Translate in Hindi / Marathi / English

Saturday, 28 October 2023

कानाची स्वच्छता आणि काळजी | EAR CLEANING AND CARE | EARPLUGS | EARWAX | BACTERIA | EARDRUM | ALLERGIES | INFECTIONS | SWIMMING | HYGIENE

कानाची स्वच्छता आणि काळजी

 

कानांची स्वच्छता आणि त्यांची एकूण काळजी कशी घ्यावी?

कान हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा घटक आहे. ऐकण्याची महत्त्वाची प्रक्रिया कानाद्वारे केली जाते. कान जर चांगल्या पद्धतीने काम करत नसेल तर आपल्याला ऐकायलाच येणार नाही आणि त्यातून येणाऱ्या अडचणी या फारच त्रासदायक असू शकतात. अनेकांना ऐकू येण्याचा किंवा कमी ऐकू येण्याचा त्रास असतो.

ते याबाबत अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. काहीजणांच्या कानातून घाण येणं, रक्त येणं वा कान दुखणं अशाही समस्या काहींना असतात. अशाप्रकारच्या समस्या देखील प्रचंड त्रासदायक असतात. कारण, कान जर व्यवस्थित नसेल तर त्याचा संपूर्ण शरीरावरच परिणाम होतो. त्यामुळेच, कानाचं आरोग्य चांगलं असणं देखील फार म्हणजे फार गरजेचं असतं.

चांगल्या पद्धतीने ऐकण्यासाठी आणि कानाचे संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी आपल्या कानाची काळजी घेणं महत्वाचं आहे. आपले कान निरोगी ठेवण्यासाठी आम्ही काही टिप्स देणार आहोत.

कानांचे रक्षण करा

मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्याने तुमची श्रवणशक्ती कालांतराने खराब होऊ शकते. जेव्हा तुम्ही मोठ्या आवाजाच्या वातावरणात असाल, जसे की मैफिली, स्पोर्ट्स इव्हेंट किंवा पॉवर टूल्स वापरताना इअरप्लग किंवा इअरमफ वापरा. यामुळे, तुमच्या कानांचं संरक्षण होईल. अति आवाजात जाणं शक्यतो टाळायलाच हवं. मात्र, काहीवेळा हे टाळणं शक्य नसतं. अशावेळी हे उपाय गरजेचे ठरतात.

कान सुरक्षितपणे स्वच्छ करा

तुमच्या कानात सेल्फ-क्लिनींग मेकॅनिझम आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या कानाचा बाहेरील भाग वॉशक्लोथने स्वच्छ करावा लागेल. तुमच्या कानाच्या आतील भागामध्ये कापूस किंवा इतर तत्सम वस्तूंसारखं काहीही घालू नका. कारण त्यामुळे तुमच्या कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते किंवा इअरवॅक्स पुढे ढकलले जाऊ शकते. (इअरवॅक्स, ज्याला वैद्यकीय संज्ञा "सेरुमेन" नावानेओळखले जाते, हा एक मेणासारखा पदार्थ आहे जो मानव आणि इतर सस्तन प्राण्यांच्या कानाच्या आतील पोकळीमध्ये स्रावित होतो. इअरवॅक्स तपकिरी, नारिंगी, लाल, पिवळसर आणि राखाडी यासह अनेक रंगांचे असू शकतात. इअरवॅक्स मानवी कानाच्या पोकळ भागात त्वचेचे संरक्षण करते, साफसफाई आणि स्वरक्षणासाठी मदत करतो आणि बॅक्टेरिया, बुरशी, कण आणि पाण्यापासून संरक्षण प्रदान करतो.)

कानात बाहेरच्या वस्तू घालणं टाळा

कापसाचे तुकडे, पेन्सिल अशा वस्तू कानात घालू नका. तुमच्या कानाच्या आतील भागामध्ये किंवा कानाच्या पडद्याला हानी पोहोचवणारी इतर कोणतीही वस्तू घालू नका. त्याचा खरोखरच तुमच्या कानाला धोका निर्माण होऊ शकतो. कानाच्या आतील भाग हा प्रचंड नाजूक आणि संवेदनशील असतो. त्याचा थेट परिणाम तुमच्या श्रवणक्षमतेवर होऊ शकतो.

