Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 3 January 2024

बाल्कनीमधील बागेसाठी झाडांची निवड | बाल्कनी गार्डन | झाडे हा बागेचा अविभाज्य घटक आहे | माहिती करून घेऊन परसबागेचा छंद जोपासता येतो | जमिनीवरील लागवडीच्या तुलनेत कुंड्यांमधील बागेला वारंवार पाणी द्यावे लागते | परसबागेमध्ये कम्पोस्ट व शेणखत, गांडूळखत, लेंडीखत, निंबोळी व सरकी पेंड यांचा वापर क्रमप्राप्त ठरतो

बाल्कनी गार्डन

 

बाल्कनीमधील बागेसाठी झाडांची निवड

आपल्या अंगणातली किंवा आपल्या बाल्कनीतली, गच्चीवरची आपली बाग हा आपल्या आनंदाचा एक ठेवा. हौस, वेळ अणि जागा असली तरी वनस्पतींची संपूर्ण माहिती असल्याशिवाय त्या घरी लावणे शक्य होत नाही. म्हणूनच त्यांची माहिती करून घेऊन परसबागेचा छंद जोपासता येतो. परसबागेतील कामे सुलभ कमी वेळेत होण्यासाठी हाताशी अवजारे असणे आवश्यक आहे. झाडांभोवतालची माती हलविण्यासाठी खुरपे, मोठय़ा फांद्या-डहाळ्या तोडण्यासाठी कोयता, कलम करण्यासाठी चाकू, झाडांची छाटणी करण्यासाठी सिकेटर, कीटकनाशके फवारणीसाठी पंप, झारी, घराभोवतालच्या मोठय़ा बागेसाठी कुदळ, फावडे, घमेले इत्यादींची गरज भासते. झाडे हा बागेचा अविभाज्य घटक आहे; मग ती बाग बंगल्याभोवतीची असो,टेरेसवरील असो वा बाल्कनीतील! बागेसाठी झाडांची निवड करताना त्यांचे प्रकार किंवा वर्गीकरण ढोबळमानाने कसे करता येते हे समजावून घेऊया. परसबाग आणि गच्चीवरील बागेसाठी झाडांची निवड करताना या दोन्हींमधील काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. त्यांचा थोडा तुलनात्मक विचार करूयात. बाल्कनीमधील बाग करण्यासाठी यामधूनच निवड करायची असून जागेचा विचार प्राधान्याने करावा लागेल.

) गच्चीवरील बागेमध्ये माती कमी असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे मोजकेच पण वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे. तुलनेने जमिनीवरील झाडांना पाण्याचा ताण सहन होतो. बागेला मोजके वेळेवर पाणी देणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी देण्याची चूक अनेक वेळा होताना दिसते.

) जमिनीवरील लागवडीच्या तुलनेत कुंड्यांमधील बागेला वारंवार पाणी द्यावे लागते मग त्या कोठेही असोत.

) गच्चीवरच्या बागेला पुरेसे ऊन मिळते, परंतु आसपासच्या उंच इमारती, मोठी झाडे आदींमुळे परसबागेला पुरेसे ऊन मिळण्यात अडथळा येतो.

) गच्चीवरच्या बागेत वाऱ्याबरोबर येणारे तण कमी येते, जमिनीवरच्या बागेत तुलनेने ते जास्त आढळते.

