हृदय रोग व हार्ट अटॅक
हृदयाशी संबंधित विकार
सध्याच्या काळात हृदयविकाराचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. अगदी तरुण वयात हृदयविकार जडू लागला आहे. हृदयाशी संबंधित विकारांनी मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. हृदयविकाराचा झटका आणि हार्ट फेल्युअर आजारांबाबत सर्वांना माहीत आहे. परंतु, हृदयाशी संबंधित इतरही काही विकार आहेत. या विकारांची लक्षणे वेगळी आहेत. या लक्षणांवरून उपचाराची दिशा ठरवली जाते.
कार्डिओमायोपॅथी हा एक विकार आहे. या विकारात हृदयाच्या स्नायूंचा आकार वाढतो किंवा ते टणक होतात. पायांना सूज येणे, भोवळ येणे तसेच सतत थकल्यासारखे वाटणे ही या विकाराची लक्षणे आहेत. आरिथमिया या विकारात हृदयगतीवर परिणाम होतो. हृदयाचे ठोके अनियमित होतात. यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतो. हृदयाच्या ठोक्यांची गती मंदावणे, छातीत दुखणे, धाप लागणे, डोके जण होणे, भोवळ येणे ही या विकाराची लक्षणे आहेत.
हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या स्वत:च्या रक्तवाहिन्या (रोहिण्या) असतात. हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे ७० वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या इतर कुठल्याही स्नायूपेक्षा जास्त जोरकसपणे, सातत्याने आणि नियमितपणे करावे लागते. हृदयाच्या स्नायूंना रक्तप्रवाहामार्फत प्राणवायू पुरवण्याचे काम काही क्षण जरी बंद पडले तरी हृदय बंद पडू शकते. त्यामुळे हृदयक्रिया दोन-तीन मिनिटे जरी बंद झाली तरी मेंदूचे कामकाज थांबून मृत्यू ओढवू शकतो.
हृदयाच्या धमन्यांमध्ये मेद, चरबी साठल्याने कॉरोनली आर्चरी डिसज जडतो. छाती दुखणे, जळजळणे ही या विकाराची लक्षणे आहेत. काहींना जन्मजात हृदयदोष असतात. या हृदयदोषांची लक्षणे लहान बाळांमध्ये दिसून येतात. छातीत दुखणे, बाळाचे वजन कमी असणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही लक्षणे दिसून येतात. मूल मोठं झाल्यावर भोवळ येणे, सतत थकवा जाणवणे, अंगावर सूज येणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागतात.
हृदयाच्या धमण्यांच्या भत्तकांमध्ये मेद साठल्याने अँथॅरॉस्क्लेरॉसिस हा विकार होतो. अशक्तपणा, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणे, चेहरा लुळा पडणे ही या विकाराची लक्षणे आहेत. बॅक्टेरिया, विषाणू तसेच इतर रोगजंतू हृदयापर्यंत पोहोचल्यास हृदयाचा जंतुसंसर्ग होऊ शकतो. मायोकार्डियल इंन्फेक्शन म्हणजे हृदयविकाराचा तीव्र झटका. हृदयाला रक्तपुरवठा कमी प्रमाणात झाला किंवा हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळे आल्यास हृदयविकाराचा झटका येतो. धाप लागणे, मळमळणे, अचानक भोवळ येणे ही या विकाराची लक्षणे आहेत.
प्रतिबंधात्मक उपाय
धूम्रपानामुळे हृदयाला धोका निर्माण होतो. त्यामुळे धूम्रपान टाळा.
धूम्रपानामुळे धमन्या आकुंचन पावतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
नियमित व्यायाम केल्याने हृदयाला बळकटी मिळते.
हृदयविकार टाळण्यासाठी बैठी जीवनशैली टाळायला हवी.
दररोज व्यायाम, योगासन करा.
तेलकट पदार्थ कमी प्रमाणात खा.
भाज्या, मासे, विविध प्रकारच्या बिया यामधून उपयुक्त फॅट्स मिळतात.
