Translate in Hindi / Marathi / English

Tuesday, 5 December 2023

रात्री झोपेत घोरणे | पुरुषांचा घोरण्याकडे जास्त कल असतो | रात्री झोपेत घोरण्यावर उपाय | घोरण्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अथवा तुमच्या जोडीदाराची झोपमोड होऊ शकते | घोरण्याच्या सवयीचा राग येतो अथवा चिडचिड होऊ लागते | अती मेहनत अथवा दगदग झाल्यामुळे किंवा नाक चोंदण्यामुळेही तुम्ही घोरू शकता

रात्री झोपेत घोरणे

 

रात्री झोपेत घोरण्यावर उपाय

रात्री ठराविक पद्धतीने झोपल्याने घोरण्याचा तुम्हाला त्रास होतो का, मग काळजी करू नका. कारण ही समस्या तुमच्या प्रमाणे अनेकांना सतावत असते. मात्र तुमच्या अशा घोरण्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अथवा तुमच्या जोडीदाराची झोपमोड होऊ शकते. त्यामुळे सहाजिकच तुम्हाला तुमच्या घोरण्याच्या सवयीचा राग येतो अथवा चिडचिड होऊ लागते. कधी कधी या सवयीमुळे परक्या ठिकाणी झोपण्याची तुम्हाला अक्षरशः तुम्हाला लाज वाटू शकते. अती मेहनत अथवा दगदग झाल्यामुळे किंवा नाक चोंदण्यामुळेही तुम्ही घोरू शकता. म्हणूनच घोरण्याच्या समस्येकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.

पण माणसं का घोरतात?

घोरण्याची अनेक कारणे आहेत त्यातली मुख्य कारणे अशी आहेत.

चुकीचं झोपत असाल तर झोपताना घशाचा मागचा भाग थोडा अरुंद होतो. अशा स्थितीत, जेव्हा अरुंद जागेतून ऑक्सिजन आत प्रवेश करतो, तेव्हा आजूबाजूचे भाग कंपित होतात.

सर्दी नाक बराच काळ बंद चोंदलेलं असेल तर डॉक्टरांकडे जा. झोपेच्या गोळ्या, ॲलर्जीविरोधी औषधे श्वसनमार्गाचे स्नायू सुस्त करतात, ज्यामुळे लोक घोरतात.

खालचा जबडा लहान होणे हे देखील घोरण्यामागचे कारण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जबडा सामान्यपेक्षा लहान असतो, जेव्हा तो झोपतो तेव्हा त्याची जीभ मागे वळते. हे विंडपाइप अवरोधित करते. अशा परिस्थितीत श्वास आत बाहेर करताना कंप होतो.

वात आणि कफ अशा दोषांमुळे घोरायला सुरुवात होते. कफ वाढला की मांसाची वाढ होते, ज्यामुळे श्वसनमार्गामध्ये अडथळा निर्माण होतो. श्वासनलिकेत अडथळा निर्माण झाल्यामुळे वात वाढतो, ज्यामुळे मोठा आवाज निर्माण होतो.

लठ्ठपणा वजन वाढल्यामुळे घोरणे देखील येते. जेव्हा कोणाचे वजन वाढते, तेव्हा त्याच्या गळ्यात जास्त मांस लटकते. झोपताना, या मांसामुळे नळी चिकटते आणि श्वास घेणे कठीण होते.

भरपूर दारू पित असाल तर अनेक वेदनाशामक औषधांप्रमाणे अल्कोहोल देखील शरीराच्या स्नायूंचा ताण कमी करते आणि त्यांचा विस्तार करते. कधीकधी जास्त अल्कोहोल प्यायल्याने घशाचे स्नायू ताणतात, ज्यामुळे लोक घोरतात.

