Translate in Hindi / Marathi / English

Saturday, 13 January 2024

पाण्याची चिकित्सा व औषधी उपयोग | पाणी अर्थात मनुष्य जीवनाची संजीवनी | प्रदुषणामुळे पाण्याचे घटते महत्व | सध्या निसर्गोपचाराकडे म्हणजेच नॅचरोपॅथीकडे कल वाढत आहे | नॅचरोपॅथीमधील एक महत्वाचा घटक म्हणजे पाणी | शारीरिक तंत्राची कार्यक्षमता कायम राखण्यात पाण्याची भूमिका खूप महत्त्वाची असते

पाण्याची चिकित्सा व औषधी उपयोग

 

पाणी अर्थात मनुष्य जीवनाची संजीवनी

पाण्याशिवाय जीवन शक्यच नाही. फार पुरातन काळी पाणी हे प्रदुषित नव्हते त्यामुळे काही आजार हे आपोआप शुद्ध पाण्यामुळे नाहीसे होत. त्या काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमातील वाहणारे पाणी पीत. तसेच त्याच पाण्याचा उपयोग शेती घरातील कामांसाठी होत असे. वृक्षांची दाट गर्दी चोहीकडे होती. त्यामुळे निसर्गाचा समतोल योग्य होता. पण हल्लीच्या काळात मात्र हे चित्र फार बदलले आहे.

प्रदुषणामुळे पाण्याचे घटते महत्व

प्रदुषणामुळे पाण्याचे महत्व सांगण्याची वेळ आलेली आहे. पूर्वी नकळतपणे पाणी उपचार करत होते. लोकसंख्याही कमी होती आणि वाढते शहरीकरण नव्हते. सर्वत्र माणसे राहत होती. त्यामुळे एकाच भागावरती म्हणजेच एकाच प्रदेशावर जोर नव्हता. म्हणजेच राहणीमानाचा सुद्धा समतोल होता. आजकाल शहराकडेच जास्त लोक राहण्याकडे आकर्षित होतात. आणि खेडी ओस पडतात. त्यामुळेही शहरात शुद्ध पाण्याची समस्या हा उग्र स्वरूप धारण करणारा प्रश्न बनत आहे. अनेक प्रचलित चिकित्सापद्धती आहेत त्यामध्ये अलीकडे निसर्गधारेकडे लोक वळत आहेत. कमी खर्चाची आणि योग्य परिणाम करणारी चिकित्सा पद्धती म्हणून सध्या निसर्गोपचाराकडे म्हणजेच नॅचरोपॅथीकडे कल वाढत आहे. ही नॅचरोपॅथी समजून घेणे आणि मग रोगांवर उपचार करणे आवश्यक आहे.

त्यासाठीच आपण नॅचरोपॅथीमधील एक महत्वाचा घटक म्हणजे पाणी. जलनीती म्हणजेच जलचिकित्सा ही एक अति-उपयोगी चिकित्सापद्धती आहे. ती पंचतत्त्वावर आधारित आहे. पंचतत्त्व म्हणजे पाणी, हवा, प्रकाश पृथ्वी, आकाश. या पंचतत्त्वांचे आपले शरीर बनलेले आहे. म्हणजेच पिंडी ते ब्रम्हांडी अशी आपल्या शरीराची रचना आहे. म्हणूनच आपल्या शरीरावर या पंचतत्त्वांचा सतत परिणाम होत असतो. निसर्गाने आपले शरीर निर्माण केले ते बिघडण्यासाठी नव्हे पण आपण निसर्गाविरूद्ध गोष्टी करून आपल्या शरीराला क्लेश देतो. आणि मग कोणत्यातरी रोगाचे आपले शरीर शिकार होते. म्हणूनच निसर्गोपचार तज्ञांच्या मते आपण जर पंचतत्वांचा वापर आपल्या शरीरांवर उपचार केल्यास उपचार उत्तम होतो.

