Translate in Hindi / Marathi / English

Tuesday, 4 June 2024

पावसाची चाहूल | निसर्गातील पर्जन्य संकेत | मानवाचे निसर्गाशी असलेले नाते दुरावलेले आहे | झाडे, पशू, पक्षी यांनी मात्र ते आजही घट्ट जपले आहे त्यामुळे निसर्गातील बदलांबाबत हे घटक मानवापेक्षा जास्त संवेदनशील असतात | निसर्गातील पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पती या सर्वांकडून पावसाचे संकेत मिळतात | 'सहदेव भाडळी' या ग्रंथात याबद्दल काही संकेत आढळतात

निसर्गातील पर्जन्य संकेत

 

 पावसाची चाहूल

साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असे ठरलेले असायचे. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. मात्र तो कोठे, किती आणि केव्हा पडणार, हे नेमके सांगता येणे कठीण झाले आहे. मानवाचे निसर्गाशी असलेले नाते दुरावलेले आहे. झाडे, पशू, पक्षी यांनी मात्र ते आजही घट्ट जपले आहे. त्यामुळे निसर्गातील बदलांबाबत हे घटक मानवापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. मानवाला मात्र ते समजून येत नाही.

यंदा पाऊस वेळेवर येणार आणि सरासरीपेक्षा जास्त येणार, अशी बातमी आली. शेतकऱ्याला निदान पाण्यासाठी त्रासावे लागणार नाही. लातूरला रेल्वेने पाणी पाठवावे लागणार नाही, या विचारात असतानाच निसर्गातील पर्जन्याबद्दल संकेत देणाऱ्या घटकांचे चित्र नजरेसमोर आले आणि अंदाजाबद्दल साशंकता निर्माण झाली. अर्थात या अभ्यासाला शास्त्रीय अभ्यासाची जोड नाही. प्रयोगातून काढलेले नेमके निष्कर्ष नाहीत. तरीही, आज निसर्ग संकेतांनुसारच घडताना दिसत आहे. निसर्गातील पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पती या सर्वांकडून पावसाचे संकेत मिळतात. हे संकेत निसर्गातील अनेक घटकांना ओळखता येतात. बरेच संकेत आजही ज्येष्ठांच्या मुखातून नव्या पिढीला कळतात. झाडे, प्राणी, पक्षी, कीटक यांच्या वर्तनावरील आधारित अनेक ठोकताळ्यांचा संदर्भ शेकडो वर्षे घेतला जात आहे. खरेतर काल परवापर्यंत त्याचा प्रत्ययही येत असे. आणि त्याला कारण होते नियमित असलेले ऋतुचक्र. ही निरीक्षणे सामान्यातील सामान्य लोकांची असली, तरी त्यावर निसर्गवाचनात हातखंडा असलेल्या मारुती चितमपल्ली आणि त्यांच्यासारख्या अनेक तज्ज्ञांनीही शिक्कामोर्तब केले आहे.

पक्ष्यांकडून मिळणारे पाऊस संकेत

) पावशा पक्षी: चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! 'पेर्ते व्हा' असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

) चातक पक्षी: पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल, तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी 'पिऊ पिऊ' या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले, हे हमखास समजावे.

) तित्तीर पक्षी: माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे 'कोड्यान केको कोड्यान केको' अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानावर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

) कावळा: कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभूळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार.

दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. झाडाच्या शिखरावर घरटे केले, तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.

यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे कावळे, सारस, टिटवी आणि अशा बऱ्याच पक्ष्यांनी या विणीच्या हंगामात किती अंडी घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जाई. त्यांनी तीन, चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस आणि एकच अंडे दिले वा अंडीच घातली नाही तर अतिशय कमी पाऊस पडेल असे मानले जाते. त्यांनी जमिनीवर अंडी दिली, तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले!

) वादळी पक्षी: पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छीमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशा वेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते.

वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्या पाठोपाठ येत आहे, याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा समुद्रात वादळ येणार!

) चिमण्या धुळीत लोळण्याचा खेळ खेळू लागल्या की पाऊस तोंडावर आला असल्याचे संकेत मानतात.

प्राणी सरिसृपांकडून मिळणारे पाऊस संकेत

) हरिण: पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिलांना जन्म देत नाहीत.

) वाघीण: एका निसर्ग अभ्यासकाने सांगितलेला हा स्वानुभव.

आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते.

यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी, आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल. याची पूर्वकल्पना आल्यानेच ति गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे."