स्नायू कमकुवत होणे जेव्हा घशाचे आणि जीभेचे स्नायू खूप निवांत आणि आरामशीर होतात, तेव्हा ते लटकू लागतात. हे मार्ग रोखतात. हे सहसा गाढ झोप, जास्त मद्यपान किंवा झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे होते. वयानुसार स्नायू लटकणे देखील सामान्य आहे. त्यामुळे काही लोक वय वाढलं की घोरतात.

सायनस घोरण्याचे एक कारण म्हणजे सायनस. सायनसच्या वाढीमुळे अनुनासिक गोष्टी अडकतात. एवढच नाही तर घोरण्याचा आवाज वाढल्याने अनुनासिक भागांवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही सायनसचे रुग्ण असाल तर नेहमी खबरदारी घ्या. जर तुम्हाला सर्दी असेल, किंवा सायनस वाढल्याने त्रास झाला असेल तर झोपण्यापूर्वी वाफ नक्की घ्या. यामुळे सर्व घाण दूर होईल आणि श्वास घेणे सोपे होईल.

घोरण्यामगची कारणे काहिही असली तरी यासाठी तुम्हाला अनेक सोपे उपाय घरीच करता येतात. यासाठी जाणून घ्या घोरणे बंद करण्यासाठी उपाय

नाकात तूप सोडणे  

नाक चोंदण्यामुळे झोपेत तुम्ही नाकावाटे श्वास घेण्याऐवजी तोंडावाटे श्वास घेता आणि सोडता. ज्यामुळे तुमच्या नाक आणि तोंडातून घोरण्याचा आवाज येऊ लागता. हा घोरण्याचा त्रास कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे नाकात तूप सोडणे. यासाठी रात्री झोपताना नाकपुड्यांमध्ये शुद्ध तूपाचे काही थेंब सोडा. नियमित नाकपुड्यांमध्ये साजूक तूप सोडल्यामुळे हळूहळू तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ लागेल. तूप खाणे आरोग्यासाठी हितकारक आहेच शिवाय तुपाचा असा औषधाप्रमाणेही वापर करता येतो. यासाठी तूप खाण्याचे फायदे अवश्य जाणून घ्या.

वाफ घ्या

त्वचेची काळजी घेण्यासाठी अथवा सर्दीपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही बऱ्याचदा स्टीम म्हणजे वाफ घेतली असेल. सध्या कोरोना संक्रमण टाळण्यासाठी प्रत्येकाच्या घरी स्टीम घेण्याचे साहित्य असतेच. सर्दी खोकल्यावरील घरगुती उपाय म्हणून हा उत्तम पर्याय आहे. घोरणे बंद करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी वाफ घेणे. वाफ घेतल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होतो. श्वसनमार्गात कफामुळे निर्माण झालेला अडथळा वाफ घेण्या मुळे कमी होतो. त्याचा चांगला परिणाम तुमच्या घशा आणि नाकाच्या कार्यावर होतो आणि तुमचे झोपेत घोरणे बंद होते.

निलगिरी तेल

जर तुम्हाला सतत सर्दीचा त्रास होत असेल आणि त्यामुळे तुम्ही घोरत असाल. तर झोपेत घोरणे बंद करण्यासाठी उपाय करून तुम्ही तुमची सर्दी आणि घोरण्याचा त्रास दोन्ही बरी करू शकता. निलगिरीचे  तेल उग्रवासाचे आणि निर्जंतूक करणारे असते. ज्यामुळे तुमचे सर्दीचे इनफेक्शन लवकर बरे होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात निलगिरीचे काही थेंब टाका आणि या पाण्याची वाफ घ्या. वाफ  चेहऱ्यावर घेतल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल. श्वसनमार्ग मोकळा झाल्यामुळे तुम्हाला घोरण्याची समस्याही कमी होईल.

