संवादकौशल्य
जीवन घडवण्यासाठी संवाद कौशल्य ही गुरुकिल्ली
संवाद कौशल्य हे असे कौशल्य आहे जे तुम्हाला तुमचे कोणत्याही विषयातील किंवा क्षेत्रातील करिअर असो त्यात तुम्हाला यश मिळवून देऊ शकतं. आपल्याकडे एक म्हण आहे की, 'बोलणाऱ्याचे दगडही विकले जातील, पण न बोलणाऱ्याचे चणेसुद्धा विकले जाणार नाहीत.' अत्यंत बोलकी म्हण आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात संभाषण कला प्रत्येकाला अवगत असायला हवी. विशेषतः उद्योजकांना तर याची जास्त गरज आहे.
माहितीचं आदानप्रदान योग्य रीतीने होऊन, त्यातून चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी 'संवाद' ही पहिली पायरी असते. व्यक्तिमत्त्व प्रभावशाली करण्यासाठी आणि संवादाच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी, वैयक्तिक जडणघडणीबरोबरच व्यावसायिक जीवनात हमखास यश मिळविण्यासाठी 'संवाद कौशल्य' अत्यंत आवश्यक आहे. संवाद कौशल्य जन्मजात नसतं, अनुवांशिकरित्याही मिळत नसतं. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. हे एक असे कौशल्य आहे जे प्रत्येकजण आत्मसात करू शकतं.
संवादकौशल्यतेची आवश्यकता
नोकरी असो किंवा स्वतःचा बिझनेस असो, त्यात ज्यांच्यापर्यंत आपले काम आणि विचार पोचवायचे आहेत त्या व्यक्तीचं वय, शिक्षण, आर्थिक व सामाजिक स्तर, सांस्कृतिक पार्श्वभूमी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद करणे आवश्यक असते. यशस्वी उद्योजक व्हायचं असेल, तर त्यासाठी व्यावसायिक कौशल्यांबरोबर आत्मविश्वास, जोखीम पेलण्याची तयारी आणि वाटाघाटीचं कौशल्यही हवंच. व्यवसाय करताना कुठे कुठे संवाद कौशल्य महत्त्वाचे असते त्याचे काही मुद्दे पाहू.
परस्पर संवाद:
प्रत्येक व्यावसायिकाचा नानाविध लोकांशी सतत संबंध येत असतो. त्यामुळे लोकांशी संवाद साधायला तुम्हाला आवडते का, हे अगोदर तपासा. तुम्ही लोकांशी कशा प्रकारे वागता यावर तुमचं यश अवलंबून असते. संवाद कौशल्य घडवताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे स्वतःच बोलणे इतरांना ऐकवणे हे नव्हे, तर इतरांचे बोलणे ऐकणेसुद्धा आले. एक चांगले संभाषण ते असू शकते जिथे एकमेकांचे ऐकून घेतले जाते.संवाद कौशल्यातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांशी सकारात्मक संबंध जोडणे होय. यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक असते.
सहसंवेदना
सहसंवेदना हा मुद्दा संवाद कौशल्यात अत्यंत आवश्यक असतो. आपण पाहतो ऑफीसमध्ये अनेक वेळा बॉस लोकांशी आदराने वागले जाते; पंरतु चपराशी, सफाई कामगार, चौकीदार यांच्याशी मात्र तुसडेपणाने वागले जाते, हा भेदभाव करणे अत्यंत चूक आहे. सहसंवेदना अत्यंत महत्त्वाचे मूल्य आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे.
संवादाची त्रिसूत्रे
स्वतःची ओळख, आत्मभान, आत्मविश्वास ही संवाद कौशल्याची त्रिसूत्री आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बोलणे म्हणजे फक्त संवाद नसतो, तर समोरचा माणूस बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे हेसुद्धा महत्त्वाचे संवाद कौशल्य आहे. बोलताना चेहऱ्यावर येणारे भाव, शरीराचे हावभाव, आवाजातील चढाव उतार या गोष्टी बोलणाऱ्याच्या शब्दांना पूरक ठरत असतात. म्हणजेच आपली देहबोली. तिच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
समस्या, अडचणी सोडवणे:
उद्योग उभा करताना रोज नवा संघर्ष असतो. रोज लहान-मोठ्या अडचणी समोर असतात; पण यशस्वी व्हायचंय तर या साऱ्यांवर मात करता यावी लागते. यासाठी आत्मविश्वास आणि त्वरित निर्णय घ्यावे लागतात. यासाठी आपल्याला आपली वाणी गोड ठेवावी लागते. जर आपल्याला हे संवाद कौशल्य जमले तर यात आपण यशस्वी होतो.
सेल्स आणि मार्केटिंग:
प्रत्येक उद्योजक हा स्वतः चांगला सेल्समन असणे ही उद्योगाची गरज असते. ज्या उद्योजकाला हे मर्म कळते तो उद्योगात टिकतो. जेव्हा आपण एखाद्या उद्योजकाला त्याच्या व्यवसायाविषयी बोलताना ऐकत असतो त्या वेळी तो आपल्याला खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला म्हणजेच त्याचे संभाषण कौशल्य प्रभावशाली असते.
