नाचणी आणि नाचणीचे सत्व
नाचणीचे फायदे आरोग्यासाठी
चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य जाणेही गरजेचे आहे. धान्याचे सेवन आपल्याला पोषण देण्यासह अनेक आजारांपासून आपले रक्षण करे. जेव्हा आपण धान्याचे नाव घेतो, तेव्हा नाचणी आणि नाचणीचे सत्व आपण नक्कीच महत्त्वाचे मानतो. नाचणीचे फायदे अनेक आहेत. नाचणीचे शरीरासाठी विविध फायदे होतात. पण त्याआधी रागी अर्थात नाचणी म्हणजे काय हे जाणणे महत्त्वाचे आहे. रागी अर्थात नाचणी हे भारतासह आफ्रिकेच्याही विविध भागात उगवणारे एक धान्य आहे. भारतात कर्नाटक राज्यात याचे सर्वाधिक उत्पादन होते. यामध्ये अनेक पोषक तत्वे आपल्याला आढळतात. फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, जिंक, लोह आणि कॅल्शियम ही शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे रागी अर्थात नाचणीमधून शरीराला मिळतात. जाणून घेऊया आरोग्यासाठी नाचणीचे फायदे.
हाडांच्या विकासाकरिता नाचणीचे फायदे
रागीचा अर्थात नाचणीचा हाडांसाठी खूपच चांगला उपयोग होतो. वास्तविक रागीमध्ये असणारे कॅल्शियमचे प्रमाण हाडांना अधिक मजबूती देते. एका शोधानुसार, नाचणीमध्ये तांदळाच्या तुलनेत 30 पट जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांना आवश्यक असणारे कॅल्शियम नाचणीतून सहजपणाने मिळते. तसंच हाडांचा विकास करण्यासाठी कॅल्शियम हे आवश्यक पोषक तत्व समजण्यात येते. त्यामुळे हाडांना तुटण्यापासून संरक्षण देण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी नाचणीचा फायदा होतो. यातील कॅल्शियममुळेच लहान मुलांना आणि अगदी गरोदर असणाऱ्या महिलांनाही नाचणीचे सत्व देण्यात येते. कॅल्शियमची कमतरता असल्यास, कॅल्शियमयुक्त डाएटमध्ये नाचणीचा समावेश करून घेणे हा उत्तम पर्याय आहे.
वजन कमी करण्यासाठी नाचणी उपयुक्त
अनेक जण वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग करतात. एका शोधानुसार, वजन नियंत्रणात राखण्यासाठी नाचणीचा उपयोग होतो. यामध्ये असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो असिड हे भूक कमी करून वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करते. त्याशिवाय नाचणीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर त्वरीत भूक लागत नाही आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो. तुम्हाला वजन वाढण्याचा त्रास असेल तर वजन कमी करण्यासाठी जेवणामध्ये नाचणीचा समावेश करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही नियमित व्यायाम करणेही आवश्यक आहे.
नाचणीमध्ये जास्त प्रमाणात मिळते फायबर
तांदळाच्या तुलनेत नाचणीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. तुमच्या शरीरातील पचनक्रिया चांगली करण्यासाठी आणि अन्न पचविण्यासाठी नाचणीचा उपयोग होतो. तसंच नाचणीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पटकन भूक लागत नाही. शरीरातील चरबीपासूनही त्यामुळे सुटका मिळते आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही यामुळे कमी होते. त्यामुळे जेवणात किमान एक वेळ तर नाचणीच्या भाकरीचा समावेश करून घ्यावा. जेणेकरून तुम्ही तुमचे आरोग्य अधिक चांगले ठेऊ शकता.