भरपूर पाणी प्या

शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी दररोज आठ ग्लास पाण्याची शरीराला गरज असते. मात्र एवढंच नाही तर नियमित पुरेसे पाणी पिण्यामुळे तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ शकतो. हे ऐकून तुम्हाला कदाचित  आश्चर्य वाटेल. मात्र लक्षात ठेवा जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा तुमच्या नाक आणि श्वसन मालिकेतील ओलसरपणा कमी होतो. श्वसनमार्गाचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी हा ओलसरपणा गरजेचा असतो. श्वसनमार्ग अती कोरडा झाल्यामुळे  तुम्हाला घोरण्याचा त्रास होऊ लागतो. यासाठीच हा त्रास कमी करण्यासाठी मुबलक पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहिल. त्याचप्रमाणे जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे

पुदिना तेल

पुदिन्याचे फायदे आपल्यापैकी बरेच जणांना माहीत असतीलच. पुदिना तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात टाका आणि त्या पाण्याने गुळण्या करा. सकाळी आणि रात्री या पाण्याने गुळण्या केल्यामुळे तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ शकतो. कारण जर तुमच्या श्वसनमार्गाला सूज आल्यामुळे तुम्ही घोरत असाल तर या उपायाने ती सूज कमी होऊ शकते. सूज कमी झाल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होईल आणि तुमचा घोरण्याचा त्रासही कमी होईल. घरच्या घरी घोरणे बंद करण्याचा उपाय करण्यासाठी ही एक सोपी युक्ती आहे.

झोपण्याची पोझिशन बदला

ज्या लोकांना पाठीवर झोपण्याची सवय असते अशी माणसं खूप मोठ्या प्रमाणावर घोरतात. कारण पाठीवर झोपल्यामुळे तुमच्या श्वसनमार्गात अडथळे येतात. ज्याचा परिणाम तुम्ही मोठ मोठ्याने घोरू लागता. जर तुमच्या घोरण्यामुळे घरातील इतरांची झोपमोड होत असेल तर तुमच्या झोपण्याच्या पोझिशनमध्ये बदल करून पाहा. कुशीवर झोपणं हे आरोग्यासाठी नेहमीच चांगलं असतं. त्यामुळे डाव्या अथवा उजव्या कुशीवर झोपा. झोपण्याची पद्धत लगेच बदलणं सोपं नसलं तरी सरावाने ते नक्कीच शक्य आहे.

जीभ आणि घशाच्या स्नायूंचे व्यायाम

तुम्ही तेव्हाच घोरता जेव्हा तुमची जीभ आणि घशाचे स्नायू रिलॅक्स होतात. त्यामुळे जीभ आणि घशाच्या स्नायूंचे व्यायाम करून तुम्ही तुमचे घोरणे बंद करू शकता. यासाठी जीभ आणि घशाच्या स्नायूंवर योग्य ताण येईल असे व्यायाम नियमित करा. गाणं हा नाक,जीभ आणि घशाच्या स्नायूंना व्यायाम देणारा योग्य उपक्रम आहे. याचप्रमाणे तज्ञ्जांकडून जीभ आणि घशाचे इतर व्यायामदेखील शिकून घ्या आणि त्याचा सराव करा. घोरणे बंद करण्यासाठी उपाय केल्याने नक्कीच चांगला फायदा होईल.

पुरेशी झोप घ्या

थकवा अथवा अती कष्टामुळेही तुम्ही झोपेत घोरण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला पुरेसा आराम मिळणे खूप गरजेचं आहे. चांगल्या आरोग्यासाठी दिवसभरात कमीत कमी आठ तास झोपण्याची गरज असते. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर अशक्तपणा आणि थकव्यामुळे तुमच्या श्वसनमार्गाच्या कार्यात अडथळे  येतात आणि जेवढा वेळ तुम्ही झोपता तेवढा वेळ तुम्ही घोरू लागता. यासाठीच शांत आणि निवांत झोप मिळेल असे घरगुती उपाय करा. लवकर झोपा आणि वेळेवर उठा म्हणजे तुमचे जीवनचक्र सुरळीत सुरू राहील आणि हळू हळू घोरण्याची सवय कमी होईल. यासाठी जाणून घ्या शांत झोप लागण्याचे उपाय

