Translate in Hindi / Marathi / English

Sunday, 11 February 2024

माघी गणेश जयंती | पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला | गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी | भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे | गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते.

माघी गणेश जयंती

 

गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस पुढीलप्रमाणे मानले जातात. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्मदिवस. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्रीगणेश जयंतीचा दिवस असतो. पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते.

माघी गणेश पूजा विधी

 

चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. गणपतीसह महादेव, गौरी, नंदी, कार्तिकेयसह शिव कुटुंबाची पूजा विधिपूर्वक करावी. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा वाहाव्यात. गणपती अथर्वशीषाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा. गणेश जयंतीला चंद्र दर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या रात्री चंद्र दर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात, अशी धारणा आहे.

माघी गणेश पूजा कशी करावी

एका चौरंगावर लाल कपडा अंथरून घ्या. देवघर किंवा पूजा स्थळ फुलांनी आणि दिव्यांनी सजवा. गणपतीची मूर्ती एका तान्हानात घ्या. गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन करून बाप्पाचा अभिषेक करा. गणपतीला स्वच्छ पुसून लाल कपड्यावर अक्षदा ठेवून त्यावर बप्पाची मूर्ती ठेवा. गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. तसेच गणपतीला प्रिय असलेली जास्वंदाची फुले, लाल फुले, दूर्वा व्हाव्यात, नैवेद्य म्हणून तिळगुळ किंवा त्याचे लाडू किंवा मोदक अर्पण करावे. या दिवशी चुकूनही चंद्र दर्शन घ्यायचे नसते. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