कुंडीतील माती व खत

कुंडीतील वनस्पतीजीवन कृत्रिमच असणार. तीत मातीही थोडीशी. तिच्यातील जीवनसत्त्वेदेखील मोजकीच अल्पशीच. ही उणीव भरून काढण्याकरिता वेळोवेळी खतांचा उपयोग करावा. परसबागेमध्ये कम्पोस्ट शेणखत, गांडूळखत, लेंडीखत, निंबोळी सरकी पेंड यांचा वापर क्रमप्राप्त ठरतो. सेंद्रिय पदार्थामुळे मातीच्या कणांची रचना दाणेदार बनून स्थिर तर होतेच, शिवाय जलधारणाशक्ती वाढते. निचरा योग्य होतो. कमी किंवा जास्त प्रमाणात पाणी किंवा खत देणे हेसुद्धा झाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम करते. म्हणूनच खत-पाणी मोजून घातल्यास त्याचा वनस्पतींच्या वाढीवर निरोगीपणावर चांगला परिणाम दिसून येतो. घरातून ठेवलेल्या कुंडय़ातील झाडांवर बहुधा पांढऱ्या रंगाची मऊ कीड पडते. बागेत चोरपावलाने शिरणाऱ्या किडी रोग यांच्यापासून बागेचे संरक्षण करावयास हवे. वनस्पतींच्या संरक्षणासाठी लिंबोळी तसेच विविध वनस्पतींच्या अर्काबरोबरच गोमूत्र, ट्रायकोग्रामा, क्रायसोपल हे जैविक घटक, तसेच ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस या परोपकारी बुरशींचा वापर करता येतो.

बगिच्याच्या झाडांचे आकार, निवड व प्रकार

झाडांचे आकार प्रकार विचारात घेऊन त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केल्यास ते खालीलप्रमाणे होईल. बाग करताना योग्य जागेची निवड, पाण्याची गरज इत्यादीसाठी ते मार्गदर्शक ठरेल. कुंड्या अगर वाफे यांचा आकार ठरविण्यास आणि त्यांना योग्य जागा देण्यासही हे वर्गीकरण उपयोगी ठरेल.

झाडांचे आकार वर्गीकरण

) उंचीप्रमाणे वर्गीकरण करावयाचे झाल्यास हर्ब, झुडुपे, कमी उंचीची, मध्यम उंचीची झाडे आणि उंच वाढणारे वृक्ष असे करता येईल.

) झुडूपवजा झाडे- झुडूपवर्गामध्ये जास्त करून फुलझाडे येतात. उदाहरणार्थ अबोली, शेवंती, सदाफुली गुलबक्षी,कोरांटी, . गुलाब हे या वर्गामधील वाढवायला सर्वात कठीण फुलझाड आहे.

) सवयींप्रमाणे वर्गीकरण करावयाचे झाल्यास उन्हाची कमी किंवा जास्त गरज असणारी, सावलीत वाढणारी, पाणी कमी जास्त लागणारी असे करता येईल. बारमाही किंवा अल्पकाळ फुले देणारी झाडे असेही वर्गीकरण होऊ शकेल.

) झाडांच्या आयुर्मानाप्रमाणे वर्गीकरण करताना दहा ते पंधरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आयुष्य असणारी झाडे, तीन चार वर्षे किंवा एक-दीड वर्षे जगणारी आणि केवळ एकाच सीझनपुरते आयुष्य असणारी असा विचार केला जातो. यामध्ये फुलझाडे, फळझाडे, वेली असेही वर्गीकरण होऊ शकेल.

) उपयोगाप्रमाणे -

) औषधी वनस्पतींमध्ये -तुळस, सब्जा, गवती चहा, अडुळसा, विड्याची पाने (नागवेल) आदींचा समावेश होतो.

) शोभेची पाने असणाऱ्या वनस्पतींमध्ये क्रोटोन, बिगोनिया, ड्रेसेना, मनी प्लॅन्ट, फिलोडेन्ड्रॉन वगैरेंचा समावेश होतो.

) कंपाउंडसाठी संरक्षक काटेरी वेलींमध्ये बोगनवेलीची हजेरी अगत्याची तर मेंदी, डुडोनिया अशी कंपाउंडला लावण्याजोगी! मोठी बाग असल्यास डिव्हायडर म्हणून लावण्यासाठी फायकसच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. सुरूचे प्रकारदेखील हे काम करतात.

