Translate in Hindi / Marathi / English

Sunday, 22 October 2023

विजयादशमी | दसरा | श्रीराम | लंकापती रावण | महिषासुर | आयुधपूजा | देवी दुर्गा | आपट्याची पाने | शमीची पूजा | सरस्वती देवीचे पूजन

दसऱ्याच्या पौराणिक कथा


दसरा (विजयादशमी किंवा आयुधपूजा) हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी आयोजित केला जातो. भगवान श्रीरामाने या दिवशी लंकापती रावणाचा वध केला आणि देवी दुर्गेने नऊ रात्री दहा दिवसांच्या लढाईनंतर महिषासुराचा याच दिवशी पराभव केला होता. त्यामुळे असत्यावर सत्याचा विजय म्हणून दसरा साजरा केला जातो. म्हणूनच या दशमीला 'विजयादशमी' (दसरा = दशेहरा = 10 तारीख) असे म्हटले जाते.

कौत्स आणि वरतंतू ऋषी कथा

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पैठण नगरीत देवदत्त नावाचा एक ब्राह्मण राहायचा. त्याच्या मुलाचं नाव होतं कौत्स. लाडाकोडात वाढलेल्या कौत्साची मुंज झाली. मग पित्याने त्याला भडोच शहरातील वरतंतू ऋषींच्या आश्रमात्त विद्यार्जनासाठी पाठविले.

कौत्सासारखा हुशार, शिक्षणाची तळमळ असणारा विद्यार्थी आणि वरतंतूंसारखे ज्ञानसागर गुरु, मग काय विचारता! गुरुमुखातून सांडणारे ज्ञान वेचण्यात तपाचा काळ केव्हा संपला हे कौत्साला समजलेच नाही. तो चौदा विद्यांमध्ये पारंगत झाला. आश्रमातून स्वगृही निघाला.

गुरुजींनी आपल्याला हातचं काही राखून ठेवता विद्यादान केले. तेव्हा त्यांच्या ऋणांतून अंशतः मुक्त व्हावं म्हणून तो आपल्या गुरुजींना म्हणाला,

"आचार्य आपण मला सर्व शास्त्रांत पारंगत केलंत. खरंतर हे ऋण कधी फेडता येणार नाही. तरीदेखील आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची माझी इच्छा आहे. मी आपल्याला काय देऊ हे सांगितलंत तर उतराई होईन."

कौत्साच्या घरची अत्यंत गरिबीची परिसथिती लक्षात घेऊन वरतंतू त्याला म्हणाले,

"कौत्सा, तू विद्वान झालास. मी जे जे शिकवलं ते तू पूर्णपणे आत्मसात केलंस. याचा मला अतिशय आनंद झालाय. हा आनंदच माझी गुरुदक्षिणा आहे. मला तुझ्याकडून दुसरी कसलीच गुरुदक्षिणा नकोय. सुखी भव!"

वरतंतूंनी कौत्साला खूप समजावून पाहिलं. पण तो मुळीच ऐकेना. त्याचे आपले एकच पालुपद. तुम्ही मला गुरुदक्षिणा सांगा. त्याचा हट्टीपणा पाहून वरतंतू रागावले आणि म्हणाले.

"तू माझ्याकडून चौदा विद्या शिकलास. प्रत्येक विद्यासाठी एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा गुरुदक्षिणा म्हणू द्यावयास. मात्र एक अट आहे. या सगळ्या मुद्रा तू एकाच व्यक्तीकडून मिळविल्या पाहिजेस.

गुरुजींनी एवढी मोठी गुरुदक्षिणा मागितली म्हणून कौत्स मुळीच हताश झाला नाही. त्याने क्षणभर विचार केला कि एवढ्या मोठ्याप्रमाणात सुवर्णमुद्रा कोणाकडून आणाव्यात? आणि त्याच्या लक्षात आलं, विद्वानांना मान देणारा, त्यांना राजाश्रय देणारा आणि हवं तेवढं दान त्यांच्या पदरात टाकणारा रघुराजा आहे की! मग गुरुदक्षिणा कोठून मिळवायची हि काळजी कशाला? कौत्स रघुराजाकडे गेला. आणि राजाला म्हणाला,

हे राजन, आपल्या दातृत्वाचा कीर्तीसुगंध सर्वदूर पसरलेला आहे. म्हणून मी वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स आपल्याकडे याचक म्हणून आलो आहे. मला आपण चौदा कोटी सुवर्णमुद्रा दान द्याव्यात अशी माझी विनंती आहे. या सुवर्णमुद्रा मी स्वतःसाठी मागत नाही, तर माझ्या गुरुजींनी मागितलेली गुरुदक्षिणा देण्यासाठी हव्या आहेत. आपण मला रिक्त हस्ताने पाठवणार नाहीत अशी आशा आहे."

ब्राह्मणाची मागणी ऐकून राजा स्तंभित झाला. कारण त्याची मागणी फारच अवाढव्य होती. ती सहजपणे पुरवणे शक्य नाही. दारी आलेल्या अतीतिथीला रिक्त हस्ताने परत पाठवायचे नाही असा रघुराजाचा रिवाज होता हे खरं आहे, पण त्याने नुकताच "विश्वजित यज्ञ" केला होता. त्यावेळी त्याने ब्राह्मणांकडून सगळे द्रव्यभांडार लुटविले होते. म्हणून कोषागार रिकामे झाले होते. तरीदेखील आपल्याकडे आलेला अतिथी विन्मुख जावा हि गोष्ट राजाच्या मनास बरी वाटेना. तो कौत्सास म्हणाला.