माघी गणेश जयंतीची पौराणिक कथा

आपणास सामान्यत: गणेशजन्माची एकच कथा ज्ञात असते. तीच भाद्रपदी चतुर्थीला आणि तीच माघी चतुर्थीलाही सांगून आपण मोकळ होतो. वास्तविक ती कथा आहे कार्तिक शुध्द चतुर्थीची. त्या दिवशी श्रीगणेशांचा “उमांगमलज नामक अवतार झाला. आपणास ज्ञात असलेली सर्वश्रुत कथा त्या चतुर्थीची आहे. आज आहे माघ शु. चतुर्थी. आजचा गणेशजन्म आहे श्रीविनायक जन्मोत्सव. या चतुर्थीचे वैभव हे आहे की, ही या पृथ्वीची चतुर्थी आहे. महामुनी कश्यप तथा देवी अदितीच्या आश्रमात झालेला हा पृथ्वीवरील अवतार आहे. श्रीमन मुदगल पुरणाच्या द्वितीय खंडात हे विनायक चरित्र खूप विस्तारपूर्वक वर्णिले आहे. संक्षिप्तत: त्याचा आढावा घेऊ. गौड प्रांतात रुद्रकेतू तथा शारदा नामक दाम्पत्याला जुळी अपत्ये झाली. त्यांची देवांतक तथा नरांतक अशी नावे रूढ झाली. देवर्षी नारदांनी या दोघांना शिवपंचाक्षरी महामंत्राचा उपदेश करून तपाचरणास लावले. वरदान रुपात “श्रीब्रह्मदेव निर्मित कोणत्याही पदार्थाने मृत्यू नसावा असा अद्भुत वर भेटला आणि मग जणू आपण अमर झालो या भावनेला त्यांची राक्षसीवृत्ती जगाला त्रस्त करू लागली. त्रीभूवनावर सत्ता स्थापन झाली. देवता स्वलोकातून निर्वासित झाल्या. अरण्यवासी ठरल्या. मग यांनी देवता आहाररूप यज्ञाचा विनाश सुरू केला. देवतांना उपवास घडू लागले आणि त्यांच्या या दु:खाने सर्वाधिक व्यथित झाली ती देवमाता आदिती. श्रीकश्यपांसमोर तिने आपली व्यथा मांडली आणि उत्तररुपात तिला श्रीगणेशोपासना रहस्य प्राप्त झाले. त्या आधारे तिने कठोर तपाचरण केले आणि फलरुपात श्रीगणेशदर्शन तथा पुत्ररुपात आश्रमात अवतरण्याचे त्यांचे श्रीवचन लाभले. इकडे देवांतक नरांतकच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनीही अंतिम उपाय रुपात श्रीगणेशाराधन सुरू केले आणि या सगळ्यांच्या आर्ततापूर्ण हाकेला प्रतिसाद रुपात माघ शु. चतुर्थीला कश्यपगृही भगवान श्रीविनायक रुपात अवतीर्ण झाले. या अवतारात अनेकानेक बाललीला पहावयास मिळाल्या. श्रीमुदगलपुराणापेक्षा या बाललीलांचे कौतुक श्रीगणेशपुराणाच्या क्रीडाखंडात अधिक व्यापक रीतीने शब्दबद्ध करण्यात आलं आहे. यातील अनेक लीलांचे तात्पयीर्थ मोठे अद्भुत आहेत. उदा. श्री विनायकाच्या उपनयन प्रसंगी अनेक देवतांनी त्यांना भेट रुपात शस्त्रास्त्रे दिली. वरपांगी पाहता उपनयन तर शास्त्राभ्यासाचा आरंभ. मग शस्त्रे का दिली? तर जोवर शास्त्र आणि शस्त्र यांचा समन्वय होत नाही तोवर देवांतक, नरांतक या वृत्तींचा विनाश संभव नाही. पुराणकारांनी वर्णिलेले राक्षस या केवळ व्यक्ती नसतात तर त्या प्रवृत्ती असतात. देव कार्यास विरोध करतात ते देवांतक. तर मानवीय मूल्यांना उध्वस्त करतात ते नरांतक. यांच्या निर्दालनाकरीता अनिवार्य आहे. हा या कथेचा भाव समजून घेणे आणि आचरणात आणणे आवश्यक आहे. गंधर्वकथा ही अशीच रोचक कथा. गंधर्वाचे राजे हाहा आणि हुहु हे कश्यपाश्रमात आले. बालविनायक तेथे खेळत होते. या गंधर्वांनी पंचायतन पूजा आरंभिली. श्रीगणेश, श्रीविष्णू, श्रीशंकर, श्रीदेवी तथा श्रीसूर्य या पाचही देवतांचे नियमित पूजन करण्यास पंचायतन पूजन असे म्हणतात. याचे मूळ कारण सगळ्या मार्गांचा समन्वय असते. मात्र, पाचांची पूजा करताना त्यांना वेगवेगळे मानण्यात आणि आम्ही पाचांचीही पूजा करतो याचाच अभिमान आणि पुढे जाऊन अहंकार वाटणाऱ्या गंधर्वांना श्री विनायकाने धडा शिकवला. श्रीविनायकांनी त्या पाचही मूर्ती गिळून टाकल्या. मग आकांडतांडव करणाऱ्या गंधर्वांना स्वत:च पाचही रुपात दर्शन दिले. सगळे काही “मोरयाच आहे हे समजावून सांगणारी ही मोरया कृती आहे.