दैनंदिन जीवनात पाणी

दैनंदिन जीवनात पाणीहा एक मुख्य घटक आहे. आयुर्वेदाच्या ग्रंथात पाण्याचे महत्त्व विशद केले आहे. वेदामध्ये पाण्यासंबंधी म्हटले आहे की, “जल हे जगातील सर्व प्राणिमात्रांचे औषध आहे. संजीवनी आहे.’ मनुष्याचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे पाणी हेच माणसाचेजीवन आहे म्हणूनच पाण्याला जीवन म्हटले आहे. सर्व जगात 3 भाग पाणी तर 1 भाग जमीन आहे. आपल्या शरीरातही पाण्याचे प्रमाण 2/3 इतके आहे.

मानवी शरीराला प्रत्येक चयापचय क्रियेसाठी पाण्याची जरूरी असते. आपण जे पाणी पितो त्यातील आवश्यक तेवढे शरीर ग्रहण करते. बाकी पाणी शरीरातील घाणीसह मूत्रावाटे घामावाटे ते शरीराच्या बाहेर निघून जाते.

अशावेळी पुन्हा पाणी पिऊन शरीराचे संतुलन बरोबर ठेवावे लागते आणि ते ठेवले नाही तर माणसाला कोणत्यातरी व्याधीना सामोरी जावे लागते. अति पाण्याचे सेवन आणि कमी पाण्याचे सेवन दोन्ही ही वाईटच.

अलीकडच्या जगात प्रत्येकाला भरपूर शुद्ध पाणी मिळणे आवश्यक आहे. शुद्ध निर्जंतुक पाणी आरोग्यकारक असतेच. अलीकडे शुद्ध पाण्याचा अभाव होऊन पाणी दूषित होत आहे.

प्रवासात पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी? काही वेळा आपल्याला पाण्याच्या निर्जंतुकते विषयी शंका येते बऱ्याचदा प्रवासात इथले तिथले पाणी प्यायला नकोसे वाटते.

अशावेळी काय करावे तर आपणांवर प्रवासात कुठलेही पाणी पिण्याचा प्रसंग आला तर त्यात अर्धे किंवा एक लिंबू पिळून ते पाणी प्यावे म्हणजे ते पाणी शरीर स्वच्छ ठेवते. रोगजंतूची बाधा लिंबामध्ये आम्ल पदार्थ असल्यामुळे रोगजंतूची बाधा होत नाही.

पाण्याचे प्रकार आणि चिकित्सा:

आपण जे अन्न खातो, भाजीपाला, दूध, दही, फळे खातो त्यातसुद्धा जवळजवळ साठ टक्के पाणी असते शरीराकरता त्याची आवश्यकता असते. पाण्याचे 4 प्रकार आहेत. 1) थंड पाणी 2) अति थंड पाणी 3) कोमट पाणी 4) गरम पाणी ह्या चारही प्रकारच्या पाण्याची चिकित्सा योग्य पध्दतीने निसर्गोपचार शास्त्रात नमूद केली आहे.

थंड पाणी याचा अर्थ आपण जे रोज वापरतो ते अर्थात विहिरीचे, नळाचे किंवा नदीचे जे पिण्यासाठी जे पाणी वापरतो ते.

अति थंड पाणी म्हणजे फ्रीजचे किंवा बर्फाचे पाणी. हे पाणी सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात बरे वाटते.पण तरीही इतर वेळी बर्फाच्या पाण्याचा ऊठसूठ म्हणजे जास्त प्रमाणात वापर करू नये. त्यामुळे रक्त गोठते, शरीराच्या क्रिया मंदावतात, पचनशक्ती कमी होते. पण आपण हे जुमानता सतत कोल्ड्रींक्, फ्रीज मधील थंड पाणी सरबतांमध्ये बर्फाचे तुकडे सर्रास वापरतो. आपल्या पचनशक्तीचा वेग हळूहळू मंदावत असतो. आणि नकळतपणे आपण रोगांना सामोरे जातो. अति थंड पाण्यामुळे मांसपेशी किंवा पोटातील पेशी आतडे आकुंचित होते.

नैसर्गिक क्रियेवर त्याचा थोडा थोडा परिणाम होत जातो. म्हणून अति थंड पाण्याचा वापर टाळावा. निसर्गोपचार तज्ञ म्हणतात अति थंड पाणी अजिबात पिऊ नका. फ्रीजमध्ये महिनोनमहिने ठेवलेल्या आइस्क्रीम आणि कोल्ड्रींक्सचा वापर शरीराला घातक आहे.

