Translate in Hindi / Marathi / English

Sunday, 7 January 2024

औषधी तिळाचा गोडवा | तिळातील पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक असतात | आरोग्यदाई बहूगुणी बहुपयोगी तीळ | थंडीच्या दिवसात तीळ खाणं अत्यंत आरोग्यदायी आहे

औषधी तिळाचा गोडवा

 

आरोग्यदाई बहूगुणी बहुपयोगी तीळ

हिवाळ्यात आहारामध्ये तिळाचं तेल वापरण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. गोडाधोडाचे पदार्थ किंवा डेझर्टचा स्वाद वाढवण्यासाठीही तिळाचा वापर केला जातो. थंडीच्या दिवसात तीळ खाणं अत्यंत आरोग्यदायी आहे. तिळातील पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक असतात. नवीन वर्षाची सुरवात उत्साहाने आणि आनंदाने आपण करतो. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी येणारी मकरसंक्रांत सर्वांचाच आनंद द्विगुणित करते. तीळ म्हटले की तिळगूळ, तिळाच्या वड्या संक्रांतीचा सण डोळ्यांसमोर येतो. सर्वांना प्रेमाने आपुलकीने हा तिळगूळ देऊन "तिळगूळ घ्या, गोड बोला' असे म्हणत स्नेह वाढवला जातोथोडक्यात तिळगुळाचा गोडवा, त्यातला स्निग्धपणा प्रत्येकाच्या स्वभावात असावा आणि त्यातून प्रेमाची नाती जोडली जावीत, अशी त्यामागची भावना असते.जानेवारी, फेब्रुवारी महिन्याच्या या कालावधीत ताजे तीळ मिळण्याचे प्रमाण जास्त आहे. गूळ, शेंगदाणे शरीरासाठी या दिवसात चांगलेच. म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास तीळगुळाचे लाडू, पोळी करण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.

संक्रांत

संक्रांत ज्या ऋतूत येते, तो ऋतू म्हणजे शिशिर ऋतू! थंड बोचरा वारा या ऋतूत जाणवत असल्याने थंडी कमी करण्यासाठी उष्ण पदार्थ योग्यत्या प्रमाणात वापरावेत. या कालखंडामध्ये शरीराचे बल उत्तम असते. अशा परिस्थितीत तिळगूळ, साजूक तूप गुळाची पोळी हे पदार्थ पथ्यकरच ठरतात. आपण स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी पांढरे तीळ आणतो. औषधामध्ये मात्र काळे तीळ वापरावेत. रोज तीळ चावून खाल्ल्यास शरीराचे बल वाढते. शिवाय दातही मजबूत होतात.

उत्तरायण

उत्तरायणातील शिशिर ऋतू प्रत्येकाच्याच आरोग्याची परीक्षा घेतो. या ऋतूत शारीरिक शक्ती कमी कमी होत जाऊन कोरडेपणा वाढू लागतो. मात्र याच ऋतूत असतो, कोरडेपणा कमी करून शरीरातील उष्णता वाढविण्यासाठी आवश्यक असणा-या तिळाच्या पदार्थाचं औचित्य घेऊन येणारा मकरसंक्रांतीचा सण! थंडीच्या दिवसात तीळ आणि गुळाचे पदार्थ थंडीचा प्रतिकार करण्यास उपयुक्त असतात.

२२ डिसेंबरपासूनउत्तरायणसुरू झालं आहे. उत्तरायणात सूर्य हळूहळू उत्तरेकडे मार्गक्रमण करू लागतो. आता संपत आलेला हेमंत ऋतू, पुढे सुरू होणारा शिशिर ऋतू, होळीनंतर येणारा वसंत ऋतू आणि उन्हाळ्याचा ग्रीष्म ऋतू हा सहा महिन्यांचा कालावधीउत्तरायणम्हणून ओळखला जातो. पौष, माघ आणि फाल्गुन हे महिने शिशिर ऋतूचे असतात. या ऋतूत वातावरण रुक्ष असतं. झाडाची पानगळ सुरू होते. जमीन कोरडी होते. कडू चवीचे पण थंड गुणधर्माचे पदार्थ या दिवसांत खाणं योग्य नाही. हेमंत आणि शिशिर ऋतू हे थंडीचे प्रमुख ऋतू आहेत. मात्र हेमंतापेक्षा शिशिरात थंडी अधिक असते. या ऋतूत असणा-या थंडीचा कोरडेपणा सर्वात जास्त असतो. कडू चवीचे परिणाम वातावरणाप्रमाणेच आपल्या शरीरावरही दिसू लागतात. शरीरात कोरडेपणा वाढू लागतो. त्वचा फाटते. टाचांना भेगा पडतात. सोरायसीस, त्वचा कोरडी पडणं यांसारखे त्वचा विकार बळावतात. त्वचेवर बारीक बारीक भेगा पडल्याने खाज सुटते. खाजवून झालेल्या जखमांत (व्रण) जंतुसंसर्ग होतो. जखमा अधिकच चिघळतात. केसांची रुक्षता वाढते. वातदोष वाढतो. फुफ्फुसातील श्वासवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन त्या आकुंचन पावतात. आतून कोरडया होतात. त्यामुळे दम्यासारखे रोग बळावतात. यावर एकच उपाय म्हणजे स्निग्ध आणि उष्ण गुणधर्म अधिक असलेल्या पदार्थाचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायचा.