वजन कमी करा

ज्या लोकांचे वजन जास्त असते त्यांना घोरण्याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. याचं कारण अगदी सोपं आहे कारण अती वजनामुळे अशा लोकांच्या शरीरात जास्त चरबी जमा होते. घसा आणि नाकाकडील भागात जमा झालेले फॅट्स तुमच्या श्वसनमार्गात अडथळे निर्माण  करतात. ज्यामुळे झोपताना तुमच्या श्वसनाचा मार्ग अरूंद होतो आणि तुम्ही घोरू लागता. झोपेत घोरणे बंद करण्यासाठी थोडे वजन कमी करा. यासाठी तुमच्या डाएटवर योग्य लक्ष द्या, नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या.

मध

मध हे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. मधाचे फायदे अनेकलआहेत. मधाचे हळदीसोबत चाटण घेतल्यामुळे सर्दी, खोकल्यासारख्या आरोग्य समस्या कमी होतातकोमट पाणी अथवा दुधातून मध घेतल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होतो. यासाठीच जर तुम्हाला घोरण्याचा त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी दुधातून मध अवश्य घ्या. ज्यामुळे तुमच्या श्वसनमार्गातील अडथळे कमी होतील आणि तुमच्या घोरण्याचा त्रास कमी होऊ लागेल.

हळदीचे दूध

अनेक आरोग्य समस्यांवर हळद गुणकारी आहे. रात्री झोपताना हळदीचे दूध पिण्याने आरोग्याला अनेक चांगले फायदे होतात. त्यामुळे आजारी पडल्यावर अथवा शांत झोप लागण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र एवढंच नाही या उपायाने तुम्ही तुमचे घोरणे देखील थांबवू शकता. नियमित झोपताना हळदीचे दूध पिण्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्हाला निवांत झोप लागते. श्वसनमार्गातील समस्या दूर झाल्यामुळे तुमचे घोरणे आपोआप कमी होत जाते.

वेलची पावडर

तुम्ही अनेक प्रयत्न करूनही तुमचा घोरण्याचा त्रास कमी झाला नसेल तर वेलचीचा फायदा नक्की होईल. वेलचीचा हा उपाय जरूर करून पहा. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधातून वेलची पावडर मिसळून घ्या. जर तुम्हाला दूध पिणे आवडत नसेल कोमट पाण्यातून तुम्ही वेलची पावडर घेऊ शकता. हा उपाय रोज केल्यामुळे काही दिवसांनी तुमचा घोरण्याचा त्रास नक्कीच कमी होईल. वेलची खाण्याचे फायदे अनेक आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. शांत झोप लागण्यासाठी तुमची घोरणे बंद व्हायला हवे.

सारांश

पुरुषांच्या श्वासोच्छवासाच्या नळ्या स्त्रियांच्या नलिकांपेक्षा पातळ असतात, त्यामुळे बघा पुरुषांचा घोरण्याकडे जास्त कल असतो. हा त्रास अनुवांशिकदृष्ट्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये देखील पसरतो. टॉन्सिल्सची वाढ. जीभ जाड. सर्दीमुळे किंवा नाकातील हाडांमुळे नाकात अडथळा अशा कारणांनी लोक घोरतात. झोपेत घोरणारी व्यक्ती बघितली की, किती शांत झोपलाय अशी सहज प्रतिक्रिया येते. मात्र, ही शांत झोप नसून ती काळ झोप असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हे घोरणं आरोग्याला घातक आहे. झोपेत घोरत असताना घोरणाऱ्या व्यक्तीचे कंठ बंद होऊन शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घोरणाऱ्या व्यक्तीला डायबेटीस, ब्लड प्रेशर आणि हार्टअटॅकसारखे आजार होऊ शकतात.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know