Translate in Hindi / Marathi / English

Thursday, 14 March 2024

जेवणाचे ताट कसे वाढावे | जेवणाचे नियम व वाढण्याच्या पद्धती | ताट कसे वाढावे हे आई आपल्या मुलांना शिकवीत असते | पाणी देखील कधीही ताटाच्या उजव्या हाताला ठेवू नये | आयुर्वेदातसुद्धा अन्न कसे वाढावे, आधी काय खावे याबद्दल काही नियम सांगितले आहेत | ताक द्रव पाचन करणारे असल्याने जेवणाच्या शेवटी घ्यावे

जेवणाचे ताट कसे वाढावे

 

जेवण ही आपली दररोजची गरज आहे. आपण जेवण वाढताना किंवा जेवण वाढून घेताना कोणता पदार्थ कुठे आहे ह्याकडे लक्षच देत नाही. परन्तु जेवणाचे ताट हे खाली दाखवल्या प्रमाणे असले पाहिजे.

जेवणाचे नियम व वाढण्याच्या पद्धती

ताट कसे वाढावे हे आई आपल्या मुलांना शिकवीत असते. बऱ्याच वेळा आईचे बघून बघून मुलं शिकतात. पंगतीत ताट वाढण्याची एक लय असते. एका विशिष्ट पद्धतीने वाढपी न बोलता पटापट अन्नपदार्थांनी ताट सजवत असतात. ताटाचे साधारणपणे दोन भाग केलेले आपल्या लक्षात आले असेलच. त्यात उलट सुलट करण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास लिंबू, चटणी यासारखे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जाण्याचा मुख्य पदार्थावरची इच्छा कमी होण्याचा धोका संभवतो. त्याचप्रमाणे, पाणी देखील कधीही ताटाच्या उजव्या हाताला ठेवू नये, अन्यथा उष्ट्या हाताने पाणी पिण्याची वेळ येईल व्यवस्थित वाढलेले ताट बघितले की भूक वाढते. याचा अनुभव प्रत्येकाने घेतलाच असेल. आयुर्वेदातसुद्धा अन्न कसे वाढावे, आधी काय खावे याबद्दल काही नियम सांगितले आहेत. अर्थात या नियमांमागे शास्त्र आहे. त्याचे शरीरावर, पचन संस्थेवर परिणाम होतात म्हणून ते पाळणे महत्त्वाचे ठरते.

पेय पदार्थ उदा. पाणी, ताक हे ताटाच्या डाव्या बाजूस ठेवावे.

चटण्या, कोशिंबीर इत्यादी पदार्थ ताटाच्या डाव्या बाजूस वाढावे.

भात /पोळी असे पदार्थ ताटाच्या मधोमध ठेवावे.

दातांनी तोडून चावून खाण्याचे पदार्थ उदा. लाडू, वडे असे पदार्थ ताटाच्या उजव्या बाजूला वाढावे.

भोजनाच्या सुरुवातीला गोड, तूप घातलेले स्निग्ध पदार्थ खावेत. कारण जठराग्नी तीव्र असते. त्यामुळे गोड पचायला जड पदार्थ सुरुवातीला घ्यावे. खीरपुरी, श्रीखंडपुरी, पुरणपोळी, आंब्याचा रस, हलवा असे सर्वच पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला ग्रहण करावे. आधी गोड खाल्ल्याने आपोआप बाकी जेवण योग्य प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे पाचनावर ताण पडत नाही. आजकाल आधी गोड खाल्ले तर बाकी गोष्टी खाता येणार नाही असे म्हणत तिखट चटपटीत पदार्थ आधी घेतले जातात शेवटी गोड खाल्ले जाते. त्यामुळे पाचन बिघडते.

ताटात मीठ जरूर वाढावे. भाज्या आणि वरण उजव्या हाताला तर लोणचे, पापड, कोशिंबीर इत्यादी डाव्या हाताला. भात वाढताना तूप वाढायचे विसरायचे नाही. वरण जर भातावर वाढणार असाल तर त्याचे ओघळ अन्य पदार्थात जाणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. खरकट्या हाताने जेवण वाढू नये. कोरडी पदार्थ बघा डाव्या बाजूला ठेवलेल्या आहेत, आणि ओली पदार्थ (डाळ, भाजी, आमटी वैगरे.) उजव्या बाजूला ठेवलेल्या आहेत. कारण उजव्या हाताने जेवत असताना आधी चपाती तोडून भाजीत मिसळून खाली तापकत अगदी कमी अंतरात मुखा पर्यंत घास जायला हवा म्हणून.