कोमट पाणी याचा अर्थ जास्त थंड नाही जास्त गरम नाही असे हे पाणी शरीराच्या तापमानाइतके ते उष्ण असते. अशा पाण्यानेच स्नान करावे. त्यामुळे स्नायू शरीरातील पेशींवर त्याचा चांगला परिणाम होतो. थकवा नाहीसा होतो शरीराच्या अवयवांना आराम मिळतो.

निद्रानाशावर घरगुती उपाय:

निद्रानाशावर कोमट पाण्यात मीठ घालून पावले त्या पाण्यात सोडून शरीर जर ब्लॅकेटने लपेटून घेतले आणि माथ्यावर गार पाण्याची पट्टी ठेवली असता निद्रानाशाचा विकार नाहीसा होतो. शरीराला आराम मिळून चांगली झोप येते. तसेच गरम पाणी हे स्नानाकरिता अंगदुखीवर अवयवांना शेक देण्याकरिता उपयोगी आहे. पण तरीही गरम पाण्यापेक्षा थंड पाणी शरीराला जास्त लाभदायक आहे.

निसर्गोपचार तज्ञांच्या मते गरम पाण्याचा जास्त वापरू करू नये. शरीराच्या उपयोगाकरिता वापरणारे पाणी हे शरीराच्या तापमानाइतकेच उष्ण असावे.गरम पाण्याने होणारे नुकसान थंड पाणी भरून काढते. गरम पाण्याने स्नान केले तरी शेवटी थंड पाणी डोक्यावर शरीरावर घ्यावे. गरम पाण्यामुळे शक्ती क्षीण होते तर थंडपाणी स्नानात वापरल्याने शक्ती वाढते. शरीरातील ग्रंथी प्रसरण पावतात त्यामुळे थंड पाण्याने स्नान करताच उत्साह, शक्ती वाढते. कोमट पाण्याने नुकसान होत नाही. पण शक्यतो थंड पाण्याने स्नान करावे असे जलचिकित्सेत सांगितले आहे.

पाणी चिकित्सा एक प्रभावी शास्त्र:

प्राकृतिक चिकित्सचे उपचार सोपे सरळ आहेत. त्यापासून नुकसान होत नाही. या चिकित्सेत कटिस्नान, पूर्ण टब-बाथ, मातीची पट्टी , हवा, सूर्यस्नान, उपवास, फलाहार ह्यांचा उपयोग करून रोग दुरूस्ती होते. आपल्या शरीरात पाणी हे सर्वसाधारणपणे तीन प्रकारचे कार्य करते.

1) खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे 2) शरीरात रक्तसंचार, सर्क्युलेशन करणे 3) शरीरातील विजातीय द्रव्य बाहेर काढून निरोगी बनवणे.

आपल्या शरीरातील घाण घामावाटे लघवीवाटे शौचावाटे बाहेर निघते. रोज 1 ते दीड लीटर पाणी शरीराच्या बाहेर उत्सर्जित होते. निदान तेवढे तरी पाणी पिऊन शरीराचे संतुलन राखले गेले पाहिजे. हे पाणी शास्त्राचे मुख्य तत्व आहे. तहान लागली की पाणी प्यावे, तहान रोखू नये, मारू नये, नंतर पिऊ म्हणून पुढे ढकलू नये. भरपूर प्रमाणात तहान लागली तर आवश्यकतेनुसार दर 2 तासांनी 1 ग्लास पाणी प्यावे. पाणी पिण्याने मलावरोध होत नाही पचनशक्ती वाढते. थंड पाण्याचा स्पर्श किंवा उपयोग होतो पाण्याची वाफ बनवून वाफेचाही उपचारात उपयोग होतो आणि द्रव रूपात थंड गरम पाण्याचा उपयोग तर होतोच पण पशू-पक्षी वनस्पती यांनाही पाण्याची जरूरी आहे. हे तुम्हाला माहिती आहेच. तेव्हा पाण्याशिवाय सर्वांचे जीवन शून्य आहे.

