Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 13 December 2023

मार्गशीष महिन्याच्या दर गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजेस धार्मिक महत्व आहे | गुरुवारी सवाष्ण महिला मनोभावे महालक्ष्मी व्रत करतात | हे व्रत केल्यास घरात सुख समृध्दी नांदते | मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा | घरच्याघरी पटकन तयार होणाऱ्या काही नैवेद्य रेसेपीज

महालक्ष्मीमातेचं व्रत

 

मार्गशीर्ष गुरुवार पूजा

मराठी महिन्यातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. या महिन्यात  लक्ष्मी मातेच्या पूजेला विशेष महत्व आहे. किंबहुना मार्गशीष महिन्याच्या दर गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजेस धार्मिक महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सवाष्ण महिला मनोभावे महालक्ष्मी व्रत करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं.  हे व्रत केल्यास घरात सुख समृध्दी नांदते.

मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा

सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर आणि प्रजेला सांभाळणारा होता. त्याला एक राणी होती तिचं नाव सुरतचंद्रिका होतं. राणी दिसायला अतिशय देखणी होती मात्र  प्रचंड अहंकारी होती. सुख, समृद्धी, ऐश्वर्यात लोळण राणी घेत होती. राजाही तीचे हवे नको ते लाड करीत असे आणि तिच्या बऱ्याचशा गोष्टींचे त्याला कौतुक असल्याने तिला गर्व झाला होता. त्या दोघांना सात सूपुत्र आणि एक कन्या होती.  या कन्येचे नाव शामबाला होतं.

एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला, की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जावून राहते. त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल. परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरिबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहील.  या उद्देशाने लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रुप धारण करुन भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्रीचे रुप धारण करुनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रुपातील लक्ष्मी देवीने सांगितले की, तुझी राणी मागच्या जन्मात एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरुन ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते लक्ष्मीचं व्रत होतं. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचं दारिद्रय नष्ट झालं.

लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली. मात्र देवीला विसरली. म्हणून त्याचीच आठवण करुन द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्री रुपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते. त्यानंतर दासी महलात जावून राणीसाहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली महती ऐकवते. मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्री रुपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी शामबाला भेटते. शामबालाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर शामबाला वृद्ध स्त्रीची माफी मागते. देवीला तिची दया येते आणि ती मार्गशीष महिन्यातील गुरुवारचे महत्त्वही पटवून देते. तो दिवस मार्गशीष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. शामबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं. पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते.

मात्र सुरतचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेलं दारिद्रय पाहून राणी राजाला विनंती करते की, आपला जावई खूप धनवान आहे. आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्याची विनम्रतेने चौकशी करतात. तेव्हा तो राणी शामबालाचा वडिल असल्याचे समजते. ही खबर दासी राणीपर्यंत पोहचवतात. तेव्हा राज पोशाख पाठवून अगदी थाटामाटात शामबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वान्नांचं भोजन होतं. परतताना जावई सुवर्णमुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यावर सुरतचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात.

नशीबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सुरतचंद्रीका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी शामबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करु लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने जगू लागतात.

काही दिवसांनंतर शामबाला आपल्या माहेरी येते. तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्यं ती करत नाही. याउलट अपमान करते. सासरी परताना तिला काहीच देत नाही. मात्र याचं कोणतंही दुःख करुन घेता मूठभर मीठ घेऊन ती सासरी परतते.

सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो, माहेरुन काय आणणलंस? त्यावर ती उत्तरते मी तिथेलं सार आणले आहे. याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाखतो. त्यानंतर शामबाला पानात थोडसं मीठ वाढतो. त्या मीठाने साऱ्या अन्नाला चव येते.

तेव्हा शामबाला म्हणते, हेच आहे माहेरुन आणलेले सार. मीठ जीवनाचे अमृत आहे! अन्नाला चव येते ती मिठानंच! मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं, त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शामबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो.

त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासर्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले. भद्रश्रवा जावयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रूसैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळते. या व्रतामुळे राजा-राणी सुखी झाले.

मार्गशीर्ष गुरुवार पूजा करण्याची योग्य पद्धत

मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे

मार्गशीर्ष महिन्यात गुरवारी देवीची पूजा करतो.अप आपल्याला माहिती नसते पुज्या कशी केली पाहिजे त्यांची योग्य पद्धत त्यामुळे मी आपल्या पूज्या कश्या पद्धतीने करायला पाहिजे ही माहिती खालीप्रमाणे दिली आहे.

1.पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.

2.रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा.

3.चारीबाजूला रांगोळी काढावी.

4.चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे.

5.त्यावर हळद-कुंकू वाहावे.

6.पाण्याच्या तांब्यात दूर्वा, सुपारी आणि शिक्का सोडावा.

7.कलशाला बाहेरून हळद- -कुंकवाचे बोटं लावावे.