) वानरेः मारुती चितमपल्ली यांच्या निरीक्षणांनुसार वानरे खाल्लेली पाने, फळे, फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवू लागले की ओळखावे पुढील काळ दुष्काळाचा आहे. वानरांना येणाऱ्या दुष्काळाची आधीच माहिती होत असल्याने पुढील अडचणीच्या काळासाठी पिलांसाठी म्हणून तहान आणि भूकलाडू झाडाच्या ढोलीत तयार करून ठेवतात. त्याही पेक्षा हृदयद्रावक बाब म्हणजे दुष्काळाच्या काळात म्हातारी वानरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून आपले जीव सोडतात. पुढील दुष्काळामध्येआपल्या नवीन पिढीने तरी जगावेही त्यांची धैर्यपूर्ण भावनाच त्यांना असा निरोप घेण्यास भाग पाडत नसेल ना!

) मगर: मगरीलाही बरेच आधी पाऊस येण्याचे संवेदन होते. मगरीने जलाशयाच्या बाजूच्या मातीत वा वाळूत अंडी घातल्यापासून बरोबर एकशेवीस दिवसांनी मुसळधार पाऊस येतो. अंड्यात पिलांची वाढ होऊन त्या दिवशी मुसळधार पावसात ती पिले अंड्याच्या बाहेर पडून धो धो वाहणाऱ्या पाण्याबरोबर जवळच्या जलाशयात पोहोचतात.

) बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले, की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठ्या प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

) खेकडेः तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकड्यांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात.

हा खेकड्यांच्या स्थलांतराचा कालखंड आहे. समुद्र किनाऱ्यानजीक असलेल्या रस्त्यावरील भरधाव वाहणाऱ्या वाहनांखाली मेलेल्या खेकड्यांच्या मोठ्या संख्येवरूनही शेतकऱ्यांना पावसाचे अंदाज मिळू शकतात.

कीटकांवरून लावले जाणारे  पावसाचे अंदाज:

) वाळवी: जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी / उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाट्यात बाहेर पडू लागले, की पावसाचे लवकरच आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढ्या तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.

) काळ्या मुंग्या: हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

) मृग किडा: गवतावर लाल वेलवेट सारख्या मखमली त्वचेचा किडा हा मृगाचा पाऊस येण्याची चाहूल देतो.

झाडांचा फुलोरा, बियांची संख्या यावरूनचे पाऊस अंदाज:

) जंगलातील बरीच मोठी जास्त वयाचे वृक्ष भविष्यातील अवर्षणाचे संवेदन मिळाले, की त्यांच्या खोडात पाणी साठवून ठेवतात. अवर्षण काळात त्यावरच टिकतात. तसेच येणाऱ्या काळात चांगला पाऊस येण्याचे संवेदन होताच खोडातले पाणी जमिनीत सोडून देतात.

) कडुनिंबाला दरवर्षीपेक्षा जास्त लिंबोळ्या लागल्या तर तो अवर्षणाचा इशारा असतो.

) बिब्याच्या झाडाला नेहमीपेक्षा अधिक बहर येणे, हाही दुष्काळाचा संकेत मानला जातो.

) खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.

() कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.

) बिचूलचा बहर आणि कुटजाचा बहर हा अतिवृष्टीचे हाकारे देतो.

सारांश

जगातील बहुतांश भूभागावर वर्षभरात कधीही विखरून पाऊस पडतो. त्याला अपवाद भारतासारखे काही भूभाग आहेत. इथे पावसाळा हा स्वतंत्र ऋतू आहे. आपल्याकडे उन्हाळा जोराने भाजू लागला की सर्व सृष्टीला ओढ लागते ती पावसाची. त्यानंतर आलेल्या पावसाळ्यात सृष्टीतील सर्वांच्याच नवनिर्मितीच्या ऊर्मी उभारून येतात. आजकाल हवामानशास्त्र बरेच प्रगत झाले आहे. हे खरे असले तरी ग्रामीण भागातील लोक पावसाचे अंदाज हे सामान्यपणे पारंपरिक ज्ञानावर आधारित अनेक ठोकताळ्यावरून लावत असतात. पाऊस येईल, त्याचे प्रमाण किती म्हणजे कमी किंवा जास्त असेल, याचे अनेक ठोकताळे निसर्ग निरीक्षणातून विकसित झालेले होते. त्याला पिढी दर पिढी दिल्या गेलेल्या शहाणपणाची जोड असायची.


कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.







No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know