मधुमेहावर गुणकारी
बदलत्या लाईफस्टाईलमुळे आजकाल अगदी लहान वयातदेखील टाईप – 2 मधुमेह अनेकांना झालेला दिसून येतो. मधुमेहाची समस्या असेल तर त्यावर नाचणी हा उत्तम उपाय आहे. यामधील अँटीडायबिटीक गुणामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत मिळते आणि वाढलेले वजनही नियंत्रित होते. तसंच नाचणी हा एक लो ग्लायसेमिक खाद्यपदार्थ आहे, जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांसाठी रागी अर्थात नाचणी एक वरदानच ठरते. ज्या व्यक्तींना मधुमेह झाला आहे त्यांनी आपल्या जेवणात पोळीऐवजी नाचणीच्या भाकरीचा समावेश करून घ्यावा आणि काही दिवसातच त्यांना मधुमेहावरील त्याचा परिणाम दिसून येईल.
अनिमियावर उपयुक्त
नाचणीमध्ये लोहाचा चांगला स्रोत आहे. अनिमिया आणि हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या रूग्णांना आपल्या आहाराच नाचणीचा समावेश करून घेणे फायद्याचे ठरते. हे एखाद्या घरगुती उपचाराप्रमाणेच आहे. नाचणी खाल्ल्याने शरीरात विटामिन सी ची कमतरता जाणवत नाही आणि शरीरातील रक्तामध्ये लोहाचे प्रमाणही वाढते. तुम्हाला हवं तर तुम्ही नाश्त्यामध्ये रागी उपमा, रागी डोसा याचाही समावेश करून घेऊ शकता. तुम्हाला सतत भाकरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर अनिमियावर उपाय म्हणून तुम्ही रागीच्या इतर पदार्थांचा उपयोग करून घेऊ शकता.
मेंदूसाठी ठरते फायदेशीर
नाचणीचे सत्व अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांनाच देण्यात येते. नाचणीतील अमिनो असिड आणि अँटीऑक्सिडंट गुण हे नैसर्गिक पद्धतीने शरीराला आराम देतात. तसंच मेंदूमध्ये होणाऱ्या चिंता, डोकेदुखी, अनिद्रा यासारख्या समस्यांवर नाचणी उपयुक्त ठरते. ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो असिड हे मेंदूसाठी फायदेशीर ठरून तुम्हाला व्यवस्थित झोप लागण्यासाठी याची मदत होते. तसंच तुमची स्मरणशक्ती चांगली ठेवण्याचे कामही नाचणीचे सत्व करते.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना उच्च रक्तदाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही नाचणीचा आपल्या आहारात समावेश करून घेऊ शकता. नाचणीचे तुम्ही नियमित सेवन करत असाल तर तुम्ही या त्रासापासून दूर राहता आणि स्ट्रोकचा धोकाही टळतो. त्यामुळे आपल्या आहारात किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नाचणीच्या भाकरीचा समावेश करून घ्यावा.
नाचणी सत्वचे फायदे
लहान मुलांना नेहमीच नाचणीचे सत्व देण्यात येते हे आपण पाहतो. पण त्यामागील कारण म्हणजे मुलांची पचनशक्ती फारच नाजूक असते. पचनाला अधिक चांगले बनविण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो. जेणेकरून मुलांना गॅसची समस्या होऊ नये आणि त्यांना त्रास होऊ नये यासाठी नाचणीचे सत्व देण्यात येते. इतकेच नाही तर मुलांच्या हाडांचा चांगला विकास व्हावा यासाठीही नाचणीचे सत्व देण्यात येते. नाचणीत असणारे कॅल्शियम लहान मुलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आईचे दूध सोडवून खाण्याची सवय लावण्यासाठी नाचणीच्या सत्वाचा चांगला उपयोग होतो.
ग्लूटन फ्री
सिलिएक रोग असणाऱ्या व्यक्तींना विशिष्ट खाण्याचे पदार्थच लागतात. नाचणी हे ग्लूटन फ्री धान्य आहे. त्यामुळे तुम्हाला याचा उपयोग आरोग्यासाठी करून घेता येतो. यामुळे शरीराला कोणतीही बाधा होत नाही. लसमुक्त असे हे धान्य असल्यामुळे अनेक जण रागीचा अर्थात नाचणीचा आपल्या आहारात समावेश करून घेतात.