रोग चिकित्सा आणि पाण्याचा उपचार:

माणसाला होणाऱ्या रोगाचे मूळ कारण प्रामुख्याने हेच आहे की, आपल्या शरीरात विजातीय दूषित पदार्थांचे जमणे. हळूहळू आपल्या आहारातून पेय-पदार्थांतून ज्या वस्तू आपण घेतो त्याचे पचन नीट झाल्याने त्याचे आम्ल तयार होते. आणि आम्लाचा परिणाम ऍसिडीटी वाढण्यात होतो. म्हणून प्रत्यकाने सकाळी उठल्या उठल्या तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावे. रात्रीच ब्रश करून झोपावे. म्हणजे सकाळी प्यायलेल्या पाण्यामुळे मलावरोध साफ होतो. आम्लाचा रक्तावरही परिणाम होत असतो.रात्री खूप उशीरा जेवण आणि त्यात मसालेदार, तळलेले, मिष्टान्नाचे जड जेवण हे ऍसिडीटी वाढविण्यास मदत करते. त्यामुळेच रोगाचे आक्रमण शरीरावर होते. आपल्या शरीराची घाण जर रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने दूर होऊ शकते. असे जर आचरण केले तर डॉक्टरांची औषधांची वास्तविक गरज उरणार नाही. हे कार्य पाण्याच्या उपचाराने होऊ शकते. पाण्याचा उपयोग दोन प्रकाराने होतो.

अंत:शुद्धी बाह्यशुद्धी याप्रमाणे शरीराची अंत:शुद्धी बाह्यशुद्धी जलोपचाराने होते. जल-चिकित्सेने रोगाचे मूळ कारणच दूर होते. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याकरिता शुद्ध हवा, शुद्ध सात्त्विक भोजन, शुद्ध पाणी ह्याची मुख्य जरूरी आहे. दूषित हवा, दूषित अन्न, दूषित पाणी हे रोगाचे मूळ कारण आहे. यामुळेच आपल्या शरीरात विजातीय द्रव्यांचा प्रवेश होतो ते घालवण्याकरिता जलोपचार हा मुख्य उपाय आहे. पाण्यावरून वाहणारा वायूसुद्धा शीतल सुखद असतो. म्हणून सकाळच्या रम्य प्रहरी नदीकिनारी फिरायला गेले असता आरोग्यवर्धक गोष्ट होईल. शुद्ध वायूचे सेवन आरोग्यदायक असते. मोठमोठ्या सॅनिटोरियममध्ये जलाशय नदी-किनारा, तलाव वाहणारे झरे, पर्वत टेकडी, शुद्ध वातावरण शुद्ध जल याचा आरोग्याकरिता उपयोग केला जातो. आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला दिव्य जल, अमृतधारा म्हटले आहे. जर या अमृतधारांमध्ये तुम्ही भिजलात.

अर्थात ही अमृतधार ही शिरोधार असेल तर तुमच्या मेंदूला मज्जासंस्थेला निश्चितच फायदा होतो. त्या पडणाऱ्या पाण्यामुळेच पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्र सुखी होतात. शेती, पिण्याचे पाणी हे सर्व वरील पाण्यावरच अवलंबून आहे. पाण्यावरच इलक्ट्रिक वीज केली जाते. पाणी कमी पडले तर विजेच्या उत्पादनात घट होते. वीज वापरण्यावर निर्बंध येतात, कारखाने चालण्याकरिता कालवे, विहिरीला पाणी येणे, हे सर्व पावसाचे पाण्यामुळे होते याचा अर्थ पाणी हेच खरे माणसाचे जीवन आहे.

हे जीवन आपल्या पाहिजे असेल तर घनदाट झाडी हवी तर पावसाचे प्रमाण वाढते. निसर्ग संतुलन होते. इतर कोणत्याही औषधी शास्त्रात असाध्य ठरवलेले रोगही जल चिकित्सेने बरे होतात. पाण्याची वाफ केली जाते त्या वाफेने शरीराचे गतीत निर्जिव थकलेले निकृष्ट अवस्थेत पोहोचलेले रोगी बाष्पस्नान वाफेच्या प्रयोगाने बरे होऊ शकतात. लकव्यासारख्या रोगावर जलोपचार करून तो रोग बरा होतो हे सिद्ध झालेले आहे. अशा प्रकारे पाण्याचा उपयोग अंत:बाह्य दोन्ही तऱ्हेने होतो.