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी पुरेशी झोप घ्या.
उच्च रक्तदाबामुळे हृदयाशी संबंधित विकार जडू शकतात.
हृदयविकाराचा झटका काय लक्षणे असतात?
छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही देखील काही लक्षणे आहेत.
साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात.
तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
इतर लक्षणे जसे मळमळ, ऊलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त काळ टिकतात.
काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन मृत्यू येतो.
हृदयाची काळजी
हार्ट फेल्युअर हा एक बऱ्याच दिवसांपासून असलेला, वाढत जाणारा विकार आहे ज्यामध्ये हृदयाचे स्नायू हे व्यक्तीच्या शरीराला आवश्यक असलेले रक्त आणि ऑक्सिजन पुरवण्यासाठी ज्या प्रमाणामध्ये रक्त पंप करायला हवे त्या प्रमाणामध्ये पंप करण्यास असमर्थ असतात. अशा परिस्थितीमध्ये, मानवाचे हृदय हे कामाचा भार सहन करण्यास असक्षम होते.
अपुऱ्या प्रमाणामध्ये रक्त पुरवठा झाल्याने खालील समस्या उद्भवतात: काही रुग्णांमध्ये, सर्व महत्वाची शारीरिक कार्ये विस्कळीत होतात कारण की हृदय शरीरामध्ये सर्व अवयवांना आवश्यक प्रमाणामध्ये रक्तपुरवठा करू शकत नाही. तसेच काही रुग्णांमध्ये, हार्ट फेल्युअर मुळे हृदयाचे स्वतःचे स्नायू कठीण आणि कडक बनतात यामुळे हृदयाचा स्वतःचा देखील रक्तपुरवठा कमी होतो किंवा बंद होतो. हार्ट फेल्युअर हा हृदयाच्या डाव्या किंवा उजव्या बाजू वर परिणाम करतो किंवा दोन्ही बाजूंवर एकाच वेळी परिणाम करतो.
हार्ट फेल्युअर चे मुख्यत्वे दोन प्रकार:
काही दिवसांमध्ये झालेला हार्ट फेल्युअर: या परिस्थितीमध्ये, लक्षणे ही अचानकपणे उद्भवतात आणि हृदय त्याचे कार्य करण्यास असमर्थ ठरते आणि ते शरीरास आवश्यक असलेला रक्त पुरवठा करू शकत नाही. ही परिस्थिती सामान्यपणे हृदयविकाराच्या झटक्याने नंतर निर्माण होते.
बऱ्याच दिवसांपासून असलेले हार्ट फेल्युअर : बहुतांश हार्ट फेल्युअर चे रुग्ण हे बऱ्याच दिवसांपासून असलेल्या हार्ट फेल्युअर या प्रकारातील असतात. या परिस्थितीमध्ये हृदय शरीराला आवश्यक असलेला रक्त पुरवठा करू शकत नाही त्यामुळे शरीरास आवश्यक असलेला ऑक्सिजन देखील मिळत नाही. हार्ट फेल्युअर हे हृदयाचा डाव्या किंवा उजव्या बाजूमध्ये निर्माण होऊ शकते किंवा एकाच वेळी हृदयाच्या दोन्ही बाजू मध्ये देखील निर्माण होऊ शकते.
डाव्या बाजूचे हार्ट फेल्युअर:
हा अतिशय सामान्यपणे आढळणारा हार्ट फेल्युअर चा प्रकार आहे. या परिस्थितीमध्ये, डाव्या बाजूचे व्हेंट्रिकल हे कमजोर झालेले असते. डावे व्हेंट्रिकल हे हृदयाच्या डाव्या बाजूच्या तळाशी स्थित असते. आणि हा शरीराला ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवठा करण्याचा मुख्य पंपिंग स्त्रोत असतो आणि जसे हृदयाच्या डाव्या बाजूचे व्हेंट्रिकल निकामी होते तसे हृदय त्याची रक्त पंप करण्याची क्षमता गमावून बसते. वास्तविकते मध्ये, रक्त पुन्हा फुफ्फुसांमध्ये माघारी येते त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो व धाप लागते आणि तिथे द्रवपदार्थ साठण्यास सुरुवात होते.