त्वचेसाठी ठरते फायदेशीर
नाचणीचे फायदे केवळ आरोग्यासाठीच नाहीत तर त्वचेसाठीही होतात. वास्तविक रागीमध्ये असणारे फेरूलिक असिड हे युन्ही किरणांपासून होणाऱ्या त्वचेच्या त्रासापासून मुक्तता देते. तसंच यामध्ये असणारे अँटिएजिंग गुण तुमची त्वचा अधिक चमकदार बनविण्यास फायदेशीर ठरतात. एजिंगचा प्रभाव कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. तसंच रागीचा उपयोग फेसमास्क बनविण्यासाठीही करण्यात येतो. यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसते.
स्तनपानासाठी अधिक उपयुक्त
ज्या माता स्तनपान करत आहेत त्यांच्यासाठी नाचणी आणि नाचणीचे सत्व अत्यंत उपयुक्त ठरते. हिरवी नाचणी खाल्ल्याने स्तनपान देणाऱ्या मातेच्या दुधामध्ये वाढ होते आणि बाळाला या दुधातून अधिक पोषण मिळते. या दुधातून आवश्यक अमिनो असिड, लोह आणि कॅल्शियम हे बाळाच्या पोटात जाते. नाचणी हे स्तनपान देणारी माता आणि बाळ या दोन्हीसाठी आवश्यक आहे.
नाचणीचा वापर अथवा साठा कसा करावा?
नाचणीचे फायदे जाणून घेतल्यानंतर आता याचा उपयोग कसा करायचा आणि साठा कसा करायचा हे जाणून घेणेही गरजेचे आहे. नाचणीचा साठा करणे सोपे आहे. तुम्ही नाचणीतील खडे काढून एका एअरटाईट डब्यात हे ठेऊ शकता अथवा कोणत्याही स्टीलच्या डब्यात तुम्ही काही महिन्यांसाठी नाचणी ठेऊ शकता.
नाचणीचा उपयोगः
नाचणीचे पीठ करून भाकरी बनविता येते. आणि चवीलाही ती छान लागते. पण ती गरम असताना खावी लागते. कारण ती भाकरी थंड झाली की कडक, होते.
नाचणीचा कोंडा काढून टाकून सत्व बनविले जाते. हे सत्व किंवा पीठ दुधात शिजवून खाल्ल्यास शरीराला पोषक असते.
नाचणीचे पीठ नुसतेच पाण्यात शिजवून त्याची आंबिल सुद्धा बनविली जाते. आणि त्यामध्ये ताक घालूनही ती खाल्ली जाते. तसेच ज्वारीप्रमाणे नाचणीचेही पापड बनविता येतात.
आजकाल बाजारात बटाट्यांच्या चिप्सप्रमाणे नाचणीचे चिप्स सुद्धा विकत मिळतात. दक्षिण भारतात नाचणी ही आंबवून त्याचे डोसे सुद्धा बनविले जातात.
कर्नाटकात नाचणीचे पीठ शिजवून त्याचे गोळे बनवितात. आणि त्यांना रागी मुड्डे असं म्हणतात. हे गोळे सांबार, चटणी, तूप याबरोबर खाल्ले जातात.
नेपाळमध्ये तसेच आफ्रिकेत या नाचणीपासून बिअर बनविली जाते. औषध म्हणून नाचणीचा उपयोग बाळंतीणीसाठी केला जातो.
हल्ली भारतातही बालरोगतज्ज्ञ लहान मुलांसाठी कॅल्शियमचा मोठा स्त्रोत म्हणून नाचणीचा उपयोग करायला सांगतात.