तीळ आणि तिळाचे तेल

वैदिक काळापासून तीळ आणि तिळाचे तेल यांचे महत्त्व सर्वानी मान्य केलेले आहे. तांबे आणि मँगनीजने समृद्ध असलेले तीळ संधिवातातील दुखण्यासाठी उपयुक्त ठरतात. तिळातील झिंक हाडे बळकट करतात, तसेच मॅग्नेशियम श्वसनसंस्थेच्या व्याधीसाठी परिणामकारक ठरते. काळे तीळ तर जास्त गुणकारी. तिळाच्या तेलात कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत. तसंच तोंडातील रोग बरे करण्यासाठी आणि मसाज करण्यासाठी तिळाचे तेल वापरले जाते.

स्वयंपाकात तसेच औषधातही तीळ नित्य वापरले जातात. पांढरे तीळ आणि काळे तीळ असे तिळाचे दोन प्रकार असतात. यातील काळे तीळ गुणाने श्रेष्ठ समजले जातात.

तिळाचे औषधी गुणधर्म

तीळ चवीला कडवट, स्पर्शाने थंड असले तरी विपाकाने तिखट असतात, बुद्धी वाढवितात, दातांसाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात कफ वाढवितात.

तिळाचा औषध म्हणून वापर

 दात हलत असल्यास किंवा हिरड्यातून रक् वा पू येण्याची प्रवृत्ती असल्यास तीळ चावून खाण्याचा उपयोग होतो. एक-दोन चमचे तीळ चावून नंतर ते थुंकून दिले तरी चालतात. मुका मार लागला, एखादा शरीर भाग मुरगळला तर तीळ कुटून, गरम करून सुती कापडात बांधावेत. या पुरचुंडीने दुखावलेला शरीरभाग शेकण्याचा उपयोग होताना दिसतो.

तीळ खाण्याने शौचाला साफ होण्यास मदत मिळते. तिळाचे नियमित सेवन केल्याने जुन्यातील जुना मुळव्याधीचा आजार बरा होऊ शकतो. मुळव्याधची समस्या असल्यास दोन चमचे काळे तीळ चावून-चावून खावेत आणि त्यानंतर थंड पाणी प्यावे. या उपायाने मुळव्याध लवकर ठीक होण्यास मदत होईल.ज्या मूळव्याधीमध्ये रक्त पडते, त्यावर अर्धा चमचा तीळ बारीक वाटून चमचाभर घरच्या लोण्याबरोबर घेण्याचा उपयोग होतो. मूळव्याधीचे मोड फार दुखत असेल, तर त्या ठिकाणी तीळ वाटून तयार केलेली चटणी थोडी गरम करून लेप लावण्याचा उपयोग होतो.

वारंवार लघवी होण्याचा त्रास. सकाळ संध्याकाळ चमचाभर तीळ आणि ओवा यांचे समभाग मिश्रण घेण्याचा उपयोग होतो.

शरीरामध्ये कुठेही वायूमुळे चमक उठत असेल किंवा एखादा शरीरभाग उडत असेल.

 तर त्यावर तीळ बारीक करून गरम करून शेकण्याचा उपयोग होतो.

लघवी साफ होत नसेल, अडून राहिल्यामुळे ओटीपोट फुगल्यासारखे झाले असेल. अशा वेळी तीळ वाटून, गरम करून ओटीपोटावर लेपाप्रमाणे लावण्याने लघवीला साफ होण्यास मदत मिळते.