श्री विनायकांच्या लीला स्थानात कश्यपाश्रमाशिवाय काशीक्षेत्रालाही मोठे वैभवशाली स्थान आहे. काशीराज्याच्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने श्रीविनायक काशी नगरीत आले. तेथे त्यांनी सगळ्याच गावकऱ्यांना लळा लावला. सगळ्यांनाच वाटू लागले की श्रीविनायक आपल्या घरी यावेत. हा आग्रह खूपच वाढला आणि मग एकेदिवशी श्रीविनायकांनी घोषित केले उद्या आम्ही सगळ्यांच्याच घरी येऊ. ही वार्ता सगळ्या गावात पोहोचली. गावाबाहेर एका झोपडीत राहणाऱ्या महर्षी शुक्ल तथा देवी विद्रुमा नामक दाम्पत्याला ही वार्ता कळली. पण आनंदव्यक्त करावा कि व्यथा हेच कळेना. कारण प्रभू घरी येणार हा आनंद पण स्वागताला घरात फुटकी कवडीही नाही याचे दु:ख. शेवटी आहे त्यासह स्वागताची तयारी सुरु झाली. राखेने रांगोळी, दभीने ध्वजा, फुलाने आसन तयार करण्यात आले. पण खायला काय देणार? शेवटी भिक्षा मागितली. मिळेल त्या सगळ्याचे पीठ करून लापसी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी राजवैभवाने स्वागत करणाऱ्या सगळ्यांना सोडून भगवान श्रीशुक्लांच्या झोपडीतच गेले. भगवान वैभवाचा नव्हे तर भावाचा भुकेला असतो हे सांगणारी ही कथा. विनायक अवताराची वैभवशाली कथा आहे चतुर्थी वैभव कथनकारी श्री भृशुंडीकथा. एके दिवशी सकाळीच काशीराजा श्रीविनायकांच्या महाली आले आणि त्यांनी जे दृश्य पाहिले त्यावर त्यांचा विश्वासच बसेना. कारण श्री विनायकांची अशा दिव्यतम उपचारांनी श्रीविनायकांची पूजा संपन्न झाली होती की जे उपचार काशीराजाला राजवाड्यात सुद्धा संभव नव्हते. ही पूजा कोणी? कधी? कशी? केली असे अनेक प्रश्न राजाच्या मनात आले. राजवाड्यात येऊन कोणी अशी पूजा केली कशी? आणि मग ते आपल्याला कसे कळले नाही? शेवटी काशीराजाने श्रीविनायकांनाच प्रश्न केला. उत्तर रुपात महान गाणपत्य महर्षी श्रीभृशुंडींचे महात्म्य कळले. राजाने त्यांच्या दर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. विनायककृपेने राजा अमलाश्रमात (नामलगाव जि. बीड) पोहोचला आणि त्याच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. भक्त भगवदरुप होते. महर्षीच्या भ्रुमध्यातून सोंडच फुटली होती. त्यांचे नावच होते महर्षी भृशुंडी. जगातील हे एकमेव उदाहरण. राजाने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. महर्षी भृशुंडींनी केलेली मानसपूजा विनायकास प्रत्यक्षरुपात पोहोचल्याचे सांगितले तथा दर्शनार्थ येण्याची प्रार्थना केली. आश्चर्याचा आणखी एक धक्का तेव्हा बसला जेव्हा महर्षीनी विचारले विनायक गजशुंडाधारी आहेत का? राजा म्हणाला नाही. महर्षी म्हणाले “मग मी दर्शनार्थ येणार नाही.’’ महर्षी भृशुडींच्या या अत्युत्कट एक निष्ठेच्या फलरुपात श्रीविनायक आपल्या मूळ गजशुंडा रुपात नटले. भक्तीमार्गातील या एकनिष्ठेला अधोरेखित करणारा अवतार आहे श्रीविनायक अवतार.

श्रीविनायक अवतारातील एक वैशिष्ठयपूर्ण कथाभाग म्हणजे देवी सिद्धीच्या अधिपत्याखाली स्थापित स्त्री सैन्य. नारी सैन्याचा हा कदाचित जगातील प्रथम प्रयोग असावा. श्रीविनायक अवतारातील अंतिम कथा अवतरणकारण रूप लीला म्हणजे देवांतक नरांतक वध. अशा रुपात आपल्या या अवतारातील विविध लीला संपन्न करून श्रीगणराजप्रभू आपल्या स्वानंद लोकी परतले. अशा या दिव्यस्वरूपातील कृतीयुगीन अवताराची अवतरण तिथी आहे माघ. शु. चतुर्थी. संदर्भ ग्रंथ: श्री मुद्गल महापुराण.

विनायकी चतुर्थी

महाराष्ट्रात दोनदा गणेश जयंती साजरी केली जाते. एकदा भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. तर, एकदा माघ महिन्यात गणपती बाप्पाचे घराघरात आगमन होते. माघ महिन्यातील शुल्क चतुर्थीच्या दिनी गणेश जयंती धुमधडाक्यात साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार आणि काही पौराणिम ग्रंथानुसार या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. माघ महिन्यातील गणेश जयंतीला विनायकी चतुर्थीदेखील म्हटले जाते. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणेच या दिवसांतच बाप्पाला दीड दिवस घरी आणले जाते. तर, मोठी मिरवणूक काढत बाप्पाचे विसर्जनदेखील करण्यात येते. या दिवसाचे खूप महत्त्व आहे. माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाचे तत्व हजारपटीने वाढतात.