उजव्या बाजूचे हार्ट फेल्युअर:
जेव्हा हृदयाची उजवी बाजू संपूर्ण क्षमतेने कार्य करण्यास असमर्थ होते तेव्हा उजव्या बाजूचे हार्ट फेल्युअर होते आणि याची सुरुवात नेहमी डाव्या बाजूच्या हार्ट फेल्युअर ने होते. हृदयाचे उजवे व्हेन्ट्रीकल हे ऑक्सीजन मिळविण्यासाठी रक्त फुफ्फुसांकडे पंप करते. जेव्हा हृदयाचे उजवे व्हेन्ट्रीकल अतिशय कमजोर बनते आणि पुरेसे रक्त फुफ्फुसांकडे पंप करण्यास असमर्थ होते तेव्हा हृदयाच्या उजव्या बाजूवर खूप मोठा ताण येतो आणि हार्ट फेल्युअर होते. उजव्या बाजूचे हार्ट फेल्युअर झाल्याने धाप लागणे आणि संपूर्ण पाय व पोटावर सूज येणे ही लक्षणे उद्भवतात.
फुफ्फुसांच्या विकारांमुळे देखील उजव्या बाजूचे हार्ट फेल्युअर होऊ शकते.
डायस्टोलिक हार्ट फेल्युअर:
डायस्टोलिक हार्ट फेल्युअर हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अतिशय सामान्यपणे आढळते. हृदयाच्या डाव्या व्हेंट्रिकल चा तळा मधील डावा भाग हा जेव्हा व्यवस्थित रित्या हृदयामध्ये रक्त भरण्यास असमर्थ होतो तेव्हा डायस्टोलिक हार्ट फेल्युअर निर्माण होते, यामुळे शरीरामधील इतर अवयवांना कमी प्रमाणामध्ये रक्तपुरवठा होतो. अशा परिस्थितीमध्ये, हृदयामध्ये रक्त भरले जात नाही त्यामुळे हृदयाचे स्नायू हे अतिशय कडक बनतात.
सिस्टॉलिक हार्ट फेल्युअर:
सिस्टॉलिक हार्ट फेल्युअर हे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अतिशय सामान्यपणे आढळते. जेव्हा हृदयाचे डावे व्हेंट्रिकल हे जाडसर आणि कडक बनते व त्याची आकुंचन पावण्याची कार्यक्षमता गमावून बसते तेव्हा सिस्टॉलिक हार्ट फेल्युअर निर्माण होते. हृदयाची आकुंचन पावण्याची क्षमता ही ऑक्सिजनयुक्त रक्त पंप करून शरीरास पुरवण्यासाठी आवश्यक असते. जेव्हा हृदय कमजोर आणि आकाराणे मोठे झालेले असते तेव्हा ही समस्या उद्भवते.
हार्ट फेल्युअर ची लक्षणे:
थकवा, चक्कर येणे, छातीमध्ये वेदना, अचानक वजनामध्ये वाढ, भूक न लागणे, सततचा कोरडा किंवा ओला खोकला, अनियमित हृदयाचे ठोके,
हृदयामध्ये धडधड, पोटामध्ये सूज, रात्री, व्यायाम करताना किंवा झोपलेले असताना धाप लागणे, अतिजलद श्वासोच्छवास, पाय आणि घोट्या मध्ये सूज, रात्रीची सारखी लघवीला लागणे, मानेच्या रक्तवाहिन्या फुगून बाहेर येणे.