कानाच्या संसर्गावर त्वरीत उपचार करा

जर तुम्हाला वेदना, स्त्राव किंवा कानाच्या संसर्गाची इतर कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना भेटा. कानाच्या उपचारात उशीर केल्याने गुंतागुंत निर्माण होऊ शकते किंवा तुमच्या श्रवणशक्तीला कायमचे नुकसान होऊ शकते.

कानाची ऍलर्जी मॅनेज करा

ऍलर्जीमुळे तुमच्या कानाच्या आतील भागामध्ये जळजळ होऊ शकते. त्यामुळे ऐकायला येण्याची क्षमता कमी होऊ शकते किंवा कानात संक्रमण होऊ शकते. कानाच्या समस्या टाळण्यासाठी औषधोपचार घ्या किंवा इतर उपायांनी तुमची ऍलर्जी मॅनेज करा.

कान कोरडे ठेवा

तुमच्या कानात ओलावा असल्याने इन्फेक्शन किंवा कानाच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात. पोहल्यानंतर किंवा अंघोळ केल्यानंतर आपले कान कोरडे करण्यासाठी टॉवेल किंवा कमी सेटिंगवर ड्रायर वापरा.

औषधांचे सेवन काळजीपूर्वक करा

काही औषधे जी आपण शरीराच्या इतर अवयवांसाठी सेवन करतो त्यामुळे जर आपणास ती उष्ण पडत असतील तर ती उष्णता कानाच्या आतील भागात सूज अथवा रॅशेस पडून व्यक्त होते. अशी औषधे डॉक्टरांकडून बदलून घ्यावीत. तसेच भविष्यात अश्या औषधांचे सेवन टाळावे.

नियमित श्रवण तपासणी करा

नियमित श्रवण तपासणी कोणत्याही समस्या लवकर ओळखता येऊ शकते आणि तुमचे श्रवण आरोग्य व्यवस्थापित करण्यात मदत होऊ शकते.

कानांची स्वच्छता कशी करायची?

कानांची योग्य स्वच्छता राखणं आणि आपले कान नियमितपणे स्वच्छ करणं फार महत्वाचं आहे. मात्र, कानाच्या होलाला किंवा कानाच्या पडद्याला इजा होऊ नये म्हणून सुरक्षित आणि सौम्य पद्धतीने असं करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कानाच्या स्वच्छतेच्या बाबतीत विचारात घेण्यासारखे काही महत्त्वाचे मुद्दे.

कानाचे सेल्फ-क्लीनिंग मेकॅनिझम

कानांमध्ये सेल्फ-क्लीनिंग मेकॅनिझम असते जी नैसर्गिकरीत्या कानातले मेण आणि इतर घाण काढण्यास मदत करते. बोलण्याची आणि चघळण्याची प्रक्रिया यांसारख्या तोंडाच्या ऍक्टीव्हीटींदरम्यान जबड्याच्या हालचालीमुळे कानातले मेण कानाच्या होलातून बाहेर ढकलण्यात मदत होते.

कानात कोणतीही वस्तू घालू नका

आपल्या कानाच्या होलामध्ये कॉटन स्वॅब्स, बॉबी पिन किंवा इतर कोणत्याही लहान वस्तू यांसारख्या वस्तू घालणं कटाक्षाने टाळणं फार महत्वाचं आहे. असं केल्याने इअवरवॅक्स आत खोलवर ढकलले जाऊ शकते. त्यामुळे, कदाचित कानाच्या आत आघात, दुखापत किंवा संसर्ग होऊ शकतो. याव्यतिरिक्त, यामुळे कानाच्या नाजूक संरचनेचे नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे, अशी रिस्क घेणं टाळा.