महाराष्ट्राला खाद्यसंस्कृतीचा खास वारसा आहे. यामध्ये बाप्पाला उकडीचे मोदक आवडत असल्याने दर महिन्यात संकष्टी चतुर्थी तसेच भाद्रपद चतुर्थी, माघी गणेश जयंती अशा महत्त्वाच्या दिवशी मोदक बनवले जातात. माघी गणेश जयंती दिवशी गणपतीला मोदकाचा प्रसाद द्यावा. मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. माघी गणेश जयंतीनिमित्त घरी बनवा परफेक्ट उकडीचे मोदक. योग्य रेसिपी फॉलो केल्यास एकदं बेस्ट उकडीचे मोदक तयार होऊ शकतात.

उकडीचे मोदक फार कमी वेळात तयार होतात. ते तयार करण्यासाठी तांदळाचे पीठ, गूळ, खोबरे असं साहित्य वापरले जातात. चला जाणून घेऊया उकडीचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.

उकडीचे मोदक

साहित्य

तांदळाचे पीठ - वाट्या

किसलेले नारळ - कप

गूळ - कप

देशी तूप - टीस्पून

वेलची पावडर - / टीस्पून

मीठ - / टीस्पून

उकडीचे मोदक कृती

> उकडीचे मोदक बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात चमचा देशी तूप गरम करून त्यात वाट्या खोबरे घालून परतून घ्या.

> नारळातून सुगंध यायला लागल्यावर त्यात ठेचलेला गूळ टाका आणि नीट मिक्स करून शिजवा.

> मध्यम आचेवर गूळ वितळेपर्यंत आणि नारळात मिसळेपर्यंत शिजवा.

> मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा, नंतर वेलची पावडर घाला. मोदकाचे सारण तयार आहे.

> आता दुसरे पॅन घ्या आणि त्यात चमचा देशी तूप घालून मध्यम आचेवर गरम करा. तूप वितळले की त्यात अर्धा चमचा मीठ टाका आणि मिसळा.

> आता त्यात कप पाणी टाकून उकळा. पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ थोडं थोडं घालून मिक्स करा. तांदळाचे पीठ सर्व पाणी शोषून घेईपर्यंत ते मिक्स करावे.

> आता गॅस बंद करून पीठ झाकून मिनिटे बाजूला ठेवा. पीठ थोडे कोमट राहिल्यावर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा आणि नंतर पीठ मळून घ्या.

> पीठ पूर्णपणे मऊ होईपर्यंत मळून घ्या. आता मोदकासाठी पीठ तयार आहे.

> आता पिठाचे गोळे बनवा आणि एक गोळा घ्या, त्याचे गोल करा आणि नंतर ते चपटे करा. यानंतर, दोन्ही अंगठ्याच्या मदतीने मध्यभागी हलके दाबा. कपाचा आकार येईपर्यंत पीठाचे कोपरे हळू हळू दाबत रहा. मग त्यातून प्लीट्स बनवा. यानंतर मोदकात तयार गूळ-खोबऱ्याचे सारण चमच्याच्या साहाय्याने भरून प्लीट्स गोळा करून वरून दाबून बिंदूचा आकार द्या.

> अशाप्रकारे सगळे मोदक बनवून घ्या आणि त्यांना नंतर १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या. चविष्ट उकडीचे मोदक तयार आहेत.

सारांश

भगवान गणेशाला समस्यानिवारक आणि अडथळे दूर करणारा देव म्हणतात. गणेश जयंतीचे व्रत केल्याने गणपती सर्व मनोकामना पूर्ण करतो. अनेक ठिकाणी माघ महिन्यातील गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी देखील होते. गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी हे अधिक लोकप्रिय आहेत. भारतीय गणेश चतुर्थी उत्सव आणि माघी गणपती यातील फरक असा आहे की गणेश चतुर्थी हा सण ऑगस्ट / सप्टेंबरमध्ये (भाद्रपद हिंदू महिन्यात) पाळला जातो. परंपरेनुसार, गणेश चतुर्थी हा गणेशचा वाढदिवस म्हणूनही गणला जातो. गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशातील तिलो चौथ आणि सकट चौथीस असेही म्हटले जाते, जेथे गणेशाला एका मुलाच्या वतीने बोलावले जाते. याला महाराष्ट्रात तीळकंद चतुर्थी असेही म्हणतात.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know