) ताटव्यांमध्ये लावण्यासाठी डेझी, बाल्सम, लार्कस्पर, पिटुनिया, झेंडू, व्हर्बेना अशा हंगामी फुलझाडांची निवड केली जाते. कर्दळ, निशिगंध, ग्लॅडिओला अशी कंदवर्गातील फुलझाडेदेखील एकत्र लावल्यास शोभा देतात. यात बारमाही आणि वर्षातून एकवेळा फुले येणारी असेही प्रकार आहेत.

नव्याने आलेल्या अनेक जाती सध्या उपलब्ध आहेत. त्यामधून देखील निवड करता येईल. सीझनल वर्गातील रोपे आपण विकत घेत असाल तर त्यांचे आयुष्य एकाच हंगामापुरते आहे, याचे विस्मरण होता कामा नये, अन्यथा ती रोपे अल्पावधीत सुकून गेल्याने अगर त्यांचा बहर संपल्याने पदरी निराशा येण्याचा संभव असतो.

) कंदवर्गीय फुलझाडे- या प्रकारात गड्डे असणारी निशिगंध, लिली, कर्दळ इत्यादी फुलझाडे आहेत.

) कॅक्टस सक्युलंट- काटेरी, जाड पाने यामुळे पाण्याची गरज कमी आणि उन्हाची गरज जास्त असलेला हा वेगळा वर्ग आहे.

) पाणवनस्पती- कमळ, कमलिनी अशी केवळ पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती या वर्गात मोडतात.

१०) भाजीपाला आणि त्याचे विविध प्रकारभाजीपाल्याचा एक स्वतंत्र वर्ग आहे. फळभाज्या, शेंगवर्गीय, वेलवर्गीय भाज्या, कडधान्ये, पालेभाज्या, कंद इत्यादी भाजीपाल्याचे प्रकार या वर्गात मोडतात. हे सर्व अल्पायुषी आहेत.

तुलनेने हळद, आले, केळी जास्त दिवस जगतात. भाजीपाला वर्गातील वनस्पतींचे आयुष्य कमी असल्यामुळे वारंवार लागवड करावी लागते. तुलनेने अधिक परिश्रम, देखभाल, तत्परता यांची गरज असते.

आपल्या बागेचे नियोजन करताना उपलब्ध जागा, ऊन-सावली, पाणी असे काही कळीचे मुद्दे समोर येतात. बागेत एकसुरी लागवड करण्यापेक्षा कमी जास्त उंचीची झाडे आणि त्यामधील वैविध्य जपल्यास सुंदर आणि बहुपयोगी बागेचे उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो. रंगांमधील विविधतेमुळेही बाग अधिक आकर्षक दिसते.

बागेसाठी योग्य झाडे

झाडांचे वेगवेगळे प्रकार समजून घेऊन त्यांचा योग्य मेळ घालण्यामध्ये बाग करणाऱ्याचे कसब पणाला लागते. अयोग्य झाडांची निवड केल्यास वेळ, परिश्रम निष्फळ ठरण्याची शक्यता असते.

झाड लावताना ते पूर्ण वाढल्यावर किती जागा व्यापेल याचा विचार करावा. नारळासारखी झाडे उपद्रव मूल्यांमुळे आणि फणसासारखी अधिक पसारा असणारी झाडे परसबागेसाठी अयोग्य आहेत. तुलनेने योग्य झाडांची यादी बरीच मोठी आहे. शेवगा आणि सोनचाफा यांची सुधारित जातींची झाडे कमी उंचीची असल्यामुळे ती परसबागेत लावण्यास योग्य आहेत.

