्रोत्साहन देणारे आवश्यक पोषक तत्वांनी देखील परिपूर्ण आहेत. त्यांच्या असंख्य आरोग्य फायद्यांमुळे त्यांना "जीवनदायी" भाज्या म्हणून संबोधले जाते. येथे काही लोकप्रिय पालेभाज्या आणि त्यांचे फायदे आहेत.

प्रत्येक पालेभाजी आपल्या शरीरावर कसे काम करते आणि आपण त्यांचा वापर कशाप्रकारे करू शकतो?

  अळू:

अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. फुरसे किंवा अन्य विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चौथा थापावा पोटात रस घ्यावा. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्या जागी बांधावी. गळू फुटतात.

अंबाडी:

अंबाडी ही पालेभाजी रुचकर आहे; पण डोळय़ाचे विकार, त्वचारोग, रक्ताचे विकार असणाऱ्यांनी वापरू नये. अंबाडी खूप उष्ण आहे, तशीच ती कफही वाढवते.

करडई:

करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाही. कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे. या पालेभाज्यांच्या रसाने एक वेळ लघवी साफ होते. मात्र डोळय़ाच्या त्वचेच्या विकारात करडई वापरू नये. करडईच्या बियांच्या तेलाची प्रसिद्धी सफोला या ब्रॅण्डनावामुळे झाली आहे. त्यात तुलनेने उष्मांक कमी असतात.

कुरडू:

कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत. कुरडूची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा. कोवळय़ा पानांचा रस किंवा जून पाने शिजवून त्याची भाजी खावी. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात उपयुक्त आहे.

कोथिंबीर:

कोथिंबीर जास्त करून वापर खाद्यपदार्थाची चव वाढवायला म्हणून प्रामुख्याने केला जातो. चटणी, कोशिंबीर, खिचडी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वाकरिता कोथिंबीर हवीच. बहुधा सर्व घरी, सदासर्वदा, सकाळ-संध्याकाळ पोळी, भाकरी, भात सोडून सगळय़ा पदार्थात कोथिंबीर वापरली जातेच. कोथिंबीर ताजीच हवी तरच त्याचा स्वाद पदार्थाची खुमारी वाढवतो. भाजीबाजारात काही वेळा कोथिंबीर खूप स्वस्त, तर उन्हाळय़ात सर्वसामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेर असते. कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक रुची टिकवणारी आहे. जेवणात अधिक तिखट जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते. जेव्हा विविध स्ट्राँग औषधांची रिऍक्शन येते, अंगावर पित्त, खाज किंवा गळवांचा त्रास होतो त्या वेळेस कोथिंबीर स्वच्छ धुऊन वाटावी, त्याचा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेला बाहेरून लावावा. बिब्बा, गंधकमुक्त औषधे, स्ट्राँग गुग्गुळ कल्प यांच्या वापरामुळे काही उपद्रव उद्भवल्यास कोथिंबिरीचा सहारा घ्यावा. रक्तशुद्धी, रक्तातील उष्णता कमी करणे, तापातील शोष हा उपद्रव कमी करायला ताज्या कोथिंबिरीच्या रसाचा वापर करावा. पथ्यकर भाज्यांत कोथिंबिर अग्रस्थानी आहे.

घोळ:

घोळाची भाजी बुळबुळीत असली तरी औषधी गुणाची आहे. त्यात एक क्षार आहे. चवीने ओशट असलेली घोळाची भाजी थंड गुणाची असून अन्नपचनास मदत करते, यकृताचे कार्य सुधारते. रक्ती, मूळव्याध, दातातून रक्त येणे, सूज, अंगाचा दाह, मूत्रपिंड बस्तीच्या विकारात उपयुक्त आहे. विसर्प किंवा धावरे, नागीण विकारात पाने वाटून त्यांचा लेप लावावा.