शरीर पोषणासाठीसुद्धा तीळ उत्तम असतात. चमचाभर तीळ पाण्यात भिजवून वाटले कपभर दुधात कोळून घेऊन त्यात चवीप्रमाणे अर्धा ते एक चमचा गूळ मिसळून घेतले तर शरीर पोषणास मदत मिळते.

डोक्यामध्ये खवडे होतात. तीळ कढईमध्ये जाळून तयार केलेली राख तिळाच्या तेलात मिसळून लावण्याचा उपयोग होतो.

शौचाला त्रास. खडा होणे, त्यामुळे गुदमार्गात वेदना होणे, क्वचित त्या ठिकाणी चिरा पडल्यामुळे रक्तस्राव होणे अशा त्रासांवर काही दिवस रात्रीच्या जेवणात तीळ टाकून तयार केलेली मुगाची पातळ खिचडी तूप असे खाणे पथ्यकर असते. यामुळे आतड्यांना आवश्यक ते वंगण मिळाले की वरील सर्व त्रास कमी होतात.

बद्धकोष्ठता दूर करण्यात फायदेशीर ठरतात. तीळ. बद्धकोष्ठता झाल्यास 50 ग्रॅम तीळ भाजून कुटून घ्या, त्यानंतर यामध्ये साखर मिसळून या मिश्रणाचे सेवन करा. या उपायाने बद्धकोष्ठता दूर होईल.

पोट दुखत असेल. एक चमचा काळे तीळ चावून-चावून खावेत आणि त्यानंतर कोमट पाणी प्यावे. या उपायाने पोटदुखी दूर होण्यास मदत होईल.

कान दुखत असेल. तिळाच्या तेलात लसणाच्या तीन-चार पाकळ्या भाजून घ्या. त्या तेलाचे दोन-तीन थेंब कानात टाका. या उपायाने कानाची समस्या दूर होईल.

कंबर, सांधे, अर्धांगवायू. हिंग आणि सुंठ टाकून गरम केलेल्या तिळाच्या तेलाने मालिश केल्यास कंबरदुखी, सांधेदुखी आणि अर्धांगवायू . आजार ठीक होऊ शकतात.

तोंडात व्रण.  तिळाच्या तेलात थोडेसे काळेमीठ टाकून तोंडातील व्रणावर लावा. या उपायाने तोंड आलेले बरे होईल.

खोकला. तिळाचे सेवन करा, खोकला ठीक होईल. तीळ आणि बारीक खडीसाखर पाण्यात उकळून घेतल्यास कोरडा खोकलाही ठीक होतो.

पाळीच्या वेळी अंगावरून कमी जात असल्यास. पाळीच्या तारखेच्या आठवडाभर आधीपासून एक चमचा तीळ एक चमचा जिरे यांचा चार कप पाण्यात एक कप शिल्लक राहीपर्यंत काढा करून, त्यात चवीनुसार गूळ  मिसळून घेण्याचा उपयोग होतो. मासिक पाळीचा त्रास असणा-या स्त्रियांनी तीळ खावेत. तिळामुळे मासिक पाळीचा स्रव स्वच्छ येतो.बरोबरीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने इतर आवश्यक उपचार करणेही चांगले.

तीळ हे नैसर्गिक तेलकटपणा आणि उष्मांकाचा सर्वाधिक साठा तिळाच्या तेलबियांमध्ये आहे. बाजारात पांढरे, काळे आणि लाल रंगाचे तीळ मिळतात. त्यापैकी पांढ-या तिळांचा वापर जेवणात अधिक केला जातो. तीळ हे मधूर चवीचे असले तरी त्यात किंचित कडवटपणा असतो. शरीरातील कफ आणि पित्त गुणधर्म तिळामुळे वाढत असला तरी ते वातशामक आहेत. वातशामक म्हणजे वात कमी करणारे. तीळ खाण्याने भूक वाढते. केसांचं आरोग्य उत्तम होऊन त्यांची वाढही चांगली होते. त्वचेचा रंग सुधारतो.

सर्व तेलांत तिळाचं तेल उत्तम असतं. इतर तेलांसारखं हे खराब होत नाही. या तेलात संतृप्त (सॅच्युरेटेड फॅट) आणि असंतृप्त (अनसॅच्युरेटेड फॅट) चरबी असणा-या घटकांचा योग्य प्रमाणात समतोल साधलेला असतो. त्यामुळे अनावश्यक कोलेस्टेरॉल वाढत नाही.

