तुळशी विवाह
तुळशीच्या विवाहाची कथा
दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत सुरूच असते असं म्हटलं जातं. तुळशीचं लग्न झालं, की दिवाळी संपते. कार्तिक महिन्यातील प्रबोधनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा, म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या चार दिवसात कधीही तुळशीचं लग्न घरोघरी लावलं जातं. हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त सुरू होतात.
तुळशी विवाह एका पुजोत्सव हरीविष्णूचा तुळशीशी विवाह लावणे असा याची विधी आहे. विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशीवृंदावन सारून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस व झेंडूची फुलांची झाडे उभी करतात. तुळशीच्या मुळाशी चिंचा व आवळे ठेवतात. तुळशी विवाह कार्तिकी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी करावा त्यात उत्तरा भाद्रपद, रेवती व अश्विनी ही नक्षत्रे तुळशी विवाहाला श्रेष्ठ मानण्यात आले आहे.
आपल्या कुठल्याही सणाची एक गोष्ट असते. तशीच ती तुळशीच्या विवाहाचीही आहे. ही प्रथा कधी सुरू झाली? त्याचं कारण काय? या सगळ्या गोष्टी एका कथेमध्ये आहेत.
तुळशी ही पूर्वीच्या जन्मात वृंदा या नावाने ओळखली जायची. मथुरेच्या कालनेमी या दैत्य राजाला मुलगी झाली, त्याने तिचं नाव वृंदा असं ठेवलं. तर ही वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त. वृंदा जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जालंदर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं.
आता हा जालंदर कसा जन्माला याची पण एक कथा आहे. स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झालं आणि दोघांची लढाई सुरू झाली. त्यात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला, परंतु देवांचे गुरु बृहस्पति यांनी यामध्ये मध्यस्थी केली. त्यांनी शंकराची विनवणी केली की, "यातून कोणताही विध्वंस घडवू नका. इंद्राला माफ करा."
शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला व आपल्या डोळ्यातील आग तिथे सोडली. त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आलं, तोच हा जालंदर. त्याच्यासाठी एक राज्यही निर्माण करण्यात आलं.
हा जालंदर शूर होता, पराक्रमी होता, पण तितकाच घमेंडी, गर्विष्ठ आणि सत्तापिपासू होता. त्याचं लग्न वृंदाशी झालं आणि त्याला तिच्या पूजेतलं पुण्य मिळालं. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्य मिळालं. असं म्हणता येईल, की तिने आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षाकवच निर्माण केलं.
तो जेव्हा युद्धाला जायचा, त्यावेळेस वृंदा पूजेला बसायची आणि तो परत येईपर्यंत तिथून हलायची नाही. त्यामुळे त्याला प्रत्येक युद्धात जीवनदान मिळायचं आणि त्याचाच विजय व्हायचा. त्यामुळे मग हा जालंदर वाट्टेल तसा वागू लागला.
जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला, त्यावर मग जालंधर स्वतः हक्क सांगू लागला. त्याचं असं म्हणणं होतं, की “माझा जन्म समुद्रात झाला आहे. त्यामुळे समुद्रातल्या गोष्टींवर माझाच हक्क आहे." अर्थात देवांनी त्याची मागणी धुडकावून लावली, परंतु जालंदर देवांशी युद्ध करायला लागला.
त्याच्या पराक्रमामुळे आणि वृंदाच्या तपश्चर्येमुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला. मग सगळ्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली. सगळे देव विष्णूला विनवणी करू लागले, की "जालंदरचा नायनाट करा.”
परंतु विष्णूची एक अडचण होती, ती म्हणजे लक्ष्मीने त्याच्याकडून वचन घेतले होते, की भगवान विष्णू जालंदरला मारणार नाहीत. कारण लक्ष्मी ही देखील समुद्राचीच कन्या. त्यामुळे जालंदरला ती भाऊ समजत होती. भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता. त्यामुळे भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हते.
याचा परिणाम हाच झाला, की शेवटी युद्धात जालंदरचा विजय झाला आणि जालंदर हा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करू लागला.
यामुळे देवांना पळता भुई थोडी झाली. मग सगळ्या देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं. जालंदरचा वध कसा करायचा याचा एक दुसरा पर्यायदेखील देवांनी शोधून ठेवला होता. केवळ भगवान शंकरच जालंदरचा वध करू शकत होते, परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते. म्हणूनच शंकरांनी युद्ध करावं यासाठी देवांना नारदाची मदत हवी होती.
नारद देवांना मदत करायला तयार होते. ठरल्याप्रमाणे नारद जालंदरला भेटायला गेले आणि तिथे त्यांचं बोलणं सुरू झालं. नारदांनी त्याच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नारदांनी त्यांचं कौतुक केलं पण म्हणाले की, “हे सगळं छान आहे, पण जालंदर तुझ्याकडे कैलास पर्वत नाही” आणि नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे याचं वर्णन करायला सुरुवात केली. त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचही वर्णन केलं.
नारदांचे ते सगळं बोलणं ऐकून घमेंडी जालंदरला वाटायला लागलं, जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात. कैलास आपल्याकडे असावा आणि पार्वती ही आपली व्हावी आणि मग हव्यासापोटी जालंदर, कैलास पर्वतावर चालून गेला.
तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकरांनी देखील युद्ध चालू केले. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. तसा शंकरांचा पराभव करणे कोणालाही शक्य नाही, परंतु वृंदेच्या पूजेमुळे जालंदरचा वधही करता येत नव्हता.