चाकवत:

चाकवत ही पालेभाजी देशभर सर्वत्र सदासर्वदा मिळते. पालेभाज्यांत आयुर्वेद संहिताकार जिवंती श्रेष्ठ मानतात; पण ही वनस्पती संदिग्ध वादग्रस्त आहे. व्यवहार पाहता चाकवताला श्रेष्ठत्व द्यावे. ज्वर, अग्निमांद्य किंवा दीर्घकाळच्या तापामुळे तोंडाला चव नसणे, कावीळ, छातीत जळजळ अशा नाना तक्रारींत ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसालेदार पदार्थाबरोबर ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तिनुरूप प्रकृतीप्रमाणे लसूण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैंधव, मिरी, तूप, खडीसाखर, गूळ हे पदार्थ अनुपान म्हणून वापरावे. आंबट नसलेल्या ताकातील चाकवताची पालेभाजी हा उत्तम पदार्थ होय. शक्यतो पालेभाज्यांचे ज्यूस घेऊ नयेत.

चुका:


बाराही महिने मिळणारी चुक्याची भाजी जास्त करून श्राद्धाकरिता अळूच्या भाजीबरोबरच वापरली जाते. नावाप्रमाणे चुक्याची चव आंबट आहे. पाने छोटी त्याचे देठ पातळ भाजीकरिता वापरतात. चुका उष्ण, पाचक वातानुलोमन करणारा आहे. त्याचबरोबर त्याच्या संग्राहक गुणामुळे चुक्रसिद्ध तेलाची पट्टी योनीभ्रंश, अंग बाहेर येणे याकरिता वापरली जाते. पचायला कठीण असणाऱ्या पदार्थाबरोबर चुक्याची पाने वापरावी.

तांदुळजा:

तांदुळजा लाल, हिरवा कुठेही केव्हाही सहज येतो. ज्यांना शरीरात सी जीवनसत्त्व हवे आहे त्यांनी तांदुळजाची भाजी खावी. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध शीतवीर्य आहे. उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर, कांजिण्या तीव्र तापात फार उपयुक्त आहे. विषविकार, नेत्रविकार, पित्तविकार, मूळव्याध, यकृत पांथरी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे. नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीकरिता, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी तांदुळजा वरदान आहे. डोळय़ाच्या विकारात आग होणे, कंड सुटणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारींत तांदुळजाची भाजी खावी. डोळे तेजस्वी होतात. जुनाट मलावरोध विकारात आतडय़ांना चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजाची भाजी उपयुक्त आहे. तांदुळजाची पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्याकरिता जास्त उपयुक्त आहे. मोठय़ा आतडय़ास जास्त उपयुक्त घटक मिळतात. स्त्रियांच्या धुपणी विकारात तांदुळजाचा रस तांदुळजाचे धुवण मध असे मिश्रण फार त्वरित गुण देते. अनेक प्रकारचे विषविकार, चुकीच्या औषधांनी शरीराची आग होत असल्यास तांदुळजाचा रस प्यावा. लघवी स्वच्छ होऊन शरीर निदरेष होते. उंदीर, विंचू, पारा इतर धातूंच्या विषारात याचा रस प्यावा. शरीराला आवश्यक सर्व घटक तांदुळजा भाजीत आहेत.

पालक:

पालक ही अतिशय आरोग्यदायी पालेभाजी आहे. कोवळा पालक औषधी गुणांचा आहे. पालक शिजवताना पाणी थोडेच घ्यावे. पालक भाजीत लोह काही प्रमाणात नैसर्गिक ताम्र असल्याने पांडू विकारावर अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर हाडे बळकट करणारे क्षार पालकभाजीत आहेत. त्याकरिता हाडे ठिसूळ झाली असल्यास पालकभाजी खावी. हाडे जुळून यावी, लवकर ताकद यावी याकरिता शस्त्रकर्म झाल्यावर पालक भाजी किंवा त्याचा रस यांचा मुक्त वापर करावा. पालकाच्या हिरव्या पानात जीवनशक्ती आहे. कृश मुलांना अवश्य द्यावी. दुधाचा पर्याय म्हणून पालक भाजी वापरावी. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारून रक्त अस्थी या दोनही धातूंची वाढ व्हायला मदत होते. पालक भाजीमुळे पोटात होणारा मुरडा थांबतो. वारंवार जुलाब होत असल्यास थांबतात. मात्र पालकभाजी स्वच्छ धुऊन घ्यावयास हवी. फुप्फुसातील दूषित वायू हटविण्यास उपयोगी आहे. काहींच्या मते पालकाच्या भाजीमुळे मूतखडा विरघळून जातो.