बाह्य कानाची स्वच्छता

तुम्ही तुमच्या कानाचा बाह्य भाग, ज्याला ऑरिकल किंवा पिना म्हणून ओळखले जाते, त्याची स्वच्छता सहज करु शकता. त्याची स्वच्छता मऊ कापड किंवा टिश्यूने करू शकता. कोणतीही दिसत असलेली घाण काढण्यासाठी बाहेरील कान आणि कानाच्या रचनेतले खड्डे हलक्या हाताने पुसून घ्या.

इअरवॅक्स मॅनेजमेंट

इअरवॅक्स, किंवा सेरुमेन, धूळ, घाण आणि बॅक्टेरियापासून कानाच्या कालव्याचे संरक्षण करण्यासाठी कानाद्वारे तयार केलेला एक नैसर्गिक पदार्थ आहे. कानातले मेण नैसर्गिकरित्या कानाच्या होलाच्या बाहेर पडते. जर कानातले जास्त प्रमाणात तयार झाले किंवा अस्वस्थता निर्माण झाली, तर थेट डॉक्टरांचा घेणं चांगलं ठरेल. ते योग्य टेक्निक आणि उपकरणे वापरून अतिरिक्त कानातले सुरक्षितपणे काढू शकतात.

इअर इन्फेक्शन किंवा अस्वस्थता

जर तुम्हाला कानात वेदना, खाज सुटणे, स्त्राव, श्रवण कमी होणे किंवा कानात आवाज येणे इत्यादी गोष्टी जाणवत असतील तर तुम्ही थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला वैद्यकीय मदत घ्यायचीही गरज लागू शकते. ही लक्षणे कानातील संसर्ग असल्याचं लक्षण दाखवू शकतात. यासाठी योग्य निदान आणि उपचार आवश्यक आहेत.

अचानक दुखापतीमुळे कानाचा पडदा फाटणे

कानाला अचानक दुखापत झाल्यामुळे कानाचा पडदा खराब होतो आणि त्यामुळे लोक बहिरेपणाला बळी पडतात. कानाला दुखापत अनेक प्रकारे होऊ शकते, जसे की कानात काडी किंवा हेअरपिन घालण्यामुळे होणारी दुखापत. कानाच्या दुखापतीकडे दुर्लक्ष केल्याने बहिरेपणापासून ते इतर अनेक गंभीर कानाच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. ही दुखापत नंतर गंभीर होऊ शकते.

कानाच्या दुखापतीवर उपचार

कानात दुखापत झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, कानाचा पडदा फाटण्याचा धोका असतो. दुखापत झाल्यानंतर कानात संसर्ग आणि ऍलर्जीचा धोकाही असतो. यासाठी कानांची काळजी घेणे आवश्यक आहे. दुखापत झाल्यास डॉक्टरांना नक्की भेट द्या.. कानाच्या पडद्याला झालेली किरकोळ दुखापत एक ते दोन आठवड्यांत बरी होते.

परंतु काही प्रकरणांमध्ये, कानातल्या जखमा दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया देखील आवश्यक असू शकते. कानाला झालेल्या दुखापतीच्या तीव्रतेच्या आधारावर डॉक्टर रुग्णावर उपचार करतात. डॉ गुलाटी सांगतात की कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास ती फक्त ईएनटी तज्ज्ञांनाच दाखवा.

सारांश

आपण आपले कान निरोगी ठेवण्यास मदत करू शकता. श्रवणक्षमता कमी होणे आणि कानाच्या इतर समस्या देखील तुम्हाला टाळता येतील. तुम्हाला तुमच्या श्रवणक्षमतेबद्दल किंवा कानाच्या आरोग्याबद्दल काही चिंता असल्यास, तुमच्या डॉक्टरांशी किंवा ऑडिओलॉजिस्टशी बोला. कान स्वच्छ करण्याच्या बाबतीत सॉफ्ट आणि सुरक्षित पद्धतींचा वापर करणं ही मुख्य गोष्ट आहे. कानाचे आरोग्य राखण्यासाठी आणि संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी नियमित स्वच्छता, बाह्य कानांची स्वच्छता ​​करणे आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांची मदत घेणं फार आवश्यक आहे.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know