जल शास्त्रात स्नानाचे महत्त्व:

प्रत्येक व्यक्तीने स्नान करणे हे नित्तगरजेचे आहे. स्नानामुळेच शरीराची स्वच्छता शुद्धी होते आणि आरोग्य मिळते. नदी, विहिरी, पोहोण्याचा तलाव यांमध्येही स्नान करणे चांगले, पण हे सर्वांनाच शक् नसते. टबमध्ये स्नान करणे किंवा शॉवरखाली बसणे अशा पद्धतीने स्नान करतात. आंघोळ करताना टब मधील पाणी स्वच्छ, ताजे थंड असावे. टबमध्ये 5-6 इंच पाणी टाकावे. मोकळेपणाने बसता येईल असा टब असावा. पोट, गुदा, सर्व इंद्रिये या सर्व भागांना चोळून धुवावे.

उन्हाचे दिवसात 15-20 मिनिटे स्नान करावे पण थंडीचे दिवसात 3 मिनिटात स्नान आटपावे. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार हे ठरवण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते,त्याप्रमाणे स्नान करावे.

पाण्याची शुद्धता आणि शास्त्र:

आपल्या शरीराला रोग होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील अशुद्ध द्रव्य वाढणे हे कशामुळे होते? तर अयोग्य राहणीमान, अनियमित आहार-विहार आवश्यक नसलेल्या वस्तू खाणे, जीवनशक्ती नष्ट करणाऱ्या सवयी लावणे, शुद्ध हवा, सूर्यप्रकाश, तसेच व्यायामाचा अभाव, विश्रांती घेणे, पूर्ण झोप घेणे, अति झोप घेणे, चिंता तणावग्रस्त शरीर यामुळे शारीरिक दोष रोग उत्पन्न होतात.

हे रोग बरे करून आरोग्य मिळविण्याकरिता जलचिकित्सा, हे महत्वाचे शास्त्र आहे. फक्त त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. पाणी हे सर्व रोगांवर औषधी आहे. आणि तेच शरीरशुद्धतेचे मुख्य साधन आहे. शरीरशुद्धि म्हणजे रोगमुक्ती होय. ही रोगमुक्ती फक्त जलचिकित्सेने होऊ शकते.

पाणी हे पिण्याचे असो की स्नानाचे ते शुद्ध, स्वच्छ ताजे असावे. खेडेगावातील लोकांनी विहिरीचे पाणी वापरताना वर्षातून एकदा पंपाद्वारे सर्व पाणी काढून नवीन पाणी येऊ द्यावे. तलाव किंवा मोठे जलाशय असेल त्यात शोधक औषधे जसे तुरटी, चुना किंवा पोटॅशियम परमॅंगनेट टाकावे, नदीचे प्रवाहित पाणी स्वच्छ मानले जाते, पण त्यात घाण पाणी अथवा घाण वस्तू मिळू देऊ नये. पिण्याचे पाणी शुद्ध करण्याच्या दृष्टीने येथे काही उपाय सांगणे आवश्यक आहे.

1) पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात खाण्याचा कळीचा चुना टाकल्यास पाणी स्वच्छ होते. निर्जंतुक होते.

2) पाणी उकळून थंड करून प्यावे.

3) विहिरीत, तलावात मासोळ्या सोडल्या तरी पाणी स्वच्छ होते.

4) पाणी मातीच्या माठात ठेवावे. त्यावर नेहमी झाकण असावे. पिण्याचे पाणी नेहमी पांढऱ्या स्वच्छ फडक्याने गाळून घ्यावे. त्यानंतर पाणी माठात ओतावे. 12 ते 24 तासानंतर पाणी आपल्या घरगुती झाडांना द्यावे व दुसरे वापरावे. माठ किंवा पिंप मधून मधून रोज स्वच्छ करावे. पाणी हे माणसाचे जीवन आहे. ते स्वच्छ निर्जंतुक असावे.