पुनर्नवा:

पुनर्नवा, घेटोळी, वसू या नावाने ओळखली जाणारी भाजी दर पावसाळ्यात नव्याने येते. याची पालेभाजी कावीळ, उदर, जलोदर, पोट मोठे होणे, लिव्हर सिरॅसिस, पांथरी वाढणे या विकारात फार उपयुक्त आहे. पोटात पाणी झाले असताना अन्न खाल्ले की पोट फुगते. अशा वेळी पुनर्नव्याच्या पानांच्या भाजीत भात शिजवून द्यावा. पाणी होणे थांबते. पोटाची सूज कमी होते. पुनर्नव्याच्या पानांचा मुळांचा रस काढून प्यावा. लघवी साफ होऊन शरीराची सूज ओसरते. पुनर्नव्याच्या पाल्याच्या रसाने रक्त वाढते.

माठ:

माठ ही सदासर्वदा उपलब्ध असणारी पालेभाजी रानोमाळ आपोआपही उगवते त्याची बागायती शेतीही केली जाते. रानोमाळचा माठ बहुधा काटेरी असतो. एरवी तांबडा पांढऱ्या रंगाचा माठ मिळतो. माठाची पालेभाजी ही पथ्यकर, वजन वाढवायला अम्लपित्त विकारांत विशेष उपयोगी आहे. मूतखडय़ाची तक्रार असणाऱ्यांनी माठाचा वापर टाळलेला बरा. तांबडा माठ हा गुणांनी श्रेष्ठ आहे. रक्तवर्धक म्हणून माठाची पालेभाजी जरूर वापरावी.

मुळा:

कच्चा मुळा, पक्का मुळा, वाळलेला मुळा डिंगऱ्या किंवा त्याच्या शेंगा असे मुळ्याचे चार प्रकार वापरात आहेत. कच्चा मुळा जास्त औषधी आहे. मलमूत्रप्रवृत्ती साफ करतो. दीपक, पाचक, त्रिदोषहारक आहे. मूतखडा विकारात मुळ्याच्या पाल्याचा रस दीर्घकाळ घ्यावा. मूतखडा विरघळतो किंवा त्याचे बारीक बारीक कण होतात. पांथरी वाढली असता कोवळा मुळा भरपूर खावा. मुळा तापामध्ये पथ्यकर आहे. त्यामुळे अग्निमांद्य दूर होऊन तापाचे कारण नाहीसे होते. कोवळ्या मुळ्यांच्या पानांचा जास्त औषधी उपयोग होतो. पक्व मुळा हा रूक्ष, उष्ण, पचायला जड शारीरिक कष्ट करण्याकरिता उपयुक्त आहे. मूळव्याध, पोटातील कृमी, पक्वाशयात वायू धरणे, याकरिता पोसलेला मुळा मीठ लावून खावा. अजीर्ण, अपचन दूर होते. सुकलेला मुळा पचावयास हलका कफ वात विकारात उपयुक्त आहे. वाळलेल्या मुळ्याचे चूर्ण विषावर उत्तम उतारा आहे. डिंगरी किंवा मुळ्याच्या शेंगा वातनाशक, गुणाने उष्ण पण उत्तम पाचक आहेत. मुळ्याचे बी लघवी शौचास व्यवस्थित होण्याकरिता उपयुक्त आहे. मूतखडा मोडण्याकरिता मुळ्याच्या बियांचे चूर्ण खावे.

डिंगऱ्या:

जून मुळ्याच्या शेंगा औषधी गुणाच्या आहेत. डिंगऱ्या मलावष्टंभक, तीक्ष्ण गुरू गुणाच्या आहेत. बियांचा लेप गंडमाळा, दडस गावी, अर्बुद, शिबे या विकारात बाह्येपचारार्थ उपयुक्त आहे. मूतखडा, कष्टसाध्य गाठी, जुनाट सूज या विकारात डिंगऱ्यांची भाजीने फरक पडतो.