तिळाचे इतरही काही उपयोग पुढीलप्रमाणे

वातज आम्लपित्ताचा (अल्सर) त्रास. तिळाच्या तेलाने आराम पडतो. जेवणापूर्वी एक चमचा तिळाचं तेल पिऊन मग जेवावं. तीन ते चार

आठवडयांत हे रोग बरे होतात. पित्तज आम्लपित्तात मात्र तिळाच्या तेलाचा उपयोग करू नये.

पित्ताशयात पित्ताचे खडे. जेवणापूर्वी एक चमचा तीळ तेल प्यावं. या उपायाने पित्ताचे खडे आतडय़ात उतरतात.

वारंवार थोडी थोडी लघवी होत असल्यास.  तिळाच्या तेलाचा उपयोग होतो. यासाठी एक चमचा घेऊन तो आगीवर तापवता उन्हात तापवावा. त्यात तिळाचं तेल घेऊन ते थंड करावं. असं उन्हात तापवून थंड केलेलं तिळाचं तेल दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावं. या उपायाने वारंवार लघवी होत नाही. उलट ती साफ होते. तिळाचे तेल सामान्य तेलाच्या तुलनेत थोडेसे घट्ट असते, यामुळे या तेलाने मालिश केल्यास ते त्वचेमध्ये सहजपणे मिसळते. ज्यामुळे त्वचेला आतून पोषण मिळते.

तिळाच्या तेलाने नियमित मालिश केल्यास. ब्लड सर्क्युलेशन प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि क्षतिग्रस्त कोशिकांची दुरुस्ती होते.

सांधेदुखीसाठी. तिळाचेतेल गरम करावे आणि या गरम तेलाने कंबर, सांधे सर्वांना अभ्यंग (मालिश) करून शेकावे. त्यामुळे दुखणे कमी होण्यास मदत होते. म्हणूनच तर बाळंतिणीला तिळाचे तेल अंगाला लावण्याची पद्धत आहे.

तिळ मातेचे दूध वाढवतात. बाळंतिणीला तिळाचा लाडू, भाजलेले तीळ देण्याची प्रथा आहे. बाळंतशेपा, ओवा, भाजलेले तीळ, सैंधव, बडीशेप एकत्र करून बाळंतिणीला दिल्यास वाताच्या तक्रारी, गॅसेस होणे, पचन होणे या सर्वांस आराम मिळतो.

मूळव्याधीच्या त्रासात रक्त पडत असल्यास. लोणी-खडीसाखर, नागकेशर यांच्यासमवेत तीळ सेवन केल्यास चांगला परिणाम होतो.

लहान मुलांना काहीवेळा अपचन होऊन पोट दुखते. अशा वेळी बेंबीच्या भोवती गोलाकार तिळतेल चोळावे आणि गरम तव्यावर कापड गरम करून शेकावे. दुखणे लवकर कमी होते.

लहान मुलांची वाढ. पांढरे तीळ भाजून वाटून खाण्यासाठी दिल्यास त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते. तीळ, रसायनविरहित (ऑरगॅनिक) गूळ, शेंगदाणे, भाजलेल्या चण्याची डाळ आणि सुक्या खोबऱ्याच्या चकत्या एकत्र करून बनवलेलं पंचखाद्य मुलांना द्यावं.

दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी.  तीळ कधीही चांगले. तिळात मोठय़ा प्रमाणात कॅल्शियम आहे. ऑस्टिओपोरोसिस सारख्या विकारात तीळ तेलाने मसाज करून कोवळ्या उन्हात बसण्याने हा विकार कमी होण्यास मदत होते. एक चमचा काळे तीळ रोज चावून खाल्ल्याने दातांना बळकटी येते. रोज रात्री झोपताना तीळ तेलाने दात आणि हिरडयांना मसाज केल्याने दात स्वच्छ राहतात.

तिळाचे तेल बुद्धीवर्धक मानले जाते.  तिळामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळून येते. दररोज जवळपास 50 ग्रॅम तीळ खाल्ल्यास कॅल्शियमची आवश्यकता पूर्ण होते. तिळाच्या सेवनाने मानसिक दुर्बलता कमी होते.