"आपल्यासारख्या सखलशास्त्र पारंगत विद्वानांची मागणी ऐकून मी धन्य झालो. आपण लांबून आला आहात. थोडे दिवस आपल्या सेवेची आम्हाला संधी द्यावीत हि विनंती आहे.

रघुराजाची इंद्राकडे बरीच बाकी थकलेली होती. ती वसूल करावी आणि कौत्साला ती रक्कम दान द्यावी असा विचार करून राजाने लढाईची तयारी सुरु केली. इंद्रास दूताकरवी हि बातमी कळताच त्याने विचार केला. एवढ्यातेवढ्यासाठी लढाई करून दोन्ही पक्षांमधील जीवहानीची काय गरज? त्याने आपल्या भांडार प्रमुख कुबेराला आज्ञा दिली.

"रघुराजाच्या अयोध्या नगरीबाहेर आपट्याच्या वृक्षाचे जंगल आहे. उद्याच्या सूर्योदयापूर्वी त्यावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव कर.

अशा रीतीने राजाचे काम झाले. राजाने त्या सगळ्या सुवर्णमुद्रा कौत्साला दान म्हणून दिल्या. कौत्साने काटेकोरपणे मोजून त्यामधल्या फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रा स्वीकारल्या. जास्तीची एकदेखील सुवर्णमुद्रा स्वीकारायला तो तयार होईना.

एकदा दिलेले दान परत आपल्या कोषागारात ठेवणे रघुराजाला पसंत पडेना. त्याने सगळ्या मोहोरांचे ढीग झाडांखाली घालून ठेवले आणि पौरजणांना त्या सुवर्ण मुद्रा लुटून नेण्यास सांगितले. लोकांनी राजाच्या सीमेबाहेरच्या वनातील आपट्याच्या झाडांखाली ढिगाने ठेवलेल्या मोहोरा तुटल्या. कित्येकांना तो धनभार पेलवेना. आणताना ठिकठिकाणी कितीतरी सुवर्णमुद्रा सांडल्या.

तो दिवस दसऱ्याचा होता. त्या दिवसापासून सोनं म्हणून आपट्याची पाने देण्याचा आणि ती आणण्यासाठी सीमोल्लघन करण्याची प्रथा सुरु झाली. ती आजपर्यंत चालू आहे.

रघुराजासारखा दानशूर, विद्वानांचा आश्रयदाता, कीर्तिवंत, गुणवंत राजाच्या घराण्यातच श्रीरामांसारखे ईश्वर जन्माला आले. धन्य ते इक्ष्वाकू कुल.

धन्य तो तेजस्वी तपस्वी कौत्स. गुरुजींनी सांगितली एवढी मोठी दक्षिण त्यांना देणारा. चौदा कोटी सुवर्णमुद्रा दिल्यानंतर स्वतःसाठी एकदेखील मुद्रा ठेवणारा. निर्मोही.

विजयादशमीला शमीची पूजा करण्याचे कारण

पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले, अशी कथा आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते. विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात.

विजयादशमीला प्रभू रामाने रावणाचा वध केला

राक्षस राजा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा प्रभू रामाने आपल्या पत्नीला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याच्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. भगवान हनुमान आणि त्यांच्या वानर सेनेच्या मदतीने, भगवान राम आणि भगवान लक्ष्मण लंकेत पोहोचले आणि रावणाने स्थापन केलेल्या राक्षसांच्या प्रचंड सैन्याशी लढले. रावणाचा भाऊ कुंभकरण आणि त्याचा मुलगा मेघनाथ हे देखील युद्धाच्या वेळी लढायला आले आणि शेवटी मारले गेले. खडतर लढा दिल्यानंतर अश्वनी मास शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध केला. हा दिवस विजयादशमी म्हणून संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतींनी दसरा सण म्हणून साजरा केला जातो.

विजयादशमी दिवशी सरस्वती देवीचे पूजन

विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जाऊन शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची परंपरा आहे. तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करुन प्रार्थना करावयाची असते की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा असते.  

या दिवशी मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते. सरस्वती देवीला विद्येची आराध्यदैवत मानलं जात असल्याने विद्यार्थी आपल्या पुस्तकांची पूजा करतात. साहित्यिक, ग्रंथकार आपल्या ग्रंथाची पूजा करतात. ज्या गोष्टींपासून आपल्याला ज्ञान मिळते त्या सर्व गोष्टींची पूजा करता येते.

सारांश

दसरा हा आनंद आणि विजयाचा सण आहे. भारतीय संस्कृती ही शौर्याची उपासक आहे. दसऱ्याचा सण आयोजित केला जातो, जेणेकरून व्यक्ती आणि समाजामध्ये शौर्य आणि शक्ती प्रकट होईल. दसऱ्याचा सण दहा प्रकारच्या पापांचा त्याग करण्याची प्रेरणा देतो- वासना, क्रोध, लोभ, मोह, वेडेपणा, मत्सर, अहंकार, आळस, हिंसा आणि चौर्य.

(टीपया लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. माहिती संग्राहक याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know