बेसनाच्या लाडूंप्रमाणे नाचणीचे सुद्धा लाडू बनविता येतात. नाचणी लवकर खराब होत नाही त्यामुळे तिचं पीठ बरेच दिवस टिकते.
नाचणीच्या पिठाची भाकरी बनवितांना जर त्या पीठा मध्ये गरम पानी घालून भिजविले तर त्याची चांगली भाकरी बनविता येते. नाचणी हे थंड असल्याने खास करून उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते.
नाश्त्यासाठी रागी डोसा, रागी इडली अथवा रागीचा उपमा बनवणे
नाचणीची भाकरी बनवून खाऊ शकता
पराठ्यासाठीही तुम्ही नाचणीच्या पिठाचा वापर करून घेऊ शकता
रागीची चकलीदेखील तुम्ही तयार करू शकता
फेस मास्क बनवून तुम्ही रागीचा उपयोग करून घेऊ शकता
नाचणी
विषयी प्रश्नोत्तरे
1. नाचणीचे काही दुष्परिणाम आहेत का?
नाचणीचे फायदे अनेक आहेत यात काहीच शंका नाही. मात्र नाचणी खाल्ल्याने नुकसानही होऊ शकते. यामध्ये कॅल्शियम जास्त असल्याने अधिक सेवन केल्यास मुतखडा होण्याची शक्यता असते. तसंच फायबर अधिक असल्याने, गॅस, पोट फुगणे आणि पोटात सूज येणेसारखा त्रासही होऊ शकतो. नाचणीची अलर्जी असेल तर अलर्जीची समस्याही होऊ शकते.
2. नाचणी खाल्ल्याने झोप येते का?
नाचणी ही अनिद्राच्या समस्येवर चांगला उपाय ठरते. त्यामुळे शरीराला आराम मिळून चांगली झोप मिळते. तुम्हाला अनिद्रेची समस्या असेल तर नाचणीचा समावेश आहारात करून घ्या.
3. रागीचे रोज सेवन करणे चांगले आहे का?
रागीचे सेवन रोज करण्यापेक्षा आठवड्यातून दोन ते तीन वेळा करणे अधिक चांगले. गव्हाच्या तुलनेत यामध्ये अधिक फायबर असते आणि कॅल्शियमदेखील. त्यामुळे शरीराला आवश्यक ते पोषक तत्व आठवड्यातून दोन ते तीन वेळा रागी खाऊन मिळू शकते.
सारांश
नाचणी हे धान्य आपल्या सर्वानाच माहिती आहे. जसे ज्वारीची भाकरी होते, तसेच नाचणीची सुद्धा भाकरी होते. आणि ती खायला ही चविष्ट लागते. तुम्हाला माहिती असेल नाचणी पासून अनेक पदार्थ बनविले जातात. नाचणी हे धान्य महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू राज्यामध्ये जास्त प्रमाणात खाल्ले जाते. यामध्ये अनेक पोषणमूल्य असतात. नाचणी ही जास्त करून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आणि तामिळनाडू आंध्रप्रदेश राज्यांमध्ये खाल्ली जाते. १०० ग्रॅम नाचणीमध्ये साधारण ३२८ उष्मांक असतात. नाचणी मध्ये प्रथिने ही तांदळाएवढी म्हणजे ७ ते ८% असतात. स्निग्ध पदार्थ हे नगण्य असतात. तर तसेच ७०% कार्बोहायड्रेटस् असतात. बऱ्यापैकी तंतू, खनिजे आणि भरपूर कॅल्शियम सुद्धा असतं. कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्याने ज्या लोकांना त्रास होतो अशांना नाचणी म्हणजे एक वरदान आहे. तांदळाप्रमाणे नाचणीसुद्धा पचण्यासाठी आणि शिजण्यासाठी सुलभ असते. या सर्व कारणासाठी आणि भरपूर कॅल्शियम व तंतूमुळे नाचणी सर्वांसाठीच हितकर समजली जाते.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know