तीळामधील अँटी-बॅक्टीरिअल गुणामुळे हे कोणत्याही प्रकराची जखम लवकर भरून काढतात.  या व्यतिरिक्त सूज आलेल्या अवयवांना आराम देतात तसेच सोरायसिस आणि एक्जीमा सारख्या त्वचा समस्यांना दूर करण्यास मदत करतात. शरीराचा एखादा अवयव भाजला असल्यास त्या ठिकाणी तीळ, शुद्ध तूप आणि कापूर यांच्या मिश्रणाचा लेप लावावा, आराम मिळेल.

तुमच्या घरातील लहान मुले रात्री अंथरून ओले करत असतील.  तर त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. कारण या समस्येवर तीळ रामबाण उपाय आहेत. यासाठी भालेले काळे तीळ गुळात मिसळून लाडू तयार करून घ्या. रात्री झोपताना मुलांना हा लाडू खाण्यासाठी द्या. या उपायाने मुले रात्री अंथरून ओले करणार नाही.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने बाजारात तिळाचे लाडू, तीळगूळ, चिक्की, गजक, रेवडी या पदार्थाची रेलचेल असते. आजकाल बनब्रेड किंवा तत्सम बेकरी उत्पादनांवरही तीळ भूरभूरवलेले असतात. तर अशाप्रकारे या ना त्या निमित्ताने तीळ आपल्या पोटात जात असतात. थंडीच्या दिवसांत तीळ आणि गुळाचे पदार्थ थंडीचा प्रतिकार करण्यास उपयुक्त असतात. तिळाचे लाडू किंवा चिक्की यासाठी उत्तम. तिळाबरोबर साखर वापरून केलेले गजक, रेवडी, तीळगूळ यांसारखे पदार्थ खाऊन शरीराचं थंडीपासून संरक्षण करण्याचा उद्देश साध्य होत नाही. कारण गुळापेक्षा साखर थंड आहे. शिवाय गुळात लोह या खनिजाबरोबरीनेआणिजीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर असतं. भाजलेले तीळ, खोबरे, शेंगदाणा, हरभ-याची भाजलेली डाळ, गूळ या पदार्थापासून बनवलेले लाडू खावेत. लाडू बनवण्यासाठी जर रसायनविरहित गूळ आणि पॉलिश केलेले तीळ वापरल्यास लाडू अधिकच पौष्टिक होतील. तिळाचे लाडू खाल्ल्याने पोट साफ होतं. हृदयविकाराचा त्रास असणा-यांसाठीही हे लाडू चांगले.  मधुमेह झालेल्यांनी मात्र गूळ-तिळाचे पदार्थ सांभाळून खावेत.

आतडय़ाच्या कर्करोगापासून बचाव. यासाठी तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. संक्रांतीला केलेला तिळगूळ, तीळ लावून केलेली भाकरी प्रसिद्ध आहे. भाजलेले तीळ तिखट-गोड पदार्थात पेरण्याची सवय ठेवल्यास ते सहज पोटात जातील.

सारांश

पांढरे शुभ्र, छोटेसे आणि नाजूक तीळ दिसतात खूप छान. बाजारात पिवळट, लालसर रंगाचे, काळे असे तीळ मिळतात; पण स्वयंपाकघरात प्रामुख्याने पॉलिश केलेले पांढरे तीळ वापरले जातात. तीळ हे म्यानमार, चीन, भारत अनेक अफ्रिकी देशांत पिकत असून नायजेरिया, सुदान, इथिओपिया या देशांतील तर ते एक मुख्य पीक आहे. तिळातील पोषक तत्त्वे, त्याचा स्वाद आणि कुरकुरीतपणामुळे अनेक खाद्यसंस्कृतीमधे त्याने महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. बिस्किटे, ब्रेड, केक्स अशा बेकरी प्रॉडक्ट्समधे स्टरफाय केलेल्या पदार्थांत ते वापरले जातात. तिळाच्या वड्या, लाडू, चिक्की, तीळ घालून गुळाच्या पोळ्या असे अनेक पदार्थ बनवले जातात. याव्यतिरिक्त तिळाची वेगवेगळ्या प्रकारांनी चटणी बनवली जाते. किंचित भाजून घेतलेले तीळ सॅलडमध्ये अथवा पदार्थ सजवण्यासाठी वापरतात. युरोपमध्ये मार्गारीन बनवताना त्यात तिळाचा वापर केला जातो. मध्यपूर्व देशातील पदार्थात तिळापासून बनवलेली पेस्ट म्हणजेताहिनीखूप वापरली जाते.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know