8.तांब्याच्या आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा.

9.कलश चक्राकारावर ठेवावा.

10.समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.

11.लक्ष्मीसमोर दिवा लावावा.

12.लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी.

13.फळ, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा.

14.देवीला कमळाचे फूल अर्पित करावे.

15.लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी.

16.श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे.

17. व्रत कथा वाचावी. मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी.

18.संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे.

19.गायीसाठी एक पान वेगळं काढावे.

20.नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे.

21.दुसर्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्या झाडाला घालावे.

22.पाने घरातील चारी बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टाकावे.

 शेवटल्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा.

मार्गशीर्ष गुरुवार व्रत नियम

ही पूजा शक्य तितक्या प्रातःकाळी करावी. दिवसभर उपवास करून त्यानंतर सायंकाळी महालक्ष्मीला नैवैद्य दाखवून मगच उपवास सोडावा. या व्रतात खंड पाडू नये, काही आकस्मिक अडचण आल्यास कुटुंबातील अन्य सदस्याने उपवास पूजा करावी. महालक्ष्मी व्रताची कथा आवर्जून वाचावी. सात कुमारिकांना वा सवाष्ण स्त्रियांना हळदी- कुंकू, फळं, द्यावीत तसेच व्रताच्या पहिल्या वर्षी लक्ष्मी व्रत काठाची पुस्तके वाटावीत. असं म्हणतात, जो कोणी या व्रताचे पालन करतो त्याच्या संसारात महालक्ष्मीचा वरदहस्त टिकून परिणामी धनधान्य, समृद्धी याची वृद्धी होत राहते.

मार्गशीर्ष गुरुवार उपवास स्पेशल

मार्गशिष महिन्याच्या गुरूवारी अनेकजणी महालक्ष्मीचे उपवास करतात. काहींना उपवास करणं जमत नाही. पण देवासमोर नैवेद्य ठेवण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ तयार केला जातो. घरच्याघरी पटकन तयार होणाऱ्या काही नैवेद्य रेसेपीज पाहूया. जेणेकरून कमीत कमी वेळात तुम्ही चविष्ट नैवेदय देवासमोर दाखवू शकता.

नैवेद्याला पर्याय: झटपट करा काही खास पदार्थ.

१)    खीर: तांदळाची किंवा रव्याची, शेवयांची खीर अगदी पटकन तयार होते.  वेगळ्या चव आणि सुगंधासाठी तुम्ही खीरमध्ये केशर आणि गुलाबजल देखील घालू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खीरमध्ये केशरही घालू शकता.

२)  शीरा: शीरा बनवण्यासाठी रवा चांगला भाजून घ्या.  शीरा बनवताना तुम्ही सिजनल फ्रुट्स घालून वेगळीच चव देऊ शकता.

३)   गुलाबजामून: गव्हाच्या पीठाचे किंवा झटपट तयार होणारे ब्रेड गुलाबजामून तुम्ही करू शकता.

४)  बासुंदी: घटक

1.5 लिटर दूध

100 ग्राम साखर

1/2 टीस्पून वेलची जायफळ पूड

चिमुटभर केशर

बदाम, पिस्ते, चारोळी आवडीप्रमाणे

कुकिंग सूचना

स्टेप 1: जड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करण्यास ठेवावे. एक उकळी आली की गॅस मंद करावा दूध आटवण्यास ठेवावे.

स्टेप 2: वाटीभर दुधात केशर भिजवावे.बदाम पिस्ते चार पाच तास भिजत घालावे. नंतर त्याची साले काढून काप करावे.

स्टेप 3: दूध जसे जसे आटत जाईल तसा त्याचा रंग गुलाबी होतो. तेव्हा त्यात केशर साखर घालावी. मधे मधे ढवळत राहावे. दूध अर्धे आटवावे. शेवटी वेलची जायफळ पूड घालावी. थंड करून फ्रिज मध्ये तीन चार तास ठेवावी. पुरी बरोबर सर्व्ह करावी. बासुंदी थंड गरम कशीही चांगली लागते.

५) गाजर हलवा: थंडीत फ्रेश गाजर बाजारात खूप मिळतात. नेहमी तेच तेच करून कंटाळा आला असेल तर तुम्ही यावेळी गाजरचा हलवा करू शकता.

सारांश

सर्व स्त्रियांचा भक्तीभावाचा महिना म्हणजे मार्गशीष महिना या दिवशी सर्व महिला आपल्या घरामध्ये श्री महालक्ष्मी व्रताची कथा मराठी मध्ये वाचतात श्री महालक्ष्मी ची आरती मराठी मध्ये वाचली जाते महालक्ष्मीची पूजा विधी केली जाते त्यामुळे या महिन्यात स्त्रिया श्री महालक्ष्मीची भक्तिभावाने पूजा अर्चना करतात. श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान घरात नांदावे; म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं मानलं जातं.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.



No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know