माता दुर्गेच्या विविध 9 रूपांची पूजा
दुसरी माळ: देवीचे द्वितीय स्वरुप
ब्रह्मचारिणी देवी
चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसांच्या कालखंडात आदिमायेच्या विविध नऊ स्वरुपांचे पूजन, नामस्मरण, उपासना, जप, भजन, कीर्तन केले जाते. अगदी प्राचीन काळापासून नवरात्रोत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू आहे. नवरात्रात संपूर्ण देशभरात आपापल्या पद्धतीप्रमाणे विशेष व्रतपूजन केले जाते.
ब्रह्मचारिणी देवीचे स्वरुप
कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते. देवी पार्वतीच्या अविवाहित रूपाची माँ ब्रह्मचारिणी म्हणून पूजा केली जाते. ती अनवाणी चालते, पांढरा पोशाख परिधान करते आणि उजव्या हातात जपमाला (रुद्राक्ष जपमाळ) आणि डाव्या हातात कमंडल (पाण्याचे भांडे) धारण करते. बह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशिर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.
ब्रह्मचारिणी देवीची उपासना केली असता स्वाधिष्ठान चक्र जागृत होते. या चक्रात मन स्थिर केले असता ब्रह्मचारिणीची कृपा प्राप्त होते. हिमालय कन्या म्हणून जन्म घेतल्यानंतर शंकराची पती म्हणून प्राप्ती होण्यासाठी हिने कठोर तपश्चर्या केली. ऊन-वारा-पाऊस कशाचीही पर्वा न करता अनेक वर्षे केवळ फळ आणि मुळे खाऊन उपासना केली. नंतर नंतर तर बेलाची जमिनीवर पडलेली पाने खाऊन उपजीविका केली. शेवटी तर पाने देखील खाणे सोडले म्हणून तिचे नाव झाले 'अपर्णा'.
ब्रह्मचारिणी देवीच्या शांत मुखावर तपाचे तेज विलसत असते. संसारापासून विरक्त अशी तपस्येची मूर्तिमंत चेहरा म्हणजे ब्रह्मचारिणीदेवी. जीवनामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी नियुक्त आचरण करणे आवश्यक असते. ब्रह्मचारिणीच्या उपासनेमुळे सर्व नीतिनियम पालन करण्याची मनोधारणा दृढ होते तसेच ब्रह्मचर्याचे सामर्थ्य प्राप्त होते. आपल्यामधील ब्रह्मस्वरूप ज्योतीची जाणीव होते. स्वभावामध्ये शूरपणा, निडरपणा, पराक्रमी वृत्ती वाढीस लागतात.
ब्रह्मचारिणी देवीला पांढरे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात. विशेष करून दूध व दुधाचे पदार्थ. तिला चमेली, कमळ ही पुष्पे प्रिय आहेत. या फुलांच्या माला तिला श्रद्धेने अर्पण केल्या जातात. शारदीय नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची उपासना करतात. त्या दिवशी कुमारी भोजन करण्याची प्रथा आहे. ज्या कुमारींच्या लग्न ठरले आहे परंतु अजून झाले नाही अशा कुमारिकांना या दिवशी बोलावून त्यांची पूजा करून भोजन घातले जाते. सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडशोपचार पूजन करावे.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाला काय म्हणतात?
नवरात्रीचा दुसरा दिवस - ब्रह्मचारिणी पूजा. नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीच्या पूजेला समर्पित आहे - नवदुर्गाचे दुसरे रूप. ती परमात्म्याच्या ज्ञानाने शाश्वत आनंद देते. ब्रह्मचारिणीला तपश्चरिणी, अपर्णा आणि उमा असेही म्हणतात. तसेच पूजनानंतर यथाशक्ती, यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते.
ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
ब्रह्मचारिणी देवीची महती
ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न-पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले. सर्व देवतांनी आणि ऋषी, मुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होते. विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला, तरी देवी प्रसन्न होते, असे म्हटले जाते. एकाग्रचित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात, असे सांगितले जाते.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कोणता प्रसाद दिला जातो?
नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे. या रूपात, देवी पार्वती एक महान सती होती आणि तिचे अविवाहित रूप देवी ब्रह्मचारिणी म्हणून पूजले जाते. ती चिकाटी आणि तपश्चर्याचे मूर्त स्वरूप आहे. देवीला तिच्या गुणांना मूर्त रूप देण्यासाठी साखरेचा प्रसाद अर्पण करा.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. माहिती संग्राहक याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know