मीठ, लिंबू आणि चटणी बघा अगदी समोरच्या वरच्या टोकाला ठेवलेलं आहेत. यामागील तथ्य हे आहे की, ही पदार्थ प्रत्येक जण आपापल्या परीने खात असतो. जेवनाच हातापासून दूर ठेवलेले आहे कारण चुकीने ते लक्ष नसताना खाल्ले गेले तर फजिती होऊ शकते.

कोशिंबीर-लोणचं आणि पापड बघा डाव्या बाजूला वरील बाजूस ठेवलेलं आहे. कारण ही पदार्थ चवीला थोडेसे वळण देण्यासाठी असतात अधूनमधून, जेवणाऱ्या व्यक्तीला जर ही पदार्थ हाताजवळ ठेवलीत तर तो हीच पदार्थ आधी संपवेल. मुळात त्यांना थोडे थोडे जेवतांना अधून मधून खायला हवे म्हणून ती उजव्या हातापासून दूर ठेवलेली आहेत.

गोड मिष्टान्न बघा उजव्या बाजूला वरच्या बाजूस ठेवलेले आहेत. ह्यामागील एक तर्क पण होऊ शकतो की, ह्या पदार्थांना देखील थोडे थोडे करूनच खायची आहेत. पण तिखट खाल्यानंतर जास्त त्रास नको म्हणून थोडेसे हाताजवळ ठेवलं की बरं होत.

दहीभात- गोडभात- डाळभात आणि मसाले भात बघा ! त्यांना ही मसाले भात पासून क्रमाने खायचे असते. कारण आधी मसालेदार भात खाल्यानंतर त्याहून सौम्य म्हणजे डाळ भात खावा त्या नंतर गोड भात खाल्यानंतर शेवटी दही भात खावा. अश्या अनुक्रमे खाल्यामुळे जेवताना समतोल राखला जातो.

जेवणाच्या शेवटी

जेवणाच्या मध्ये आंबट, खारट, तिखट, कडू पदार्थ खावेत म्हणजे भाज्या, कोशिंबीर, आमटी इत्यादी पदार्थ.

सर्वांत शेवटी ताक घ्यावे. ताक द्रव पाचन करणारे असल्याने जेवणाच्या शेवटी घ्यावे. तक्रसेवी व्यथते कदाचित्। भोजन शेवटी ताक पिणाऱ्यांना कधीच पाचनाचे त्रास होत नाही. अर्थात हे ताक ताजे नुकत्याच विरजलेल्या दह्याचे असावे. पोट तडीस किंवा गळ्यापर्यंत अन्न येईल असे जेवू नये. हातात ताट घेऊन किंवा हातावर अन्न घेऊन जेवू नये.

जेवणानंतर हात स्वच्छ करून दातात अडकलेले कण दंतशलाकाने (टूथपीक) साफ करावे. तोंडातील लाळ, वास निघण्याकरिता चूळ भरावी. बोटांच्या पेरांनी नेत्र धुवावे. नंतर ताम्बूल विडा घेऊन मुखशुद्धी करावी.

शतपावली करून डाव्या कुशीवर थोडा आराम करावा. पातळ पेय पदार्थ जास्त घेतले असतील तर झोपू नये. जेवणानंतर लगेच गाडी चालविणे, वाहनात बसणे, अग्नी जवळ बसणे, उन्हात बसणे वर्ज्य करावे.

कदाचित या सर्व गोष्टी अनेक जण पाळतही असतील. काहींना माहिती असेल; पण कामामुळे जमत नसेल. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे की, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म.

मांसाहारी जेवणाला नमस्कार

आपण जेवणाच्या ताटाला नमस्कार करतो कारण आपली तशी भारतीय संस्कृती आहे पण मांसाहारी जेवणाला नमस्कार करणे योग्य आहे का?