ज्या परिस्थितींमुळे हृदयाला अति प्रमाणामध्ये कार्य करावे लागते त्यांच्यामुळे हार्ट फेल्युअर होते. ज्या परिस्थितीत हार्ट फेल्युअर निर्माण होण्याचा धोका वाढवतात त्या खालीलप्रमाणे:
हृदय विकाराचा झटका, जन्मजात हृदय विकार, कार्डीओमायोपॅथी – हा एक हृदयाच्या स्नायूंचा विकार आहे ज्यामुळे हृदय कमजोर बनते,उच्च रक्तदाब, हृदयाच्या झडपांचे विकार, विवीध प्रकारची हृदयाची अतालता – अरिथमिया, एमफायसेमा – फुफ्फुसांचा विकार, थायरॉईड विकार, मूत्रपिंडाचे विकार, मधुमेह, एच आय व्ही, ओव्हरऍक्टिव्ह किंवा अंडरऍक्टिव्ह थायरॉईड, रक्ताक्षयाचे गंभीर प्रकार, कर्करोगाच्या उपचारपद्धती – किमोथेरपी, काही पदार्थ किंवा दारूचा अति वापर.
उपचार:
हार्ट फेल्युअर चे उपचार हे हृदयाची परिस्थिती किती गंभीर आहे यावर अवलंबून असतात. हृदयावरील उपचाराचा मुख्य उद्देश्य म्हणजे रुग्णाचे आयुष्य वाढवणे. उपचार हे विवीध प्रकारच्या औषधी आणि शस्त्रक्रियांद्वारे केले जातात.
हार्ट फेल्युअर असणाऱ्या रुग्णांवर हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ञांद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया आणि उपचार खालील प्रमाणे:
करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट शस्त्रक्रिया (सी ए बी जी)किंवा बायपास शस्त्रक्रिया :
जेव्हा हृदयाच्या करोनरी आर्टरी ची काही हानी झालेली असेल किंवा त्यामध्ये काही अडथळा निर्माण झाला असेल तेव्हा या प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते कारण त्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह हा थांबला जातो परिणामी हृदयाचे कार्य सुद्धा थांबले जाते आणि हार्ट फेल्युअर होते. या करोनरी आर्टरीज हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवण्याचे अतिशय महत्वाचे काम करतात.
वरील समस्या टाळण्यासाठी हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ञ हे रुग्णाच्या शरीरामधील दुसऱ्या ठिकाणाहून रक्तवाहिनी घेतात आणि खराब झालेल्या रक्तवाहिनीच्या जागी तिचे प्रत्यारोपण करतात.
बायपास शस्त्रक्रियेचे चार प्रकार असतात:
सिंगल बायपास: म्हणजे फक्त एकाच रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झालेला असतो.
डबल बायपास: म्हणजे दोन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झालेला असतो.
ट्रिपल बायपास: म्हणजे तीन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झालेला असतो.
क्वाड्रीपल बायपास: म्हणजे चार रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झालेला असतो.
हार्ट फेल्युअर, हृदयविकाराचा झटका किंवा इतर कोणताही हृदय विकार हा हृदयाच्या किती रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे यावर अवलंबून असतो.
अँजिओप्लास्टी:
अँजिओप्लास्टी म्हणजे अडथळा निर्माण झालेल्या किंवा अरुंद झालेल्या रक्तवाहिनीमध्ये फुग्या (बलून) चा वापर करून ती रक्तप्रवाहा साठी खुली केली जाते.
अँजिओप्लास्टी ही प्रक्रिया मोठी शस्त्रक्रिया म्हणून गणली जात नाही कारण कार्डिओ व्हस्क्युलर कॅथ लॅब मध्ये ती करताना रुग्ण शुद्धी मध्ये असतो किंवा त्याला थोड्या प्रमाणामध्ये गुंगी असते. अँजिओप्लास्टी ची प्रक्रिया ही रुग्णाच्या पाय किंवा हातामधील रक्तवाहिनी मध्ये छोटे छिद्र तयार करून त्या मधुन लहान ट्यूब आतमध्ये घालून केली जाते. या छोट्या ट्यूब ला कॅथेटर असेही म्हणतात. किंवा शस्त्रक्रिया तज्ञ हे अडथळा निर्माण झालेल्या, अरुंद झालेल्या रक्तवाहिनीमध्ये कायमस्वरूपी ची स्टेंट किंवा वायर मेश ट्यूब बसवतात. स्टेंट ही रक्तप्रवाह एकदम सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी ची बसवली जाते.