जालंदरला कोणतंही रूप घेण्याची विद्या अवगत होती. युद्ध करता करताच त्याने शंकराचे रूप धारण केले आणि तो पार्वतीकडे जाऊ लागला, परंतु पार्वतीने शंकराच्या रुपातील जालंदरला ओळखले आणि तिनेच जालंदरवरती हल्ला केला. जालंदर पळून गेला. मग पार्वती विष्णूकडे गेली आणि म्हणाली, "जालंदरने आत्ता मला फसवायचा कसा प्रयत्न केला, तसाच तुम्ही वृंदा बरोबर करा.”
तिकडे वृंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पूजा करत बसलेली होती. जालंदर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती. सगळे देव विष्णूचा धावा करू लागले, परंतु यामध्ये विष्णूला वृंदाला फसवायचं नव्हतं. कारण ती त्यांची निस्सीम भक्त होती, परंतु तिकडे युद्धात जालंदरची हार होणे देखील गरजेचे होते. म्हणून मग शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूंनी जालंदरचं रूप घेतलं आणि ते जालंदरच्या राजवाड्यात वृंदा पूजेला बसली होती तिथे गेले.
जालंदरला तिथे पाहून वृंदा पूजेवरुन उठली आणि तिने जालंदरच्या पायाला हात लावून नमस्कार केला, पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि तिकडे शंकरांनी जालंदरचा वध केला आणि जालंदरचे शीर राजवाड्यात येऊन पडले.
वृंदेला कळून चुकले की, आपल्यासमोर जालंदर म्हणून जो उभा आहे तो जालंदर नाही. म्हणून तिने विचारलं की, “माझ्यासमोर उभा आहे तो कोण आहे?” मग विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले.
विष्णूंना तिथे पाहून वृंदाला कळून चुकले की, आपल्याच देवाने आपल्याला फसवले आहे. म्हणून वृंदा चिडली आणि तिने विष्णूला शाप दिला, की तुम्ही हृदयशून्य दगड आहात, तू आता दगडच होशील.” त्याबरोबर विष्णू दगड झाले. त्यालाच शाळीग्राम असे म्हणतात.
बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सर्व जग व्यापू लागला. त्यामुळे संपूर्ण भूमंडळला धोका निर्माण झाला. मग परत सगळे देव आणि लक्ष्मी देखील वृंदेची प्रार्थना करू लागले. शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेने आपला शाप मागे घेतला.
जालंदरचं शीर आपल्या मांडीवर घेऊन वृंदाने अग्नीत प्रवेश केला. तिची जळून राख झाली. त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली. तिचंच नाव विष्णूंनी 'तुळशी' असं ठेवलं.
त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं, की तुळशी बरोबर नेहमी शाळीग्राम असेल. तुळशीचे रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि त्याची पूजा केली जाईल. विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशीपत्र असेल. म्हणूनच असं मानलं जातं, की तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूपर्यंत पोहोचते. मग ते नेवेद्य असो, दान दिलेले धन असो किंवा आणखी काही.
ही घटना कार्तिक महिन्यात घडली म्हणूनच या दिवसात तुळशी विवाह केला जातो. हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्याची लेणी दिली जातात. लग्नाचे सगळे विधी केले जातात आणि लग्न लागल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाते.
आता ही कथा आणि प्रथा जर पाहिली तर काहींना हा पुराणातला फोलपणा आहे असेही वाटेल. वृंदा जर इतकी नवऱ्याच्या सुखासाठी झटत होती, तर आपल्या नवऱ्याने चांगलं काम करावं यासाठी तिने का प्रयत्न केले नाहीत असेही वाटू शकते. किंवा काहींना देवांच्या गोष्टीतही स्त्रीला दुय्यम स्थान आहे असंही वाटू शकतं.
पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर आपण विचार केला तर, आपल्या लक्षात येईल की बहुगुणी तुळशीचे औषधी गुणधर्म माहीत झाल्यामुळेच आपल्या पूर्वजांनी तुळस घराघरात असावी असा विचार केला असावा, परंतु "ही औषधी वनस्पती आहे आणि घरात लावावी" असं सांगितलं तर लोक लावतील याची खात्री नाही. यामागे काही धार्मिक अधिष्ठान लावलं, की ते मात्र पाळलं जातं हे लक्षात आल्यामुळेच अशाप्रकारे तुळशीचं महत्त्व जपलं गेलं असावं.
सारांश
या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र छान वाटते, की भारतीय संस्कृतीत आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आदर व्यक्त केला जातो. आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचाही विचार केला जातो. वटपौर्णिमेला वडाची पूजा होते, पोळ्याला बैलांची पूजा होते. तुळशी विवाहाला तुळशीची. आरोग्य दृष्टाही तुळस मानवाला अतिशय उपायकारक ठरली आहे. तुळशीत कार्बोजिक ऍसिड वायू शोषून घेऊन ऑक्सीजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास उपयोग होतो. दारात तुळशीचे झाड असेल की, घरात पिसवा व हिवतापाचे जंतू सहसा शिरकाव करीत नाही. तुळशीपत्रांचा अर्क बर्याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो.पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते. नवमी, दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणाला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पानी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. “जेथे आहे तुळशीचे पान तेथे वसे नारायण” अशी संत बहीणा बाईने तुळशी महात्म्याची थोरवी गायली आहेत.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know