मध्यम उंचीची, दीर्घायुषी झाडे -जास्वंद, तगर, पारिजातक, कण्हेर, अनंत, सोनचाफा, देवचाफा अशी जास्त आयुष्य असणारी, मध्यम उंचीची आणि जास्त काळ फुले देणारी झाडे आणि कढीपत्ता, ऑल स्पाइसेस, हादगा आणि लिंबू, डाळिंब, सीताफळ, अंजीर, पेरू अशी फळझाडे या वर्गात मोडतात. फळझाडांमध्ये आलेल्या नवीन जाती तुलनेने लहान उंचीच्या आहेत.

वृक्ष - या वर्गात मोडणारी मोठी झाडे परसबाग आणि गच्चीवरील बागेसाठी अयोग्य आहेत. रस्त्याकडेचे वृक्ष बागप्रेमींना मोहात पाडतात पण ते बागेसाठी अयोग्य आहेत.

फुलवेली आणि पानवेली- जाई, जुई, मोगरा, मदनबाण, कुंद या दीर्घायुषी वेली असून त्या ऋतूपरत्वे सुवासिक फुले देणाऱ्या आहेत. कृष्णकमळ, रंगून क्रीपर बागेचे सौंदर्य वाढवतात. विड्याच्या पानांचे प्रकार, मिरीचे वेल, मनी प्लॅन्ट, मॉन्स्टेरा ह्या वेलवर्गातील दीर्घायुषी पानवेली आहेत.

फळझाडे- गच्चीवर डाळिंब, सीताफळ, चेरी, तुती, ड्रॅगन फ्रूट, चिक्कू, केळी, पेरू, लिंबू, पपई, अंजीर, कमरख ही झाडे मोठ्या ड्रमात अगर वाफ्यात लावता येतात.

आंब्याचेही माफक पीक घेता येते. बुटक्या जातीचा शेवगाही लावता येतो. ही सर्वच झाडे जमिनीवरील बागेतही लावणे शक्य असले तरी फणस, नारळ, शेवगा याला अपवाद आहेत. नव्याने मिळणारी कलमी आंब्याची रोपे तुलनेने लहान उंचीची असतात.

बाल्कनीमध्ये बाग करताना कुंड्या आणि हँगिंगमध्ये लावण्यास योग्य अशी झाडे निवडावीत. हँगिंगमध्ये काही फुलझाडे, तुळस, गवती चहा, लिंबू, कढीपत्ता, पानवेल, गोकर्णासारख्या वेली, पुदिना, पालेभाजी लावता येईल. अनेक टप्पे असलेले स्टॅन्डवर अनेक कुंड्या ठेवता येत असल्यामुळे बाल्कनीतील बागेसाठी उपयोगी आहेत.

सारांश

प्रत्येकाला आपले घर नीट नेटके सुंदर असावे, त्याभोवती शोभिवंत झाडे, सुगंधी फुलझाडे असावीत असे वाटते. पूर्वी लोकांकडे राहण्यासाठी मोठमोठे वाडे अथवा घरे होती. त्याभोवती खूप मोठी जागा असायची. तिथे फळांची, फुलांची, भाज्यांची झाडे असत. आता पूर्वीचे वाडे गेले. ऐसपैस जागाही गेली. त्यांची जागा आता प्लॉटस् आणि गगनचुंबी इमारतींतील फ्लॅट्सने घेतली. शहरामध्ये स्वतंत्र प्लॉट ही मध्यमवर्गीयांसाठी कठीण गोष्ट बनली आहे; परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे टेरेस गार्डनच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांचे बागेचे स्वप्न साकार होऊ शकते. यामध्ये घराच्या गच्चीवर, व्हरांडा, पोर्च, बाल्कनीमध्ये परसबाग फुलवता येते. यातून दैनंदिन उपयोगासाठी फुले, फळे, औषधे मिळतात बागकामाचा छंदही जोपासला जातो. आपण लावलेल्या फुलझाडांमुळे शोभिवंत वनस्पतींमुळे अतिशय रम्य वातावरण तयार होऊन सौंदर्यात भर पडते. परसबागेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिच्यापासून मिळणारे मानसिक समाधान.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know