स्नानाचे आरोग्यदायी प्रकार:

थंड पाण्याने कटी-स्नान:

थंड पाण्याने कटी स्नान करण्यापूर्वी व्यायाम करावा. यामुळे अंगात उष्णता वाढते थंड पाण्याच्या स्नानाचा त्रास होत नाही. टबामध्ये बसल्यानंतर कंबर बुडेल एवढे पाणी त्यात असावे. थंड पाणी सहन होईल इतका वेळच बसावे. त्यांनीच हे स्नान घ्यावे. या स्नानामुळे आतड्यातील दोष, पोटातील गॅस, मलावरोध, मलबद्धता, पोटात वायू धरणे, (गॅसेस), अपचन, पचनशक्ती कमजोर असल्यास पचनक्रिया वाढवणे, रक्तप्रवाहाचे विकार बरे होतात. कंबरेमधील हाडांमध्ये बळकटी येते. ब्लड सर्क्युलेशन मधील अडथळे दूर होतात. तसेच स्त्री-पुरूषाचे जननेंद्रियासंबंधीचे रोग, ऋतूदोष, लघवीचे विकार हे सुद्धा बरे होऊ शकतात. हे स्नान आठवड्यातून 2 ते 3 वेळा केले तर वरील फायदे मिळू शकतात.

गरम कटीस्नान:

आजारी माणूस जर आजारपणामुळे अशक्त झाला असेल तर तो थंड पाणी सहन करू शकणार नाही. अशावेळी त्याला गरम कटी स्नान चांगले. हे थंड कटी स्नानाप्रमाणे करतात. गरम कटी स्नान म्हणजे कोमट असे शरीराच्या तपमानाइतके कोमट पाणी टबामध्ये घ्यावे. हे स्नान 5 ते 15 मिनिटापर्यंत करता येते. त्यामुळे आजारी माणसाला हुशारी येते. ताजेतवाने वाटते. शरीरातील शक्ती वाढून पचनग्रंथी चांगल्या स्त्रवून भूक लागते. आजारी व्यक्ती सुधारते.

 गरम व थंड कटी स्नान:

एका टबात गरम पाणी एका टबात थंड पाणी भरून ठेवावे. पाच मिनिटे गरम टबामध्ये बसावे नंतर थोडा वेळ थंड टबामध्ये बसावे. याप्रमाणे 1-2 वेळा गरम-थंड अशी आंघोळ करावी. प्रथम गार पाण्यात सुरू करून शेवटी थंड पाण्यात समाप्ती करावी. गरम कटी-स्नानामुळे त्या भागातील पूर्ण अवयव गरम होऊन कोमल, नरम होतात तेथील रक्तवाहिन्या विस्तृत होतात. आणि तेथील रक्त वरच्या थरावर प्रसरण पावते. नंतर जेव्हा तोच भाग थंड पाण्यामध्ये बुडला जातो तेव्हा त्या भागातील स्नायू रक्तवाहिन्या आकुंचन पावतात रक्ताचा वेग खालच्या भागाकडे वेगाने जातो. शारीरिक दोषामुळे रक्ताभिसरणक्रिया नीट होत नसेल तर ती या गरम-थंड कटी स्नानामुळे ब्लड सर्क्युलेशन नीट होते. लघवी थांबणे, लघवीचे दोष, गर्भाशाचे रोग, आतड्याचे रोग, नाजूक गुप्तेंद्रिये, वृशणरोग, सूज, वेदना, इंद्रियांची निष्क्रियता यावर इलाज म्हणजे गरम थंड- कटी स्नान.

सारांश

शारीरिक तंत्राची कार्यक्षमता कायम राखण्यात पाण्याची भूमिका खूप महत्त्वाची असते. पाण्याअभावी शरीराच्या अंतर्गत अवयवांची कार्यप्रणाली बाधित होऊ शकते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. यावरच शरीराची कार्यप्रणाली अवलंबून असते. दिवसभर कामात गुंतलेले असल्याने अनेकजण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांची ऊर्जा पातळी खालावते. शरीराचा परफॉर्मन्स चांगला राखण्यासाठी आणि फोकस वाढवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know