वदनी कवळ घेता,नाम घ्या श्री हरीचे

सहज हवन होते नाम घेता फुकाचे

जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

असा श्लोक म्हणून अन्नाला नमस्कार करून जेवणाला सुरुवात करावी अशी आपली परंपरा आहे. त्यात जेवणे म्हणजे केवळ पोट भरणे नसून ते एक पोटातील क्षुधा (भूक) रुपी अग्नी अन्न रुपी आहुती देवून करण्याचे यज्ञ कर्म मानले आहे.

यज्ञात पूर्वी पशू बळी ही दिले जात आणि त्यांचे मांस सेवन ही केले जायचे. त्यामुळे तेही यज्ञकर्म मानून मांसाहारी भोजना ला सुद्धा नमस्कार करायला हरकत नाही.

चमच्याने जेवणे आणि हाताने जेवणे

सजीव व्यक्तीमध्ये निर्जीव वस्तूंपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य असते. चमचा धातूचा असल्याने, तसेच तो निर्जीव असल्यामुळे त्याच्यामध्ये सात्त्विकता आणि चैतन्य अल्प प्रमाणात आहे. या उलट मनुष्यप्राण्याची किमान सात्त्विकता २० टक्के असते. त्याच्या पाचही बोटांतून पंचतत्त्वांशी संबंधित शक्ती प्रवाहित होत असते. जेव्हा व्यक्ती हाताने जेवते, तेव्हा तिच्या हाताच्या पाचही बोटांतून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता तिच्या हातातील ग्रासाकडे (घासामध्ये) प्रवाहित होते आणि तिने अन्न ग्रहण केल्यावर ही सात्त्विकता पुन्हा तिच्या देहात जाते. अशा प्रकारे शक्तीपातयोगानुसार व्यक्तीकडून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आणि शक्ती तिला पुन्हा मिळते. या उलट चमच्याचा वापर केल्याने व्यक्तीच्या पाचही बोटांतून प्रवाहित होणारी शक्ती अंगठा आणि तर्जनी यांच्या माध्यमातून चमच्यामध्ये प्रविष्ट होऊन चमच्यातील रज-तम न्यून करण्यासाठी व्यय होते. त्यामुळे तिला स्वत:ची सात्त्विकता ग्रहण करता येत नाही. या उलट चमच्यातील रज-तमात्मक स्पंदने चमच्यातील अन्नकणांमध्ये जातात आणि तिला अन्नातून रज-तमात्मक शक्ती मिळते. त्यामुळे तिला चमच्याने खाल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर लाभ न होता उलट तिची हानीच होते. त्यामुळे व्यक्तीने चमच्याने अन्न ग्रहण करण्यापेक्षा हाताने ग्रहण करणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक योग्य आहे.  असे जरी असले, तरी त्वचा रोग, हाताच्या बोटांना इजा झालेली असेल किंवा सूप, खीर यांसारखे पातळ पदार्थ ग्रहण करत असतांना व्यक्तीने हातापेक्षा चमच्याने अन्न ग्रहण करणे अधिक योग्य आहे. वरील अपवादात्मक परिस्थिती वगळता, व्यक्तीने हाताने अन्न ग्रहण करणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहे.

सारांश

जेवण ही आपली दररोजची गरज आहे. आपण जेवण वाढताना किंवा जेवण वाढून घेताना आपण किती वेळा कोणता पदार्थ कुठे आहे ह्याकडे लक्षच देत नाही. परन्तु जेवणाचे ताट हे वर दाखवल्या प्रमाणे असले पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृति प्रमाणे पूर्वी आपली ताटे अशी वाढली जात होती.  जेवताना अन्नास नावे ठेवू नये. हवे तेवढेच घ्यावे .पोटास तड लागेल इतके जेवू नये.जेवण सावकाश म्हणजे पोटात अवकाश ठेवून जेवावे. आरोग्यदृष्टीने पोटाचे दोन भाग अन्नासाठी,एक भाग पाण्यासाठी एक भाग हवेसाठी ठेवावा .त्यामुळे पचन चांगले होते. ताटात अन्न टाकू नये. अन्न हे परब्रह्म आहे .

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know