विषयाचे
सखोल ज्ञान
ज्या विषयाचे विचार मांडायचे, त्या विषयाचं सखोल ज्ञान संवाद कौशल्यासाठी अत्यावश्यक ठरतं. ऐकणाऱ्यापेक्षा बोलणाऱ्याजवळ जास्त ज्ञान व नवे विचार असतील, तरच ऐकणारा ते विचार ग्रहण करायला उत्सुक राहील. ज्ञानाइतकंच अनुभवांचं महत्त्व आहे.
:
संवाद कौशल्य सुधारण्यासाठी टिप्स
१. आत्मविश्वास: जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्याने स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण आपला मुद्दा एखाद्यासमोर मांडतो तेव्हा जर आपल्यात आत्मविश्वास नसेल तर आपण समोरच्याला पटवून देऊ शकत नाही. तुम्ही आत्मविश्वासाने बोलून आपला मुद्दा कोणालाही सहज पटवून देऊ शकता.
२. काळजीपूर्वक ऐकायला शिका: चांगल्या संवादासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐकणे. चांगला वक्ता हा नेहमी बोलण्यापेक्षा ऐकण्याकडे जास्त लक्ष देतो. जेव्हा एखादी व्यक्ती ऐकण्याकडे अधिक लक्ष देते, तेव्हाच ती इतरांच्या शब्दांना योग्य प्रकारे उत्तर देऊ शकते.
३. योग्य देहबोली: ज्याचे संवाद कौशल्य उत्तम असते अशा व्यक्तीचे जर तुम्ही निरिक्षण केले, तर तुमच्या असे लक्षात येईल की ते जे बोलतात त्याच्याशी त्यांचे हातवारे व डोळ्यांच्या हालचाली या मिळत्याजुळत्या असतात. संवाद म्हणजे केवळ मौखिक बोलणे नव्हे तर आपली देहबोलीही खूप काही बोलत असते. यातूनच आपण श्रोत्यांवर छाप पाडू शकतो.
४. सत्य आणि तथ्य मांडा: संवाद करताना कोणती गोष्ट सत्य आणि तथ्य यावर आधारित असायला हवी. जेव्हा तुम्ही एखाद्याशी संवाद साधता तेव्हा फक्त हवेत बोलू नका. मुद्देसुद आणि नेमकं बोला. आपल्या बोलण्यात तथ्य असायलाच हवे. सत्य आणि तथ्य असे आपल्या बोलण्यात असेल तर श्रोत्यांचा आपल्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि आपल्या बोलण्याबाबतची खात्री पटते.
५. टिपणं काढा: आपण कोठेही संवाद साधत असलो तरी आपल्यासोबत आपले पेन आणि वही असावी. आपल्या गरजेचे किंवा चांगले काही आपल्या कानावर आले तर आपण त्याचे टिपण नोंदवू शकतो. जे भविष्यात आपल्याला संदर्भ म्हणून उपयोगी पडू शकते.
आपला मुद्दा मांडण्याआधी, मुख्य मुद्दे लक्षात ठेवावेत हे गरजेचे आहे पण समोरची व्यक्ती काय बोलत आहे हेही लक्षपूर्वक ऐकूण त्याचे टिपण केले तर आपले मुद्दे मांडताना त्याचे संदर्भ घेवून आपले बोलणे अधिक प्रभावी करता येवू शकते. यातून ऐकणारा आपल्याशी चांगल्याप्रकारे जोडला जावू शकतो.
सारांश
संवाद कौशल्य ही संवाद साधण्याची आणि आपल्या भावना व्यक्त करण्याची कला आहे. प्रत्येक व्यक्तीला ही कला किंवा बोलण्याची योग्य पद्धत माहित असेलच असे नाही. संवादकौशल्याचा पदवी आणि शिक्षणाशी काहीही संबंध नाही, कारण प्रत्येक सुशिक्षित आणि पदवीधारकाकडे चांगले संवाद कौशल्य असणे आवश्यक नाही. पण काही गोष्टी लक्षात ठेवून त्यात सुधारणा करता येते. कोणाशीही बोलताना आपल्यात आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही निर्भय, खात्री बाळगता आणि जेव्हा तुम्ही बाहेरच्या आवाजांवर अवलंबून नसाल. त्यामुळे जेव्हाही तुम्ही सुरुवातीच्या काळात कोणाशीही बोलता तेव्हा तुमच्या चुकांना घाबरू नका, कारण चुका होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, पण जेव्हा तुम्ही हळूहळू बोलायला शिकाल, तुमचे संवाद कौशल्य चांगले होईल, तेव्हा तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने काहीही करू शकता. तुम्ही फंक्शन्समध्ये, पार्ट्यांमध्ये, मीटिंगमध्ये किंवा कुठेही बोलू शकाल.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know