मेथी:

मेथी हे मधुमेहींना वरदान आहेच. चवीच्या दृष्टीने पालेभाज्यांत मेथीचे महत्त्व फार मोठे आहे. मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत मेथीची भाजी नियमित खाल्ली तर मेथीपूड मिसळून गव्हाची पोळी खाण्याची पाळी येत नाही. मेथीची पालेभाजी खाल्ल्यामुळे लघवीचा वर्ण सुधारतो. भूक सुधारते, पाचक स्राव वाढतात. बाह्येपचार म्हणून मेथी पालेभाजीचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर करावा. दु: कमी होते. केस गळणे, कोंडा, केस निर्जीव होणे याकरिता मेथीच्या रसाने केस धुवावे.

राजगिरा:

राजगिरा बियांचा वापर आहेच. राजगिरा पालेभाजी रक्तशुद्धीकरिता फार उपयुक्त आहे. गंडमाळा, क्षय, लघवीची जळजळ या विकारांत पालेभाजी किंवा त्या पानांचा वाटून लेप करावा. शरीरस्वास्थाकरिता लागणारी द्रव्ये राजगिरा पाने बिया या दोन्हीही आहेत.

शतावरी:

शतावरी पाने अगदी बारीक असतात. लहान मुलांच्या जुलाब, पित्त होणे, दातांचा त्रास या विकारांत रस द्यावा. पाने पौष्टिक आहेत. कंदातील स्तन्यजनन हे गुण पानात अल्प प्रमाणात आहेत. कुंडीत शतावरी शोभेकरिता लावतात. त्यातील पानांचा ताजा रस ताकद कमावण्याकरिता उपयुक्त आहे. गोवर, कांजिण्या, जीर्णज्वर, कडकी या विकारांत ही पालेभाजी पथ्यकर आहे.

शेपू:

उग्र वासामुळे शेपूचा वापर कमी होतो. शेपूची पालेभाजी वात कफविकारात फार चांगली. पाने स्वच्छ धुऊन घेतली की उग्र वास कमी होतो. अग्निमांद्य, पोटफुगी, गॅस, कुपचन या विकारांत लगेच गुण देणारी ही पालेभाजी आहे. सोबत जिरे, आले किंवा लसूण वापरावा. लहान मुलांच्या पोटदुखी, जंत, कृमी या तक्रारीवर एकवेळी दिलेली भाजी काम करते. ज्या स्त्रियांना मासिक स्राव व्यवस्थित येत नसल्यास त्यांनी काही दिवस शेपूची पालेभाजी खावी. विटाळ नियमित होतो. गळवे पिकण्याकरिता पानांचा लेप करावा. गंडमाळा विकारात पोटात घेण्याकरिता बाहेरून पानांचा लेप अशा दोन्हीकरिता शेपूच्या पानांचा वापर करावा.

हादगा:

हादग्याची फुले पांढरी किंवा जांभळ्या रंगाची असतात. चणापीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फार चविष्ट होते. पूर्वी मिळणाऱ्या अनेक भाज्या अलीकडे दिसेनाशा झाल्या आहेत. हादग्याला आगस्ता असे संस्कृत नाव आहे. आयुर्वेदीय औषधीकरणात मनशीळ शुद्धीकरिता हादग्याच्या पानांच्या रसाचा वापर सांगितला आहे. ठेचाळलेल्या भागावर किंवा जखमेवर पाने ठेचून बांधावी. जखम भरून येते.

सारांश

उपलब्ध असलेल्या अनेक जीवनदायी पालेभाज्यांपैकी या काही आहेत. या भाज्यांचा आहारात समावेश करून, तुम्ही तुमचे आरोग्य आणि आरोग्य सुधारू शकता.


(टीप: आरोग्याच्या कोणत्याही समस्यांसाठी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या. वरील माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे आणि ती वैद्यकीय औषध किंवा उपचार म्हणून वापरली जाऊ शकत नाही. येथे उपलब्ध माहिती वेळेनुसार आहे आणि येथे केलेले दावे वैद्यकीय समुदायाद्वारे समर्थित नसू शकतात. कृपया कोणतीही नवीन थेरपी किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी सर्व खबरदारी घ्या आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)



No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know