पेसमेकर किंवा कार्डियाक पेसिंग डिव्हाइस:
पेसमेकर हे बायपास शस्त्रक्रिया आणि औषधांबरोबर वापरले जातात. पेसमेकर हे अतिशय लहान उपकरण आहे जे छाती मध्ये हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बसवले जाते. पेसमेकर हे हृदयाचे ठोके अतिशय जलद गतीने किंवा अतिशय मंद गतीने पडू नयेत यासाठी वापरले जाते. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही ओपन हार्ट शस्त्रक्रियेची आवश्यकता पडत नाही कारण पेसमेकर हा त्वचेच्या खाली बसवला जातो.
इम्प्लांटेबल कार्डीओवर्टर डिफीब्रिलेटर (आय सी डी):
इम्प्लांटेबल कार्डीओवर्टर डिफीब्रिलेटर हा अशा रुग्णांमध्ये बसवला जातो ज्या रुग्णांचे हृदयाचे ठोके हे अति जलद गतीने पडत असतात. या उपकरणामुळे हृदय सर्व शरीराला व्यवस्थित रक्तपुरवठा करू शकते. ही समस्या नेहमी हृदयाचे स्नायू कमजोर असतील तर उद्भवते.
आयसीडी हे एक छोटे बॅटरी असलेले उपकरण आहे जे रुग्णाच्या छाती मध्ये बसवले जाते. हे उपकरण हृदयाच्या ठोक्यांची देखरेख करते आणि जर अनियमित किंवा असामान्य ठोके पडत असतील तर हृदयाला इलेक्ट्रिक शॉक पुरवते. हे शॉक हृदयाचे ठोके पुन्हा नियमित करते.
ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया:
हृदयाची ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया ही अशा रुग्णांमध्ये केली जाते ज्यांचे हृदय विकार हे विवीध औषध उपचार आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर देखील बरे होत नाहीत. ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिये दरम्यान शस्त्रक्रिया तज्ञ हे रुग्णाचे विकार बाधित हृदय काढून त्या ठिकाणी आरोग्यपुर्ण डोनर कडुन मिळालेले हृदय बसवतात.
सारांश
भारताचा विचार करता देशाची लोकसंख्या आहे आणि त्याप्रमाणामध्ये हृदयाचा त्रास होणाऱ्या लोकांची संख्या देखील अधिक आहे, यामागील काही कारणं फार मूलभूत आहेत. अनेकदा चुकीच्या लाईफस्टाईलमुळे सुद्धा आपल्याला आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये स्मोकिंग, स्ट्रेस, अल्कोहोल, ब्लड कॉलेस्ट्रॉल, स्थूलपणा यांसारख्या गोष्टींमुळे या समस्येत आपल्याला अधिक भर पडताना दिसते. तर दुसरीकडे वाढते वय यामध्ये सुद्धा साधारणपणे आपल्याला हाय ब्लडप्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक यांसारख्या समस्या साहजिकच वाढताना दिसतात. आनुवंशिक कारणामुळे सुद्धा यांसारखे आजार संभवतात.हृदय रोग म्हणजे फक्त हार्ट अटॅक नसून यामध्ये हाय ब्लडप्रेशर आणि त्याच्यामुळे होणारी कारणं किंवा त्यामुळे होणारे रोग म्हणजे पॅरालिसिस, हार्ट अटॅक या सगळ्यांचा समावेश असतो. आपण या गोष्टीचा विचार केला की भारतामध्ये या गोष्टीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे म्हणजे लेटेस्ट सर्वेक्षणानुसार भारतीय लोक हे हार्ट अटॅक किंवा हायपरटेन्शन किंवा त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडत आहेत आणि हे प्रमाणही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालले आहे.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know